शनिवार, ३० जुलै, २०२२

राजकीय विकास संकल्पना अर्थ, स्वरूप आणि विविध दृष्टिकोन Political Development Meaning, Nature and Approaches

 राजकीय विकास संकल्पना अर्थ, स्वरूप आणि विविध दृष्टिकोन: Political Development Meaning, Nature and Approaches

आधुनिक राज्यशास्त्राच्या अभ्यासात राजकीय विकास संज्ञेला फारच महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकीय परिर्वतन ही जुनी संकल्पना आहे. आधुनिक राज्यशास्त्राचा राजकीय परिवर्तनाविषयीच्या धारणा, आकलन आणि दृष्टिकोन पारंपरिक राज्यशास्त्रज्ञांपेक्षा पूर्णपणे भिन्न दिसून येतो. राजकीय परिवर्तनाविषयीचे मार्क्सवादी विश्लेषणाला नाकारून पर्यायी विकास प्रतिमान विकसित करण्यासाठी नवोदित राष्ट्रांनी पाश्चिमात्य देशातील संस्थाचा स्वीकार करून आपल्या कार्याला सुरुवात केली पण भिन्न सामाजिक वातावरण असलेल्या विकसनशील देशात पाश्चिमात्य राजकीय प्रक्रिया विशेष फायदेशीर ठरू शकल्या नाहीत. त्यामुळे त्या देशातील राजकीय प्रमुखांनी पाश्चिमात्य दृष्टीकोन वगळून एक नव्या पद्धतीचा स्वीकार करून आपले विकासविषयक कार्य करण्यास सुरुवात केली. त्यातून राज्यशास्त्रात राजकीय विकास आणि आधुनिकीकरण संकल्पना अस्तित्वात आल्या. त्यातूनच आधुनिक राज्यशास्त्राची अभ्यास मर्यादा पाश्चिमात्य देशातील प्रश्नापुरती मर्यादित न राहता नवोदित राष्ट्रांच्या राजकीय समस्याचाही अभ्यास व्हावा हा व्यापक वा उदार दृष्टिकोन निर्माण झाला.

राजकीय विकास अर्थ व व्याख्या :-

राजकीय विकास संकल्पनेवर अनेक अभ्यासकांनी अध्ययन केले आहे. जगातील विविध अभ्यासकांनी राजकीय विकासाचे भिन्न भिन्न अर्थ लक्षात घेतलेले आहेत. या अर्थाच्या आधारावर विविध व्याख्या केलेल्या आहेत त्यामुळे राजकीय विकासाच्या अर्थ आणि व्याख्याबाबत विचारवंतात एकमत दिसून येत नाही. जगातील विविध विचारवंतानी राजकीय विकासाच्या पुढील व्याख्या केलेल्या दिसतात.

१) आयसेन्टाड : सातत्याने होणाऱ्या बदलास पचविण्याची क्षमता असणारी संस्थात्मक यंत्रणा निर्माण होणे म्हणजे राजकीय विकास होय.. २) हालपर्न:- स्थायी स्वरूपाच्या क्रांतीशी जमवून घेण्याची सततची क्षमता म्हणजे राजकीय विकास होय.

३) सॅम्युएल हंटिग्टन- प्रतियोग क्षमता, गुंतागुंत, स्वायत्तता व सुसंगती या बाबतीत उच्च पातळी साधलेल्या राजकीय संस्थांची निर्मिती म्हणजे राजकीय विकास होय.

४) मेकंझी : राजकीय विकास म्हणजे समाजाच्या उच्चस्तरीय अनुकुल असणाऱ्या बाबींविषयीची अनुकूलता असण्याची क्षमता होय.

राजकीय विकासाचे विविध दृष्टिकोन :-

राजकीय विकास संकल्पनेबाबत विचारवंतामध्ये एकमत नाही. राजकीय विकासाचे विविध दृष्टिकोनविचारवंतांनी विशद केलेले आहेत ते पुढीलप्रमाणे होत.

१) राजकीय विकास म्हणजे आर्थिक विकासाचे साधन :- राजकीय परिस्थिती आर्थिक विकासाला कारणीभूत असते. आर्थिक विकास साध्य करण्यासाठी अगोदर राजकीय विकास आवश्यक आहे असे मानले जाते पण हा राजकीय विकासाचा नकारात्मक अर्थ आहे. प्रत्येक समाजाचे आर्थिक प्रश्न निरनिराळे असतात आणि त्या संदर्भात जर आपण राजकीय विकासाचा विचार करु लागला तर राजकीय विकास समाजपरत्वे भिन्न भिन्न स्वरूपाचा होऊ शकतो. अविकसित देशात आर्थिक बाबींपेक्षा राजकीय बाबींना जास्त महत्त्व असते. या देशातील लोकांचे लक्ष राजकीय विकासाकडे जास्त असते की जो आर्थिक विकासापासून स्वतंत्र असतो. म्हणून राजकीय विकास ही संकल्पना आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून मांडली जाते.

 २) राष्ट्रराज्याचा विकास म्हणजे राजकीय विकास :- राष्ट्रराज्याची बांधणी म्हणजे राजकीय विकास असे ही म्हटले जाते. पारंपरिक काळात राज्य ही संस्था एक तांत्रिक संरचना मानली जात होती. राज्याची कार्य देखील मर्यादित होती. परकिय आक्रमणापासून संरक्षण आणि कायदा व सुव्यवस्था राखणे इतपत राज्याची भूमिका मर्यादित होती म्हणून राज्याबद्दल जनतेत फारशी आत्मीयता नव्हती. आधुनिक काळात राष्ट्र राज्याची संकल्पना उदयाला आली आहे. राष्ट्र या संकल्पनेतून राज्याविषयी जनतेत आत्मीयता व जिव्हाळा निर्माण झालेला आहे. राष्ट्र राज्य संकल्पनेमुळे जनतेत राष्ट्रासाठी त्याग करण्याची वृत्ती निर्माण झालेली आहे. राष्ट्र राज्य संकल्पनेच्या माध्यमातून जनतेला राजकीय सहभाग आणि राजकीय विकासात भागीदारी देणे शक्य झालेले असल्यामुळे राष्ट्रराज्याच्या राजकीय संस्थाच्या संदर्भात चालणारे राजकारण म्हणजे राजकीय विकास मानला जातो.

३) राजकीय विकास म्हणजे आधुनिकीकरण :- आधुनिक काळात औद्योगिकदृष्टया प्रगत व विकसित राष्ट्र निर्मिती म्हणजे राजकीय विकास हा विचार मांडला जातो. कारण पाश्चिमात्य देशांनी औद्योगिकीकरण आणि नागरीकरणाच्या माध्यमातून राजकीय विकास साध्य केलेला आहे. पाश्चिमात्य देश औद्योगिकदृष्टया संपन्न आणि पुढारलेले आहेत. पाश्चिमात्य देशातील औद्योगिकीकरण आणि नागरीकरणातून नवीन राजकीय प्रथा आणि परंपरा विकसित झालेल्या आहेत. म्हणून राजकीय विकासाची संकल्पना आधुनिकीकरणाच्या माध्यमातून मांडली जाते. राजकीय आधुनिकीकरण झालेल्या देशात कायदे, नियम राजकीय संस्थांना अतिशय आधुनिक व प्रगत स्वरूप प्राप्त केलेले दिसते तिसऱ्या जगातील बहुसंख्य देशांनी राजकीय विकासाचा हाच मार्ग अवलंबिलेला दिसतो.

४) राजकीय विकास म्हणजे प्रशासकिय व वैधानिक विकास :- राजकीय व्यवस्थेजवळ सार्वजनिक प्रश्नांचे निराकरण करण्याची क्षमता असली पाहिजे. सार्वजनिक प्रश्नाचे निराकरण करण्याची क्षमता असलेल्या राजकीय व्यवस्थेला विकसित मानता येणार नाही. आधुनिक काळात सार्वजनिक आणि सामुदायिक प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी सर्व राजकीय व्यवस्थेत प्रशासकिय आणि वैधानिक यंत्रणाची निर्मिती केलेली आहे. पारंपरिक काळातील प्रशासकीय यंत्रणा आणि संस्था अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या कार्य करत होत्या त्यांचे कार्य कायदा व सुव्यवस्था आणि परकिय आक्रमणापासून संरक्षण एवढ्यापुरते मर्यादित होते. पाश्चिमात्य देशात उदयाला आलेल्या कल्याणकारी राज्य संकल्पनेमुळे जनकल्याणासाठी नव्या नव्या प्रशासकीय यंत्रणा आणि वैधानिक व्यवस्थाची निर्मिती करण्यात आलेली आहे. पाशीमात्य देशाच्या प्रभावामुळे तिसऱ्या जगातील देशात नव्या नव्या प्रशासकीय व वैधानिक व्यवस्था अस्तित्वात आल्या व त्यांचा अजूनही विकास होत आहे. त्यामुळे प्रशासकीय व वैधानिक विकासाला राजकीय विकास म्हटले जाते.

५) राजकीय विकास म्हणजे लोकांचा सहभाग :- जनता सहभाग आणि विकासात भागीदारीतून राजकीय विकास हा राजकीय विकासाचा आधुनिक दृष्टिकोन आहे. राजकीय जागृतता आणि नागरीकत्वाच्या भावनेचा विकास होणे राजकीय विकासासाठी अनिवार्य आहे. जनता राजकीयदृष्टया जागृत झाल्याशिवाय दैनंदिन प्रशासनात सहभाग घेणार नाही जनसहभागाशिवाय कोणतीही व्यवस्था विकसित होणार नाही. खन्या अर्थानि जनता राजकीय विकासात सक्रिय होईल तेव्हा शासनाला देखील जनताभिमुख बनण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आधुनिक काळात जगातील बहुसंख्य देशांनी लोकशाही शासनप्रणालीचा स्वीकार केलेला आहे तरीही अपेक्षित राजकीय विकास दिसून येत नाही. जनता आंदोलने, उपोषणे, संप, बंद, हरताळ मार्गाचा अवलंब करून राजकीय सहभाग घेतील तर विकासाच्या मार्ग सूकर होण्याऐवजी बिकट होईल. जनतेचा राजकीय सहभाग हा सकारात्मक असला पाहिजे राजकीय व्यवस्थेला अडचणीचा ठरता कामा नये म्हणून आधुनिक काळात जनसहभागातून राजकीय विकास हा दृष्टिकोन मांडला जातो. या दृष्टिकोनानुसार राजकीय विकासासाठी जनतेची सक्रिय भागीदारी अपेक्षित केली जाते.

६) राजकीय विकास म्हणजे लोकशाहीकरण- लोकशाही हा अंत्यत प्रगत शासन प्रकार मानला जातो. जगातील जवळजवळ सर्वच राष्ट्रटांनी लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. लोकशाहीला बळकटी आणून देण्याची प्रक्रिया आहे तिला राजकीय विकास म्हणतात. लोकशाही ही शासनप्रणाली नसून जीवनप्रणाली आहे हा विचार विकसित करणे राजकीय विकासासाठी आवश्यक मानले जाते. लोकशाही मूल्यांची समाजात रूजवणूक करणे राजकीय विकासाकरिता अपरिहार्य मानले जाते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या लोकशाही मूल्यावर जनतेची निष्ठा असली पाहिजे. म्हणूनच जगातील लोकशाहीवादी देश लोकशाही मूल्यांचा सर्वत्र प्रसार करण्याचा प्रयत्न करतात. हुकूमशाही जुना व अपरिपक शासन प्रकार आहे. राजकीय विकासाच्या संदर्भात लोकशाही शासनप्रकार उत्तम मानला जातो. त्यांची वाढ व बळकट करणे म्हणजे राजकीय विकास होय.

७) राजकीय विकास म्हणजे स्थैर्य- स्थैर्य हा राजकीय विकासाचा महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. लोकशाही शासन प्रकार कितीही चांगला असला जरी त्याला स्थैर्य नसेल तर त्या देशाचा विकास होऊ शकणार नाही. जलदगतीने देशाचा विकास करायचा असेल तर राजकीय आणि आर्थिक स्थैर्याची गरज असते. स्थैर्य असेल तर दूरगामी धोरणे आखून नियोजनपूर्वक आणि मुल्यवस्थिपणे देशाचा विकास घडवून आणता येतो. अर्थात राजकीय विकासाचा संबंध स्थैर्याशी जोडतांना स्थिरता राजकीय विकासाला कितपत सहाय्य करते याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. स्थैर्य म्हणजे राजकीय विकास हे समीकरण अनेकदा फसवे ठरलेले आहे.

८) राजकीय विकास म्हणजे शासकिय शक्ती- राजकीय विकास राजकीय सत्तेची सूत्रे असलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा फार मोठा वाटा असतो. राज्यकारभार ज्यांच्या हातात असतो त्यांची शक्ती म्हणजे राजकीय विकासाचे मुख्य साधन होय. जुन्या काळात शासकीय शक्तीचे एकाच व्यक्तीच्या हातात केंद्रीकरण असतानाही राजकीय विकास झाला नाही कारण शासकीय शक्तीत सामान्य जनतेला अजिबात वाव नव्हता. युरोपातील प्रबोधन युगानंतर लोकांनी शासकीय शक्तीत सहभाग दर्शविण्यास प्रारंभ केला. राज्यकत्र्यावर्गाला शासकीय शक्ती जनहितासाठी दिलेली आहे या दृष्टिकोनाच्या प्रसारानंतर मोठया प्रमाणावर शासकीय शक्तीने जनविकासाच्या योजना हातात घेऊन राजकीय विकासाला वेग दिला. औदयोगिकरणामुळे निर्माण पोस्ट, तार, रेल्वे आणि दळणवळणसाधनांच्या विकास इ. भौतिक सुधारणामुळे शासनाला आपली शक्ती अधिक विस्तृत करता आली. त्यामुळे राजकीय विकासाला अनुकूल परिस्थिती आधुनिक काळात निर्माण झालेली दिसते.

९) राजकीय विकास म्हणजे विविध साधनांची जुळवाजुळव :- राजकीय व्यवस्था समाजभिमुख आणि समाजविकासास लाभदायक असली पाहिजे असे आधुनिक काळात मानले जाते. समाजविकासाच्या दृष्टीने लोकशाही शासनप्रणाली अपुरी आहे असे काही विचारवंताना वाटते त्यांनी कार्यक्षमतेच्या आधारावर शासन संस्थेने आणि राजकीय विकासाचे काही नमूने विकसित केलेले आहे. बलशाली राजवटीत निर्णय घेणाऱ्या शक्ती बलसंपन्न असतात. देशात उपलब्ध असलेली साधनसामुग्री जास्तीत जास्त प्रमाणात एकत्र करून त्याचा पुरेपूर उपयोग करण्याची शक्ती म्हणजे राजकीय विकास मानला जातो. परंतु आधुनिक काळात लोकशाही शासनव्यवस्थेत लोकांच्या संमती व सहकार्याने साधनसामुग्रीची जुळवाजुळव हुकूमशाहीपेक्षा अधिक प्रभावीपणे करताना दिसतात.

१०) राजकीय विकास म्हणजे सामाजिक बदल- सामाजिक हे अनेकदा राजकीय विकास घडवून आणतात. समाजातील वेगवेगळया दिशेने होणान्या बदलाचा राजकीय विकासावर निश्चितपणे परिणाम होत असतो. समाजातील आर्थिक व सामाजिक रचना राजकीय विकासाला कारणीभूत ठरत असतात. समाजव्यवस्थेत ज्या मार्गाने बदल होत जाईल त्या मागनि राजकीय विकास साधला जाईल म्हणून राजकीय म्हणजे सामाजिक बदल असे मानले जाते.

अशा  प्रकारे राजकीय विकासाचे विविध दृष्टिकोन सांगता येतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...