शुक्रवार, १५ जुलै, २०२२

राजकीय संसूचन अर्थ, व्याख्या, स्वरूप, विशेषतः आणि कार्य Political Communication Meaning, Definition, Nature, Specialty and Function

 

राजकीय संसूचन अर्थ, व्याख्या, स्वरूप, विशेषतः आणि कार्य

Political Communication Meaning, Definition, Nature, Specialty and Function

राजकीय संसूचन म्हणजे काय? :

राजकीय संसूचन राजकीय व्यवस्थेचा महत्त्वपूर्ण आधार मानला जातो. राजकीय संसूचनाशिवाय राजकीय व्यवस्था निर्माण होऊ शकत नाही राजकीय संसूचनाच्या माध्यमातून समाज आणि राजकीय व्यवस्था एकमेकांशी जोडल्या जातात. प्राचीन काळी दवंडी देऊन किंवा राजदूत मार्फत राज्यकर्ता वर्ग जनतेपर्यंत संदेश पोहचविण्याचा प्रयत्न करीत असत. आधुनिक काळात शासन व्यवस्थेला अधिमान्यता मिळविण्यासाठी संसूचन माध्यमाच्या माध्यमातून अनुकूल लोकमत निर्मितीचा प्रयत्न केला जात असतो. त्यामुळे संसूचन ही राजकीय व्यवस्थेचे आवश्यक गरज मानली जाते. राजकीय व्यवस्थेच्या रचनेचा अभ्यास करतांना व्यवस्थेच्या रचनेमध्ये वेगवेगळे विभाग असतात. या विभागाना संसूचन माध्यमाच्या माध्यमातून एकमेकांना जोडले जाते.

 आधुनिक काळात राजकीय संसूचनाचे महत्त्व मोठया प्रमाणावर वाढलेले आहे. आधुनिक काळात राजकीय संसूचनाच्या प्रचंड विस्तारामुळे राजकीय माहितीचे देवाणघेवाण जलद रीतीने होत असल्यामुळे व्यक्तीमध्ये मोठया प्रमाणावर राजकीय जागृती हो आहे. वाढत्या राजकीय आकलनातून राजकीय सहभागाचे प्रमाण वाढत आहे यांचे मुख्य कारण म्हणजे राजकीय संसूचन माध्यमाचे वाढते महत्त्व आहे. राजकीय संसूचन अर्थ व व्याख्या :-

'संसूचन' ला 'संचार' वा 'संचारण' या नावानी संबोधिले जाते. संसूचनाशिवाय मानवी जीवनाची कल्पना अशक्य आहे. राजकीय संसूचन म्हणजे राजकीय व्यवस्थेशी संबंधित वैचारिक आदानप्रदानाला राजकीय संसूचन म्हटले जाते. राजकीय संसूचन संकल्पनेमुळे राजकीय प्रक्रिया समजून घेणे सुलभ बनलेले आहे. व्यवस्थेचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व्यक्तीव्यक्तीतील संसूचन महत्त्वाचे असते. व्यक्ती स्वतःचे हितसंबंध गटाच्या माध्यमातून व्यक्त करतात. परस्परविरोधी हितसंबंधातून गट संघर्ष अस्तित्वात आल्यानंतर निर्णय केंद्राशी विविध व्यक्ती व गट संपर्क साधतात. समान हितसंबंध असणाऱ्या गटांशी संपर्क साधण्यात येतो व स्वतःच्या हितसंबंधाचे महत्त्व वाढविण्यात येते. निर्णय घेणाऱ्या व्यक्ती परस्परविरोधी गटांशी विचारविनिमय किंवा तडजोड समन्वय घडवून आणतात. तसेच निर्णयाची अंमलबजावणीसाठी शासन व जनता संपर्क साधण्याची आवश्यकता असते. या सर्व प्रक्रियेत वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी राजकीय संसूचनाची आवश्यकता असते.

१)   रूस व अल्थ्रॉफ :- राजकीय दृष्टया सुसंगत माहितीचे राजकीय व्यवस्थेच्या एका भागातून दुसऱ्या भागाकडे संचलन करणे म्हणजे राजकीय संसूचन होय.

२) रिचर्ड रोझ:- राजकीय व्यवस्थेतील भिन्न भिन्न घटकांना जोडणारा दुवा म्हणजे राजकीय संसूचन होय..

(३) ल्यूशियन पाय:- राजकीय संसूचन राजकीय व्यवस्थेतील अशी यंत्रणा आहे की राजकीय मानवाद्वार ग्रहण केलेल्या संदेश व संकेतला की व्यवस्थेपर्यंत पोहचविण्याचे कार्य करत असतो.

राजकीय संसूचनाला राजकीय व्यवस्थेतील विविध घटक आणि अवयवांना जोडणारा दुवा मानले जाते. साधारणत: राजकीय व्यवस्थेत राजकीय संसूचन दोन प्रकारे असू शकते. आडवे संसूचन (Horizontal) आणि उमे संसूचन (Vertical) आडवे संसूचन म्हणजे दोन समान स्थानातील व्यक्ती होणारे संसूचन होय. उदा. दोन विविध विभागातील मंत्री वा सचिवामध्ये होणारे संसूचन तर उभे संसूचन म्हणजे राजकीय दर्जा असमान असणाऱ्या व्यक्तीतील संसूचनाला उभे संसूचन असे म्हणतात. उदा. राज्यांच्या मुख्य सचिवाने जिल्हाधिकाऱ्याशी केलेली चर्चा होय.

राजकीय संसूचनाचे स्वरूप आणि विशेषत:

राजकीय संसुचनाच्या स्वरूपाबद्दल विविध अभ्यासकांनी मते मांडलेली आहेत. त्यांच्या मतामध्ये विविधता दिसून येते. विविध अभ्यासकांनी विभिन्न आधाराच्या आधारावर राजकीय संसूचनाच्या स्वरूपाविषयी मते व्यक्त केलेली आहे. जेम्स मोजेल यांनी संसूचनाचे अध्ययन राजकीय सामाजीकरणाच्या संदर्भात केले नोरबर्ट वीनर यांनी संसूचनाची व्याख्या सैद्धांतिक आधारावर प्रस्तुत करतो तर विल्मर संसूचनाच्या विकास प्रक्रियेचे अध्ययन करतात याचा अर्थ विविध अभ्यासक राजकीय संसूचनाच्या विविध पैलूच्या अध्ययनावर भर देतात त्या अभ्यासकांच्या विचाराचा आधारावर या प्रक्रियेची पुढील विशेषतः मांडता येतात.

१)   राजकीय संसूचनाचा संबंध राजकीय व्यवस्थेशी असतो.

२) राजकीय संसूचन राजकीय व्यवस्था गतिशील बनवत असते या ग सकारात्मक आणि नकारात्मक रूपे असतात.

३) राजकीय संसूचन राजकीय अभियंत्रणाशी जुडलेले असते. संसूचन यंत्रणेच्या माध्यमातून विभिन्न राजकीय संरचनापर्यंत सूचनांचे आदानप्रदान केले जाते.

४) राजकीय ससूचनामुळे धोरण क्रियान्विय करण्यासाठी अपेक्षित प्रेरणा व्यक्तीत निर्माण केल्या जातात.

५) राजकीय ससूचन दुहेरी स्वरूपाचे कार्य करत असते. राजकीय व्यवस्थेकडून आलेल्या सूचना जनतेपर्यंत पोहचविणे आणि जनतेच्या प्रतिक्रिया राजकीयः व्यवस्थेपर्यंत पोहचविणे हे कार्य करत असते.

६) राजकीय संसूचन प्रक्रियेत आदेश आणि निर्देशाचे वितरण वरून खाली होत तर तथ्य आणि आकडे खालून वर पोहचविले जातात.

७) राजकीय संसूचन राजकीय आधुनिकीकरणाच्या विकास आणि सीमाचे निर्धारण करत असते.

८) राजकीय संसूचनाद्वारे शासकीय ध्येयधोरणाची माहिती प्रशासकीय संघटना आणि विभागाना दिली जाते.

९) राजकीय संसूचन प्राचीन आणि आधुनिक दोनही प्रकारच्या समाजात अस्तित्वात होते परंतु संख्यात्मक आणि गुणात्मक फरक होता.

१०) राजकीय व्यवस्थाद्वारे घेतलेले निर्णय राजकीय संसूचन व्यक्ती पर्यंत पोहचवत असते. राजकीय व्यवस्थेचे निर्णय चक्र व्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी संसूचन यंत्रणा आदान प्रदान आणि प्रत्यादान यंत्रणेला पूरक कार्य करत असते.

अशा प्रकारे राजकीय संसूचन यंत्रणेचे स्वरूप विशेषतः दिसून येतात.

राजकीय संसूचनाचे कार्य:-

राजकीय संसूचनामुळे राजकीय व्यवस्थेतील भिन्न भिन्न घटकात संबंध प्रस्थापित होतात व सर्व व्यवस्था एकाच दिशेने कार्य करू शकते. विविध पातळीवरील शासनसंस्थात राजकीय संसूचनामुळे शक्य होते. राजकीय संसूचन Horizontal Vertical ह्या दोन प्रकारचे असते. समान स्थानावरील व्यक्तीतील संसूचनास Horizontal संसूचन म्हणतात तर असमान दर्जाल म्हणजे नेता व अनुयायी यातील संसूचन Vertical राजकीय संसूचन असते. राजकीय संसूचन हे व्यवस्थेच्या स्थिरतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी राजकीय संसूचनाला पुढील कार्य पार पाडावी लागतात.

१) व्यवस्थेच्या विविध भागात समन्वय घडवून आणणे :- राजकीय व्यवस्थेच्या अंतर्गत अनेक उपव्यवस्था अस्तित्वात असतात. त्या उपव्यवस्थेत समन्वय नसेल तर व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होऊ शकतो. उदा. संसदेत कायदेनिर्मितीसाठी विविध समित्या अस्तित्वात असतात. त्या समितीत समन्वय नसल्यास कायदे निर्मितीच्या कार्यावर विपरित परिणाम होईल. राजकीय व्यवस्थेत संघर्ष निर्माण झाल्यास त्यांचे निराकरण करावे लागते. संघर्ष निराकरण करण्याचे माध्यम म्हणून संसूचन कार्य करित असते. विविध व्यवस्थेत निर्माण झालेले संघर्ष त्या व्यवस्थेचे प्रतिनिधी प्रत्यक्षात चर्चा करून संघर्षाचे निराकरण करू शकतात आणि हे राजकीय संसूचनामुळे शक्य असते. राजकीय सूसंचनाच्या अभावातून संघर्ष तीव्र रूप धारण करू शकतात. उदा. कामगार व मालक योग्य संसूचनाच्या अभावामुळे संघर्षातून संपासारख्या साधनाचा वापर करून कामगार कारखान्यातील उत्पादन थांबवू शकतात, व्यवस्थेतील एकजिनसीपणा हा योग्य संसूचनामुळे अस्तित्वात येत असतो. योग्य संसूचनाच्या अभावातून व्यवस्थेतील एकजिनसीपणा नष्ट होऊ शकतो या दृष्टीने राजकीय संसूचन यंत्रणेचे महत्त्व लक्षात येते.

२) उपव्यवस्था संगोपनाचे कार्य:- लोकांच्या राजकीय सामाजीकरणाद्वारे व्यवस्थेचे संगोपन करण्याचे प्रयत्न प्रत्येक राजकीस व्यवस्थेत होत असतो. राजकीय सामाजीकरण व राजकीय संसूचन यांचा जवळचा संबंध असतो. कुटुंब, शाळा, धर्म इ. च्या प्रभावामुळे तुटक राजकीय संस्कृती निर्माण झाल्यास त्या तुटकतेतून एक नवी राजकीय संस्कृती निर्माण करण्याचे कार्य संसूचन करत असते. उदा. स्वतंत्र भारतात प्रादेशिक भाषेतील शिक्षण, वत्तृपत्र आणि प्रादेशिक भाषेतील चित्रपटामुळे स्वतंत्र भारतात प्रादेशिक भाषेचा विकास झाला. स्वतंत्र भारतात प्रादेशिक भाषा विकासामुळे प्रादेशिक निष्ठा वाढल्या. भाषावाद, भाषावार प्रांत रचना व प्रादेशिक भाषा शिक्षणाचे माध्यम असल्याने राष्ट्रीय एकात्मतेत अडथळे निर्माण होतात. अशा परिस्थितीत राष्ट्रीय एकतेची जाणीव निर्माण करण्यासाठी राजकीय संसूचन माध्यमे उपयोगात आणली जातात. त्यासाठी प्रजासत्ताक दिन, नेत्याच्या जयंत्या, विकास प्रकल्पाचे उद्घाटन, राष्ट्रीय इमारतीची कोनशिला इ. गोष्टीतून विविधतेतून एकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच राजकीय संसूचनामुळे जशी तुटकता निर्माण होते त्याप्रमाणे व्यवस्थेत एकात्मता विकसित होऊ शकते.

३) व्यवस्थेची कार्यक्षमता वाढविणे :- सर्व राजकीय व्यवस्था उपलब्ध साधनसंपत्ती व मानवी संसाधने याचा समाजकल्याणासाठी वापर करण्यासाठी प्रयत्नरत असतात. त्यासाठी समाजातील व्यक्तीच्या प्रवृत्ती बदल्याव्या लागतात. त्यादृष्टीने विचार करता राजकीय संसूचन हे महत्त्वाचे माध्यम मानले जाते. व्यवस्थेची कार्यक्षमता व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. व्यक्ती हीच राजकीय व्यवस्थेचा खरा आधारस्तंभ असते. आत्मंडच्या मते कार्यक्षमतेतील वाढ जनता ससूचन माध्यमाचा समाजातील सर्व स्तरात शिरकाव, राजकीय पक्षाद्वारे. नवीन दृष्टिकोनाचा प्रसार व मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक उपाययोजना इत्यादीवर अवलंबून असते. उदा. भारतात आर्थिक नियोजन यशस्वी करावयाचे असेल तर •साधनसामुग्रीच्या वापराबरोबर हिंदू मुस्लिमानाच्या दृष्टिकोणात व प्रवृत्तीत बदल घडवून आणावा लागेल ते काम संसूचन माध्यमाद्वारे पार पाडावे लागते. यासोबत प्रशासन व्यवस्थेतील कार्यक्षमता किंवा राजकीय प्रक्रियेतील निर्णय घेण्याची कार्यक्षमता संसूचनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. राजकीय संसूचन साधनाची मोठया प्रमाणावर उपलब्धता विशाल आणि गुंतागुंतीच्या प्रशासन व्यवस्था योग्य रीतीने राबविणे शक्य असते.

४) नियम निर्मितीचे कार्य :- संसूचनाचे कार्य म्हणजे रूमांतराचे कार्य असते. समाजातील कच्चा मालाचे रूपांतर पक्का मालात करणे आवश्यक असते. ते काम संसूचन करत असते. लोकांच्या विविध मागण्या स्पष्ट करून धोरण विषयक निर्णय घेणे हे महत्त्वाचे काम असते. त्यामुळे लोकांच्या मागण्या योग्य रितीने स्पष्ट होणे आवश्यक असते. त्यावर निर्णय प्रक्रिया अवलंबून असते. जनतेच्या मागण्या निर्णय केंद्रापर्यंत योग्य रितीने पोहचवाव्या लागतात. त्या कार्यात संसूचन माध्यमाची प्रमुख भूमिका पार पाडतात. निर्णय केंद्रापर्यंत माध्यमानी न पोहचविल्यास निर्णय केंद्रास मागण्याचे आकलन होत नाही. उदा. आणीबाणीच्या काळात प्रसार माध्यमावर इंदिरा गांधीनी कडक नियंत्रण ठेवल्यामुळे त्यांना लोकमताचा अंदाज येऊ शकला नाही त्यांचा परिणाम त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. म्हणून निर्णय केंद्रापर्यंत नीट जाणे आवश्यक असते यात संसूचन माध्यमाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. उदा. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी पुरेशी स्पष्ट असली तरी राष्ट्रीय पातळीवरील निर्णय केंद्रापर्यंत मध्यस्थ माध्यमातून पुरेशी स्पष्ट न झाल्याने निर्णय केंद्राने संयुक्त महाराष्ट्रा ऐवजी द्विभाषिक मुंबई राज्याचा पर्याय पुढे ठेवला त्यातून महाराष्ट्रात काँग्रेसविरुद्ध वातावरण निर्माण झाले.

५) लोकशाही व्यवस्था सुकर बनविणे :- संसूचनाचे महत्त्व सर्वच व्यवस्थात असले तरी लोकशाही ते सर्वाधिक असते. लोकशाहीत संसूचनाला जास्त महत्त्व असते. जनतेचा राजकीय सहभाग किती व कशा प्रकारचा आहे यावर लोकशाहीचे यश व परिणामकारकता अवलंबून असते. जनता राजकीयदृष्टया उदासीन वा विचार स्वातंत्र्यावर बंधने असतील तर राजकीय सहभागाचे प्रमाण कमी होऊन शासन संस्थेचे लोकावरचे नियंत्रण कमी राहील. ही गोष्ट राजकीय संसूचनाच्या दृष्टीने योग्य नाही. लोकशाहीत विशिष्ट काळात निवडणुका होतात. त्यावेळी लोकांच्या मतदान निर्णयावर संसूचन माध्यमे प्रभाव टाकतात. निवडणुकीचे वातावरण तापविणे. निवडणूक निकालाविषयी उत्सुकता निर्माण करणे इ.बाबत माध्यमाचा फार मोठा फार वाटा असतो. माध्यमामुळे राजकीय सहभाग वाढत असल्यामुळे लोकशाहीच्या यशासाठी संसूचन माध्यमे महत्त्वाची असतात. निवडणुकीनंतरच्या काळात ही विशिष्ट लोकमत निर्माण करण्यात विरोधी पक्षांना यश मिळाल्यास शासनावर नियंत्रण राहू शकते म्हणून लोकशाही संसूचन माध्यमे महत्त्वपूर्ण असतात.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...