ऋग्वेदिक काळातील राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था
भारतात आल्यावर
सप्तसिंधूच्या प्रदेशात आर्यांना स्थैर्य लाभले आणि येथूनच त्यांच्या राजकीय
जीवनास सुरुवात झाली. सुरुवातीस आर्यांच्या टोळ्या होत्या. अनेक कुटुंबांची एक
टोळी बनत असे. त्या वेळी एकत्र कुटुंबपद्धती होती. एका कुटुंबात तीन पिढ्या राहत
असत, त्या वेळी पितृसत्ताक कुटुंबपद्धत प्रचलित होती. सामान्यतः पिता हा
कुटुंबप्रमुख असे. वैदिक काळाचा कालावधी इ.स.पूर्व 1500 ते इ.स.
पूर्व 600 पर्यंत आहे. वैदिक काळाचे ऋग्वेदिक काळ आणि
उत्तर वैदिक काळ असे दोन भाग केले जातात. ऋग्वेदिक काळ इ.स.पूर्व 1500
ते इ.स. पूर्व 1000 पर्यंतचा आहे. उत्तर वैदिक काळाचा कालखंड इ.स. पूर्व
1000 ते इ.स. पूर्व 600 पर्यंत मानला
जातो. पूर्व वैदिक काळाला ऋग्वेदिक काळ असे म्हटले जाते. या काळात प्राचीन
असलेल्या ऋग्वेद ग्रंथाची रचना झालेली
असल्याकारणाने ह्या काळाला ऋग्वेदिक काळ असे म्हणतात. उत्तर वैदिक काल हा ऋग्वेदिक
कालानंतरचा काळ आहे. या काळात सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद यांची
रचना झालेली आहे. ऋग्वेद काळात अत्यंत साधारण स्वरूपाची राजकीय व्यवस्था होती.
आर्यांची शासन व्यवस्था वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागलेली दिसून येते.
1.
कुळ-कुळ म्हणजे
परिवार किंवा कुटुंब होय. ऋग्वेद काळातील सर्वात छोटी प्रशासकीय संस्था कुल किंवा
कुटुंब होती. कुळाच्या प्रमुखाला कुलप वा कुलपती म्हटले जात असे.
2.
गाव-अनेक कुल किंवा
कुटुंब मिळून निर्माण होणाऱ्या प्रशासकीय संस्थेला गाव असे म्हटले जात असे.
गावाच्या प्रधानाला ग्रामीणी असे म्हटले जात असे.
3.
विश- वैदिक काळात अनेक गावांनी मिळून निर्माण
होणाऱ्या प्रशासकीय संस्थेला विश म्हटले जाते. विशच्या प्रमुखाला विशपती असे
म्हटले जात असे.
4.
जन- अनेक विश एकत्र येऊन तयार होणाऱ्या
राजकीय संस्थेला जन असे म्हटले जात असे. ज्यांच्या प्रमुखाला राजा किंवा राजन असे
म्हटले जात असे. राजाला गोप, गोपती, जनराजन
असे म्हटले जात असे.
5.
सभा- ऋग्वेदिक काळातील जनतांत्रिक संस्थेला सभा
असे म्हटले जात असे. सभा ही एक शक्तिशाली राजकीय संस्था होती. ज्येष्ठ आणि कुलीन
वर्गातील लोकांना सभेमध्ये प्रतिनिधित्व दिले जात असे. सभा ही अत्यंत प्रतिष्ठित
संस्था असल्याकारणाने सभेने घेतलेला निर्णय बंधनकारक मानला जात असे. न्यायदान
करण्याची जबाबदारी देखील सभेकडे दिले जात असे. सभेला असलेल्या व्यापक अधिकारामुळे
सभेचा सदस्य होणे तत्कालीन काळात अत्यंत प्रतिष्ठेची बाब होती. सभा ही एक स्थायी
स्वरूपाची संस्था होती. तिचे सदस्य समितीकडून निवडले जात असल्यामुळे तिच्या अधीन
राहून कार्य करावे लागत असे. समिती संस्थेपेक्षा सभा ही अत्यंत पुरातन संस्था आहे.
ऋग्वेदकाळात सभेमध्ये स्त्रियांना देखील प्रतिनिधित्व दिले जात असे. सभेचे सदस्य
विविध विषयांवर विचार विनिमय आणि चर्चा करत असत. तत्कालीन काळातील कायदेविषयक
बाबींचे निराकरण करण्याचा अधिकार सभेला होता. सभेच्या नियमित बैठका होत असत. राजा
देखील सभेत उपस्थित राहत असत. सभेचे सदस्य राजाला राज्यकारभाराबाबत सल्ला देत असत.
राजा देखील सभेशी विचारविनिमय करून राज्यकारभार चालवत असे. राजाला देखील सभेचा
निर्णय मान्य करावा लागत होता. सभेचे निर्णय राजा आणि जनतेवर बंधनकारक होते.
6.
समिती-ऋग्वेदच्या अनेक
भागांमध्ये समिती नावाच्या संस्थेचा उल्लेख सापडतो. समिती ही सभेनंतर अस्तित्वात
आलेली संस्था आहे. समिती ही जनजाती किंवा टोळीतील सर्व लोकांची एक संस्था होती.
समितीच्या सदस्याला पार्षद तर अध्यक्षाला
ईशान असे म्हटले जात असे. समिती फक्त राजकीय विषयांपूर्ती मर्यादित नव्हती.
दार्शनिक प्रश्नावर देखील चर्चा केली जात असे. समितीचा संबंध धार्मिक अनुष्ठान आणि
प्रार्थनेची देखील होता. ऋग्वेदकालातील समिती नावाच्या जनतांत्रिक संस्थेच्या
माध्यमातून राजा निर्वाचित केला जात होता. राजावर अंकुश ठेवणे आणि त्यांना सहकार्य
करणे किंवा पुनर्नियुक्ती करणे हे समितीचे काम होते. समिती विविध विषयांवर चर्चा करून एकमताने निर्णय
घेत असे. राजाला देखील समिती समोर उपस्थित राहावे लागत असे. समितीला काही सैनिक
कार्य देखील करावे लागत असे. उदा. युद्धाची व्यूहनीती आखणी समितीत उपस्थित राहणे
राजाचे कर्तव्य होते. राजा समितीला मार्गदर्शन करणे. जनजाती संदर्भातले नियम
निर्धारित करण्याचा किंवा त्यांच्या कार्याचे नियोजन करण्याचा अधिकार देखील
समितीला होता.
7.
राजा किंवा राजन-वेदपूर्वकाळात आर्य
लोक टोळ्या करून राहत असत. टोळीचे नेतृत्व टोळी नायकाकडे असे. अनेक टोळ्या एकत्र
येऊन जन तयार होत असे. जनाच्या प्रमुखाला राजा असे म्हटले जात असे. ऋग्वेदकाळात
राजाला गोपती किंवा गोपा असे देखील म्हटले जात असे. कारण त्या काळात पशुधन हे संपत्तीचे
महत्त्वाचे साधन मानले जात असे. गाई सारख्या पशूला चलनाचा दर्जा होता. त्यामुळे
अनेकदा गाई वरून युद्ध झाल्याचे ऋग्वेदात आढळून येते. ऋग्वेदकाळात दोन मार्गाने
राजे निवडले होते. काही जनांमध्ये वंश परंपरागत पद्धतीने राजा निवडला जात असे तर
काही ठिकाणी समितीच्या माध्यमातून राजाची निवड केली जात असे. ऋग्वेदकाळात राजाला
मर्यादित स्वरूपाचे अधिकार होते. राजा अयोग्य असेल तर त्या जागेवर दुसऱ्या
व्यक्तीची राजा म्हणून निवड करण्याचा अधिकार समितीला होता. सभा आणि समिती सारख्या
प्रभावशाली संस्था राजाच्या कारभारावर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्याचे कार्य करत
असे. राजा देखील या दोन्ही संस्थांच्या मदतीने राज्यकारभार चालवत असत. राजाला
दैनंदिन राज्यकारभारात पुरोहित मदत करत असत. यज्ञ किंवा अन्य धार्मिक विधी बाबत
सल्ला आणि मदत करण्याचे काम पुरोहित करत असे. वेदकाळात पुरोहितास प्रचंड महत्त्व
असल्यामुळे राजाकडून त्याचा योग्य तो आदर राखला जात असे. सेनेची जबाबदारी असलेल्या
व्यक्तीला सेनापती असे म्हटले जात असे. शस्त्रविद्यामध्ये पारंगत असलेल्या
व्यक्तींची सेनापतीपदी निवड केली जात असे. युद्धाच्या वेळेस सेनापती राजाच्या
सैन्याचे नेतृत्व करत असत. संरक्षणासंदर्भात राजाला मदत करण्याचे हेतूने सेनापतीची
नियुक्ती केली जात असे. ऋग्वेदकाळात लोकांचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, शांतता
प्रस्थापित करणे आणि न्यायदान करणे हे राजाचे प्रमुख काम होते. प्रजेकडून धान्य
आणि इतर मार्गाने कर जमा करणे इत्यादी कार्य राजा करत असे.ऋग्वेद काळाच्या
अखेरच्या टप्प्यात राजाची सत्ता वाढू लागली. राजाला देवाचा अंश किंवा प्रतिनिधी
असे मानले जाऊ लागले. धार्मिक आणि न्यायविषयक बाबतीत देखील राजाचे अधिकार वाढले.
त्यामुळे राजे अनियंत्रित होण्यास सुरुवात झालेली दिसून येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box