एआईएमआयएम पक्षाचे यश धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाची प्रतिक्रिया कि प्रस्थापित पक्षाचे अपयश?
भारत हे
धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. धर्म ही संविधानाने खाजगी बाब मानलेले आहे. प्रत्येकाला
धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहे. धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव करता येत नाही.
राज्याचा अधिकृत कोणताही धर्म नाही असे असूनही महाराष्ट्रासारख्या प्रगत
राज्याच्या सार्वजनिक जीवन धार्मिक राजकारणाने प्रभावित झालेली दिसून येते.
धर्माच्या आधारे लोकांना संघटित करून शक्ती प्रदर्शन करणे. धर्म हाच घटक विकासाचे
प्रमुख इंजिन आहे. धर्माच्या आधारावर संघटित किंवा एकत्रित न राहिल्यास तुमच्या
अस्तित्वाला धोका निर्माण होईल हे अनामिक भय विकसित करून धार्मिक ध्रुवीकरणाचे
राजकारण महाराष्ट्रात तेजीत आलेले दिसते. 'बटेंगे तो कटेंगे, कैसा हराया, प्रदेश हिरवा करण्याची भाषा, भगवे राजकारण, अल्पसंख्यांक समाजाला उघड उघड दिल्या जाणाऱ्या
धमक्या आणि त्याला अल्पसंख्यांक समाजातल्या नेत्यांकडून दिलेले उत्तर इत्यादीतून
महाराष्ट्राचे राजकीय जीवन ढवळून निघालेले दिसून येते. भाजप मुंबईचे
अध्यक्ष अमित साटम यांनी ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे महापौर म्हणून निवडून
आल्यानंतर मुंबईचा महापौर कोणी खान बनणार नाही हे वक्तव्य करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. भाजपने सुरू केलेल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या
राजकारणातून प्रतिक्रियावादी राजकारणाचा विकास झाल्याचे एआईएमआईएमच्या यशातून स्पष्ट संकेत मिळालेले
दिसून येतात.
भारतातील सर्वात
पुरोगामी समजल्या जाणाऱ्या फुले,
शाहू आंबेडकरांच्या
विचारांवर पोसलेल्या महाराष्ट्रात विकासाच्या राजकारणा ऐवजी धर्माचे राजकारण अधिक
टोकदार बनलेले दिसून येते. निवडणुकीत जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित मूलभूत
प्रश्न संदर्भात चर्चा करण्याऐवजी धार्मिक हितसंबंधांना विकासाशी जोडून धार्मिक
ध्रुवीकरणाच्या माध्यमातून विशिष्ट समाजाची एक गठ्ठा मते प्राप्त करण्याच्या
उत्तरेच्या राजकारणाचा पॅटर्न महाराष्ट्रात प्रभावीपणे भाजपने राबवून लोकसभा आणि
विधानसभा निवडणुकीप्रमाणेच नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत यश प्राप्त केले.
भाजपच्या याच पॅटर्न पासून आदर्श घेऊन असदुद्दीन ओवेसी यांच्या एआईएमआईएम पक्षाने
महाराष्ट्राच्या महानगरपालिका निवडणुकीत यश संपादन केले. महाराष्ट्राच्या
महानगरपालिका निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या एआईएमआईएम पक्षाने दमदार कामगिरी
करून सर्वांना चकित केले. या पक्षाने महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका पैकी 24 महानगरपालिकांमध्ये आपले उमेदवार उभे केले. त्यातील 13
महानगरपालिकांमधील 125 जागांवर विजय प्राप्त केला. अनेक महानगरपालिकांमध्ये
समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी
काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना सारख्या महाराष्ट्रातील प्रमुख
विरोधी पक्षांपेक्षाही दमदार कामगिरी केलेली दिसून येते. या पक्षाने सर्वाधिक 33
जागा छत्रपती संभाजी महानगरपालिकेत प्राप्त
करून दमदार कामगिरी केली. मालेगाव शहरात 21 जागा, नांदेड शहरात 14
जागा, अमरावतीत 12, धुळ्यात 10
आणि सोलापुरात 8 जागा प्राप्त केल्या.
राज्यभरात निवडून आलेले
एमआयएमचे उमेदवार –
1. सोलापूर – 8
2. संभाजीनगर – 33
3. मालेगाव – 20
4. मुंबई – 8
5. नागपूर – 6
6. अहिल्यानगर – 2
7. जालना – 2
8. ठाणे – 5
9. नांदेड – 15
10. चंद्रपूर – 1
11. धुळे – 10
12. अकोला – 3
13. अमरावती – 12
एकूण – 125
राज्यात एआईएमआईएम
प्रथमच एवढे व्यापक यश मिळाले. महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांमध्ये प्रस्थापित
पक्षांना धूळ चारत एआईएमआईएमचे 125 उमेदवार निवडून आले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून धार्मिक ध्रुवीकरणावर आधारित
निवडणुकीमुळे देशांतर्गत हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोकांमध्ये अघोषित
स्वरूपाची फाळणी झालेली दिसून येते. भारतातील सर्वात मोठा पक्ष भाजपने एकाही
मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी न देता त्या समाजाला राजकीय परिघाबाहेर ढकलण्याचा
अलिखित नियम केला. 80 विरुद्ध 20 अशी भाषा करून अल्पसंख्यांकांच्या मताशिवाय आम्ही
निवडून येऊ शकतो हे सिद्ध करण्याचा खटाटोप केला. भाजपच्या याच रणनीतीला प्रभावी उत्तर देण्याऐवजी काँग्रेस
पक्षाने भाजपचीच री ओढत अप्रत्यक्षपणे मवाळ हिंदुत्वादाचा अवलंब करून मुस्लिम
समाजातील उमेदवारांना उमेदवारी देण्यास टाळाटाळ सुरू केले. मुस्लिम उमेदवारांना जागा
दिल्यास आपली जागा निवडून येणार नाही. भाजपकडून केल्या जाणाऱ्या मुस्लिम धार्जिणे
प्रचाराला बळ मिळेल आणि त्याचा परिणाम इतर समाजाचा देखील पाठिंबा गमवाव्या लागेल
या भयाने काँग्रेस नव्हे तर स्वतःला धर्मनिरपेक्षतेचे राखणदार म्हणणारे समाजवादी
पक्ष, आम आदमी पार्टी, बहुजन समाजवादी पक्ष आणि
महाराष्ट्रातील इतर पक्ष देखील मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देण्यास टाळाटाळ करू
लागले; याचा परिणाम मुस्लिमांमध्ये असलेले भयगंड अधिक गडद होऊ
लागले. आपल्या समाजाला योग्य प्रतिनिधित्व देण्याऐवजी राजकीय व्यवस्थेपासून दूर
ढकलले जाते आहे. व्यवस्थेत असलेले लोक आपल्या भावना आणि प्रश्न नीट समजून घेत नाही
अशी भावना मुस्लिम समाजात सार्वत्रिकरित्या पसरू लागली. या भयगंडातून स्वतःची
सुटका करण्यासाठी मुस्लिम मतदारांनी मुस्लिम हितसंबंध रक्षणाची भाषा करणाऱ्या एआईएमआईएम
पक्षाला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. या पक्षाचे नेते भावनिक दृष्ट्या समाजातील
लोकांना जवळचे वाटू लागले. एआईएमआईएमच्या नेत्यांनी प्रचारात वापरलेली भाषा आणि मुस्लिमांच्या
प्रश्नाबद्दल व्यक्त केलेली अस्मिता याचा परिणाम हळूहळू समाजावर होऊ लागला.
त्यामुळे साहजिकच मुस्लिम समाजाचा ओढा एआईएमआईएम पक्षांकडे वाढायला लागला त्याचाच
परिणाम म्हणून महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत 125 जागा विजय मिळाला.
महाराष्ट्राच्या
राजकारणामध्ये हातपाय पसरण्याचे प्रयत्न एआईएमआईएम पक्षाचे गेल्या अनेक वर्षापासून
सुरू आहेत. परंतु गेल्या अनेक निवडणुकीमध्ये या पक्षाला मर्यादित प्रमाणात यश
प्राप्त झाले म्हणून पक्षाचे प्रमुख नेते असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांनी
पक्षाच्या रणनीतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केला. त्यातील प्रमुख बदल म्हणजे
मुस्लिम समाजातील उच्चशिक्षित तरुण आणि तरुणींना उमेदवारी देणे; त्यांना निवडून आणण्यासाठी मायक्रो प्लॅनिंगवर भर दिला. मुस्लिम समाजाशिवाय
हिंदू समाजातील मागास आणि वंचित वर्गाचा पाठिंबा मिळवण्याचे देखील रणनीती आखण्यात
आली याच रणनीतीला अनुसरून अनेक हिंदू किंवा बौद्ध समाजातील लोकांना तिकिटे बहाल
करण्यात आली त्याचाच परिणाम म्हणून मुस्लिम समाज वगळता सहा नगरसेवक इतर समाजाचे
निवडून आले. या पक्षाच्या विजयात मुस्लिम मतदारासोबत हिंदू समाजातील अनुसूचित जाती
जमातीतील मतदारांचा देखील
वाटा दिसून येतो. या पक्षाने काही हिंदू उमेदवारांना तिकिटे दिलेली होती. त्यामुळे सहा जागांवर गैर मुस्लिम उमेदवार देखील विजय झालेले दिसून येतात. रणनीतीचा दुसरा भाग
म्हणजे इतर पक्षातले दुखावलेल्या मुस्लिम नेत्यांना आपल्या पक्षात आणून तिकिटे
बहाल करणे होय. सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख हे कुटुंब राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाशी जोडलेले होते. महानगरपालिकेत सहर शेख यांना तिकीट नाकारल्यामुळे एआईएमआईएम
पक्षाने त्यांना तिकीट देऊन निवडून आणले. निवडून आल्यानंतर मुंब्रा हरा कर
देण्याची भाषा पक्षातील नेत्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्याचे लक्षण आहे.
महाराष्ट्रातील
मुख्य धारेतील किंवा प्रस्थापित पक्षाने मुस्लिम समाजाला निवडणुकीच्या
राजकारणापासून बाजूला सारण्याचा प्रयत्न एआईएमआईएम पक्षाच्या वाढीला पोषक ठरला.
प्रस्थापित पक्ष जेव्हा एखाद्या समूहाला दुय्यमत्व बहाल करून मूळ प्रवाहापासून दूर
करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो समूह आपल्याला जवळ करणाऱ्या पक्षाच्या मागे जातो.
स्वतःला धर्मनिरपेक्ष मानणाऱ्या महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना मुस्लिमांची
मते हवी होती परंतु त्यांना योग्य प्रतिनिधित्व द्यायचे नव्हते. त्यांना एक
सुरक्षित मतपेढी म्हणून गृहीत धरलेले होते हीच गोष्ट मुस्लिमांमधील उच्चशिक्षित
वर्गाला खटकू लागली होती. हा वर्ग मर्यादित प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करत होता.
परंतु त्याच्याकडे ह्या पक्षांनी दुर्लक्ष केल्यामुळे हा
वर्ग हळूहळू एआईएमआईएम पक्षाच्या दिशेने झुकू लागला. एआईएमआईएम पक्षाने
महानगरपालिकेत कट्टरतावादाचा अवलंब करणे ऐवजी विकास, मुस्लिम समाजाच्या
प्रश्नांवर प्रचारामध्ये भर दिला. मुस्लिमांसारख्याच मागास असलेल्या हिंदू आणि
बौद्धांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. आपण देखील इतर पक्षांप्रमाणेच
धर्मनिरपेक्ष होत हा संदेश देण्यासाठी विजय उबाळे सारख्या दलित समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली. निवडून आल्यानंतर एकमेव हिंदू उमेदवार असताना देखील
गटनेतेपदी निवड केली. ही एआईएमआईएम पक्षाचा निर्णय भविष्यातील रणनीतीची चुणूक
दाखवतो.
एआईएमआईएम
पक्षाला मिळालेले यश हे प्रामुख्याने मुस्लिम बहुल भागात मिळालेले दिसते. महाराष्ट्राच्या
राजकारणात गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या
राजकारणाने देखील एआईएमआईएमच्या यशाला हातभार लावलेला दिसतो. महाराष्ट्रात
सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेना पक्षाने सातत्याने हिंदुत्ववादाच्या जोरावर
निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. 'बटेंगे तो कटेंगे' 'भगवे यश' या शब्दांचा निवडणुकीत केला जाणारा सर्रास वापर तसेच सरकारमधील मंत्री निलेश
राणे, माजी खासदार नवनीत राणा
आणि भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांकडून विशेषता अल्पसंख्यांक समाजाबाबत आक्रमक
विधानांमुळे मुस्लिम समाजामध्ये अनामिक भयाचे वातावरण निर्माण झालेले दिसते.
भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक हिंदुत्वाला आवर घालण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उठाबा, समाजवादी पक्ष
फारसे यशस्वी न झाल्यामुळे मुस्लिम समाजातील एक मोठा गट एआईएमआईएम पक्षाच्या
पाठीमागे उभा राहिलेला दिसून येतो. काँग्रेस सहित महाराष्ट्रातल्या सर्वच विरोधी
पक्षांनी मुस्लिमांच्या एक गठ्ठा मताचा लाभ उचलून अनेकदा सत्ता प्राप्त केले.
परंतु त्या समाजाच्या प्रश्नांकडे फारसे लक्ष दिलेला आहे. त्यामुळे
अल्पसंख्याकांच्या मनात असुरक्षिततेची भावना मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली
दिसते. अशा परिस्थितीत ओवेसी मुस्लिम समाजाच्या हितरक्षणाबाबत सातत्याने प्रभावी
भूमिका म्हणतात त्यांच्या याच भूमिकेमुळे अनेक मुस्लिम तरुण प्रभावित झाल्याने
पक्षाचे प्रभावक्षेत्र विस्तारताना दिसते आहे.
धर्मनिरपेक्ष पक्ष मुस्लिमांच्या
प्रश्नांकडे उदारमतवादी भूमिकेतून पाहण्याऐवजी धार्मिकतेच्या भूमिकेतून प्रश्नाचे
निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा समाज महाराष्ट्रातील सर्वात उपेक्षित,
वंचित आणि मागासलेला समाज बनला. मुस्लिमांच्या
परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या सच्चर आयोगाने केलेला शिफारशी अंमलात
आणण्याचा फारसा प्रयत्न केला गेला नाही. त्यामुळे त्यांच्या दयनीय अवस्थेत फारसा
फरक पडला नाही. परिणामतः या समाजातील लोकांमध्ये विरोधी पक्षांबद्दल असंतोष
निर्माण झाला. या असंतोषाचा लाभ एआईएमआईएम पक्षाने उचलला. या पक्षाचे नेते असदुद्दीन
ओवेसी यांनी महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये रॅल्या आणि जनसभांना संबोधित करून
मुस्लिमांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या पक्षाने मराठवाडा आणि पश्चिम
महाराष्ट्रातील आपली व्होट बँक मजबूत केल्यामुळे काँग्रेस आणि एनसीपीच्या अनेक
उमेदवारांना मागे सारून महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलले. अनेक
महानगरपालिकेमध्ये किंग मेकरच्या भूमिकेत पुढे आली.
मतदानाच्या आधी
मुंबई शाखेचे अध्यक्ष फारूक शबदी यांनी दिलेला राजीनामा आणि राज्य शाखेचे अध्यक्ष
इम्तियाज जलील यांच्यावर तिकीट वाटपावरून झालेला हल्ला अशा परिस्थितीत एआईएमआईएम
पक्षाला मिळालेले यश अभूतपूर्व मानले जाते. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता वारीस पठाण
यांच्या मते, "महानगरपालिकेच्या निवडणूक अनेक मूलभूत स्थानिक मुद्द्यांवर आधारित असते. या
मुद्द्यांवर मुस्लिम समाजाने अनेक वर्षापासून ज्या पक्षांना मत देऊन विजयी केले
त्यांनी फारसे काम न केल्यामुळे समाजाने ओवेसी साहेबांवर विश्वास व्यक्त करून
मतदान केले." पत्रकार सबा नकवी
यांच्या मते, 'बिहार नंतर महाराष्ट्राच्या
स्थानिक निवडणुकीत पक्षाने चांगले प्रदर्शन केले. यामागे अनेक कारणे त्यांनी
सांगितलेली आहेत. भारताच्या राजनीतीत धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा आता पूर्वी इतका
प्रभावी राहिलेला नाही. धर्मनिरपेक्षतेच्या दावा करणारे अनेक पक्ष प्रत्यक्षात
मवाळ हिंदुत्ववादाचा आधार घेताना दिसतात. अल्पसंख्यांकांच्या मनात निर्माण
झालेल्या असुरक्षिततेबाबत पर्यायी कार्यक्रमाची मांडणी करत नसल्यामुळे हिंदू
मतदारांप्रमाणेच मुस्लिम मतदार देखील धार्मिक एकत्रीकरणातच आपली सुरक्षा सामावलेली
आहे हे गृहीतक लक्षात घेऊन धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारे राजकारण करणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाच्या
पाठीमागे उभे राहिलेले दिसून येतात.' महाराष्ट्राच्या
राजकारणामध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस या पक्षाची व्होट बँक मुस्लिम समाज अनेक
वर्षांपासून राहिलेला दिसून येतो. परंतु या दोन्ही पक्षांनी मुस्लिम समाजाच्या
विकासाला पुढे आणण्यासाठी रचनात्मक कार्य न केल्यामुळे संभ्रमात असलेला
मुस्लिमांमधला फार मोठा गट ओवेसीच्या पाठीमागे उभा राहिला. त्यामुळे एआईएमआईएमच्या यशात काँग्रेस आणि समाजवादी
पक्षाचे असलेले अपयश देखील अधोरेखित होते.
महाराष्ट्राच्या
राजकारणातील सध्या काळातील सर्वात प्रभावशाली असलेला भारतीय जनता पक्ष स्वतःचा एक
विशिष्ट अजेंडा निश्चित करून त्या भोवती संपूर्ण निवडणूक फिरवण्याचा प्रयत्न करून
सातत्याने यश प्राप्त करताना दिसतो. हिंदूंचे एकत्रीकरण, मुस्लिम तृष्टीकरण सारख्या मुद्द्यांना विकासाशी जोडून
विरोधकांवर मात करताना दिसतात. धर्मनिरपेक्षतेचा दावा करणारे विरोधी पक्ष स्वतंत्र
अजेंडा मांडण्याऐवजी भाजपच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देत आपला वेळ खर्च करतात.
धर्मनिरपेक्षता की मवाळ हिंदुत्व या द्वंद्वात अडकलेला विरोधी पक्ष ना भाजपला रोखू शकतो ना आपली व्होट बँक वाचवू शकतो हे महानगरपालिका निवडणुकीत एआईएमआईएमला मिळालेल्या यशाने दाखवून दिलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box