मंगळवार, १९ जुलै, २०२२

राजकीय नेतृत्वाची वैशिष्टये व गुण Political Leadership Merit and Characteristics

 

राजकीय नेतृत्वाची वैशिष्टये व गुण :-

Political Leadership Merit and Characteristics 

नेतृत्व ही संकल्पना समाजाशी निगडित असली तरी नेतृत्व हे व्यक्तिग स्वरूपात विकसित होत असते. व्यक्ती व्यक्तीतील जवळीक आणि तिच्यातीलगुणांचा समुच्चय यावरून नेतृत्वाचे विकसित होणे अवलंबून असते. नेतृत्व ही गतिशील प्रक्रिया असल्यामुळे नेतृत्व विकसनासाठी पुढील वैशिष्टये वा गुण आवश्यक मानले जातात.

१) गुणसमुच्चय :- नेतृत्वासाठी आवश्यक गुणांची यादी अनेक अभ्यासकांनी आपआपल्या धारणेनुसार केलेली आढळते. प्रत्येक अभ्यासक आपआपल्या मतानुसार गुणांना कमी अधिक महत्त्व देत असले तरी काही गुणाबाबत मतैक्य आढळून येते. प्रबल इच्छाशक्ती, धाडस, निग्रह, भविष्याकडे पाहण्याची वृत्ती, संवेदनशीलता, स्पष्ट विचार, समूहमनाची ओळख, निःपक्षपातीपणा, नैतिक चारित्र्य, समूहाच्या आशा आकांक्षा व्यक्त करण्याची क्षमता, छाप पाडणारा आवाज, वक्तृत्व कौशल्य इत्यादी गुण नेत्यामध्ये असणे आवश्यक असते. स्वत:च्या रागलोभ मोहमाया इत्यादी विकारांवर नियंत्रण ठेवता येणेही यशस्वी नेतृत्वासाठी आवश्यक मानले जाते. सर्वसामान्य जनतेप्रमाणे हताश व निराश होऊन चालत नाही. संकटकाळात जनता नेत्याकडे अपेक्षेने पाहत असते. त्या अपेक्षांना नेतृत्व मूर्त स्वरूप देऊ शकत नसेल तर जनता नेत्यांप्रति नाराज होण्याची वा पाठिंबा काढण्याची शक्यता असते. म्हणून नेत्यामध्ये विविध सद्गुणाचा समुच्चय असला पाहिजे त्यांच्या जोरावर तो कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीवर मात करण्याची क्षमता मिळवू शकतो.

२) पर्यावरण व परिस्थिती :- व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व आणि सभोवतालचे भौतिक आणि सामाजिक पर्यावरण यांच्यात सतत आंतरक्रिया सुरू असते. नेतृत्वाचे सुप्त गुणांना पैलू पाडण्याचे कार्य पर्यावरणाद्वारे होत असते. व्यक्तीच्या नेतृत्व गुणांना प्रेरणा देण्याचे कार्यही पर्यावरण करत असते. राजकीय नेत्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास फ्राईडच्या मनोविश्लेषण पद्धतीचा वापर करून हॅरोल्ड लास्वेलने केला आहे. त्यांच्या मते लिंकनच्या नेतृत्वाच्या मुळाशी बालपणी त्याच्या वाटयाला आलेला संतुलित सुरक्षिततेचा व प्रेमाचा अभाव ही कारणे होती. प्रौढपणीही ही असुरक्षितपणाची भावना लिंकनच्या व्यक्तिमत्त्वात कायम होती आणि प्रेम जिव्हाळा यांची भरपाई करण्याच्या प्रयत्नाच राष्ट्रपतिपदावरून त्याने केलेल्या अरेरावीतून व्यक्त होता. राजकीय नेतृत्वाच्या जडणघडणीत पर्यावरणाचा सर्वात मोठा वाटा असतो. योग्य पर्यावरण नेतृत्वाला बहरू शकते तर अयोग्य पर्यावरण नेतृत्व नष्ट करू शकते म्हणून राजकीय नेतृत्वाचा दर्जा व कार्याचा अभ्यास करतांना स्थल-काल-परिस्थिती विचारात होणे आवश्यक आहे.

३) असामान्यत्व व सामान्यत्व :- राजकीय नेतृत्वामध्ये आपल्या सहकान्यापेक्षा किंवा इतरापेक्षा चागल्या प्रकारे करू शकतो किंवा सामाजिक पर्यावरणावर प्रभाव टाकू शकतो ही असामान्यत्वाची जाणीव अलौकिक कामगिरी पार पाडू शकतो. हे असामान्यत्व अनुयायाच्या प्रतिसादातून अधिक भक्कम होत असते. नेत्याला मिळणाऱ्या प्रतिसाद आणि अनुयायांच्या पाठिंबातून दिव्यवलयी नेतृत्वाची निर्मिती होत असते. नेतृत्वात असमान्यत्व आवश्यक असले तरी सामान्यांच्या पातळीवर उतरून परिस्थिती यथायोग्य जाणीव करून घेण्यासाठी नेत्याचे सामान्यत्व कायम ठेवणे गरजेचे असते. कारण परिस्थितीचे आकलन झाल्याखेरीज कार्याची प्रभावी आखणी करू शकत नाही. कार्याच्या यशाशिवाय जनमताचा पाठिंबा नेतृत्वाला मिळू शकत नाही. म्हणून नेतृत्वाच्या ठिकाणी असामान्यत्व आणि सामान्यत्व असणे गरजेचे असते.

४) संधी :- संवेदनक्षम नेत्याला सभोवताली घडणाऱ्या घडामोडीचे ज्ञान असणे आवश्यक असते. त्याला समूहाशी सहज संवाद साधता आला पाहिजे, जनसामान्यांशी निगडीत प्रश्नांना प्रभावी वाचा फोडता आली पाहिजे. प्रतीक निर्मिती करता आली पाहिजे या सर्वांचा वापर करून योग्य संधी नेता निर्माण करू शकतो. संधी न मिळाल्यास नेतृत्व गुणांचा अविष्कार होऊ शकत नाही. संधी प्रत्येक वेळेस आपोआप निर्माण होण्याची शक्यता नसल्याने नेतृत्वाने स्वतःमधील कौशल्य व ज्ञानाचा वापर करून अचूक संधी निर्माण केली पाहिजे त्यासाठी नेतृत्वात निर्णय क्षमता आणि भविष्याकडे पाहण्याची अचूक क्षमता असणे गरजेचे आहे. या क्षमतेच्या आधारावर नेतृत्व संधीचे रूपांतर यशात करू शकतो.

५) सहानुभूती :- सहानुभूती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीची भूमिका तिच्या दृष्टिकोनातून समाजावून घेण्याची क्षमता होय. नेत्याच्या अंगी जर ही क्षमता नसेल तर तो मार्गदर्शन करणे, प्रेरणा देणे, दुय्यम सहकाऱ्यांकडून माहिती मिळविणे यापैकी काहीही करू शकणार नाही आपल्याला अमूक गोष्ट कशी वाटते यापेक्षा ज्यांच्यावर या गोष्टीचा परिणाम होणार आहे त्यांनी ती कशी वाटते याचा अचूक अदमास घेऊन नेतृत्व करणाऱ्या नेत्याला व्यक्तीची सहानुभूती प्राप्त करता येऊ शकते. आपल्यासंबंधी इतराच्या धारणेच्या आधारावर नेतृत्व परिस्थितीचे योग्य आकलन करून योग्य निर्णय अंमलात आणू शकतो. सहानुभूतीच्या आधारावर तो जनतेला प्रभावित करून आपली अधिमान्यता विकसित करू शकतो.

६) वस्तुनिष्ठता :- उत्तम नेतृत्वासाठी व्यक्तिगत संबंधात वस्तुनिष्ठता सांभाळता येणे गरजेचे असते. प्रत्येक व्यक्ती वर्तनामागे निश्चित काहीतरी हेतूअसतो. व्यक्तीच्या वर्तनांची योग्य कारणमीमांसा करून त्यांच्या वर्तनाचे योग्य आकलन केले तर नेतृत्व अनुयायी व आपल्याला पाठिंबा देण्याचे हेतू लक्षात घेऊ शकतो त्या आधारावर तो वस्तुनिष्ठ निर्णय घेऊ शकतो. परंतु वस्तुनिष्ठताचे आकलन व कारणमीमांसा करणे सोपे नसते. इतरांच्या वर्तनाला आपला प्रतिसाद सामान्यतः भावनिक असतो. वाढत्या कार्यभाराच्या बोजामुळे नेतृत्वाला दुय्यमांच्या वर्तनाचा वस्तुनिष्ठ व तटस्थपणे अभ्यास करणे शक्य नसले तरी उत्तम नेतृत्वाला सहानुभूती आणि वस्तुनिष्ठता यांच्या संतुलन राखून कार्य पार पाडावे लागते अन्यथा अनुयायी नेतृत्वाच्या सत्ता व प्रभावाचा वापर करून आपले नेतृत्व प्रस्थापित करू शकतो किंवा मनमानीपणे वागून नेतृत्वाला बदनाम करू शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...