शनिवार, ३० जुलै, २०२२

राजकीय विकासाचे मूलभूत घटक, साधने आणि अभिकरणे Fundament Mean and Factor of Political Development

 

राजकीय विकासाचे मूलभूत घटक, साधने आणि अभिकरणे :-

Fundament Mean and Factor of Political Development

आधुनिक काळात राजकीय विकास संकल्पनेला महत्त्व प्राप्त होत आहेत. राजकीय विकास घडवून आणणारे अनेक घटक असतात. राजकीय विकास प्रक्रियेत राजकीय व्यवस्थेतील अंतर्गत आणि बाहय दबावाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. राजकीय विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यात शासन आणि शासनाशी संबंधित विविध संस्थाची भागीदारी महत्वपूर्ण मानली जाते त्यांनाच राजकीय विकासाची साधन किया अभिकरणे असेही म्हटले जाते. डॉड, रोस्टो इत्यादी विचारवंतांनी राजकीय विकासाचे पुढील मूलभूत घटक सांगितलेले आहेत.

१) राजकीय पक्ष :- राजकीय विकास प्रक्रियेला गती देण्यात राजकीय पक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. राजकीय पक्षातून राजकीय नेतृत्वाची निर्मिती होत असते आणि नेतृत्व देशाच्या विकास प्रक्रियेला आकार देण्याची भूमिका बजावत असते. उदा. भारताच्या राजकीय विकासात नेहरू आणि इंदिरा गांधीचा वाटा मोठा राहिलेला असला तरी या नेतृत्वाला पाठवळ पुरविणान्या काँग्रेस पक्षाचे योगदानही कमी लेखता येणार नाही. विकसनशील देशात राजकीय जागृती मर्यादित असते. त्या देशातील लोकांमध्ये राजकीय विकासाची समज निर्माण करणे आणि अल्पसंख्य बुद्धिवान लोकांना राजकारणात आणून राजकीय नेतृत्व सोपविणे ही महत्त्वाची भूमिका राजकीय पक्षांनी पार पाडलेली आहे. राजकीय पक्षाचे राजकीय विकासातील योगदान लोकशाही नव्हेतर सर्वकष व्यवस्थेत देखील महत्त्वपूर्ण असते. सर्वकष सत्तावादी राजवटी राजकीय पक्ष राजकीय विकासाचे कार्य करतात. उदा. रशिया, चीन देशात साम्यवादी पक्ष हे सामाजिक, आर्थिक विकासाचे प्रमुख साधन बनले आहेत. राजकीय पक्षाशिवाय लोकशाहीची कल्पना करता येणार नाही. राजकीय पक्ष लोकशाहीला गतिमान करण्यासोबत राजकीय विकासाला गती देण्याचेही कार्य करत असतात. राजकीय पक्षाचे कार्याचा विचार दोन दृष्टीने केला जातो. लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी राजकीय पक्ष जनमतांचा पाठिंबा कायम ठेवण्यासाठी विकासाच्या नव्या नव्या योजना आखत आणतात व त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. शासन पद्धती कोणत्याही प्रकारची असली तरी राजकीय विकासाच्या बाबतीत राजकीय पक्षाचे अमान्य करता येणार नाही. मात्र एकपक्षीय राजवटीपेक्षा बहुपक्षीय राजवटी असलेल्या देशात होणारा राजकीय विकास अधिक परिपक्क व संतुलित स्वरूपाचा असतो.

२) लष्करी बळ :- सध्याच्या काळात राजकीय व्यवस्थेमध्ये सैन्यशक्तीला दिवसेंदिवस महत्व प्राप्त होत आहेत. भारताच्या शेजारी राष्ट्रामध्ये सैन्यच राजकीय व्यवस्था चालवितात. अनेक देशात नागरी सत्ता लयास जाऊन देशात लष्करी सत्ता प्रस्थापित होत आहेत. कारण लोकांना अपेक्षित असलेला राजकीय विकास घडवून आणण्यास नागरी सत्ता अपयशी ठरल्यास सैन्याने सत्ता हाती घ्यावी हे लोकमत अपेक्षित करत असते. लोकशाही शासनव्यवस्था अपयशी ठरलेल्या अनेक देशात राजकीय विकासाची पार्श्वभूमी विकसित करण्यात लष्कराने मोलाची भूमिका बजावलेली आहे. लष्करी सत्ता देखील जनमताचा पाठिंबा मिळविण्यासाठी नव्या नव्या कल्पना अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. उदा. पाकिस्थानात जनरल अयुबखान यांच्या राजवटीच्या काळात अनेक संकल्पना व योजना राबविण्यात आलेल्या होत्या. हटिंगटनच्या मते, सैन्याचा हस्तक्षेप सैन्याद्वारे राज्यकारभारात होता आणि त्यांची नागरी प्रशासनापासून मुक्ती होते हे राजकीय विकासाचे लक्षण मानले जाते. लष्कराच्या माध्यमातून राजकीय विकास साध्य होत असला तरी तो विकास धोकादायक वा एकांगी स्वरूपाचा असतो. लष्कर अनेकदा विकासासाठी सक्ती किंवा दडपशाही मार्गाचा अवलंब करत असते त्यातून विद्रोह निर्माण होत असतो. लष्करी राजवट पूर्वग्रहाच्या माध्यमातून विशिष्ट समाज गटांचा विकास करते इतरांच्या विकासकडे दुर्लक्षही करते किंवा काही घटकांना दडपून टाकण्याचे प्रयत्न देखील करत असते त्यामुळे लष्कराच्या माध्यमातून होणारा विकास हा अनेकदा सर्वसमोवशक नसतो.

३) सुबुद्ध व गतिशील नेतृत्व :- राजकीय विकास राजकीय परिवर्तनाचे एक गतिशील स्वरूप असते. कोणतेही परिवर्तन शीघ्र गतीने करण्यासाठी योग्य नेतृत्वाची गरज असते. गतिशील राजकीय नेतृत्वातून राजकीय विकासाची प्रक्रिया वेग घेत असते. राज्यकारभारातील उणिवा दूर करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी गतिशील नेतृत्व प्रयत्न करत असते. उदा. भारतात पंडित नेहरू सारख्या नेत्यामुळे भारताच्या विकासाची प्रक्रिया गतिमान झाली. समाजाच्या आशा आकांक्षा आणि प्रशासन यांची सांगड नेत्याला घालता आली तर नेतृत्वाभोवती आदर व दिव्यवलयी कवच निर्माण होते अशा नेत्याला राजकीय विकास सहज घडवून आणता येतो. अशा नेतृत्वाने केलेल्या कार्याला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळतो.

४) राजसत्तेचे नेतृत्व :- वास्तविक हा शासन प्रकार परंपरागत व प्राचीन काळाचा मानला जात असला तरी आधुनिक काळात राजकीय विकासात यांचे योगदान दिसते. राजसत्तेने दूरदृष्टीने विद्युतवेगाने राजकीय विकास घडवून आणता येता. आजही सौदी अरेबिया, कुवत आणि मध्य पूर्वतील अनेक देशात राजसत्ता राजकीय विकासाची प्रमुख साधन बनली आहे. राजसत्तेला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी राजकीय विकासाशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. त्याशिवाय राजसत्तेला अधिमान्यता मिळणार नाही.

५) समाजाचा सहभाग :- राजकीय विकासाच्या गतीवर सामाजिक परिस्थिती व समाजाच्या सहभागाचा फार मोठा परिणाम घडून येतो. राजकीय व्यवस्था आणि सामाजिक रचना हे परस्परांशी निगडीत असतात. समाजाची स्थिती, समाजाची विचारसरणी आणि समाजाचा राजकीय व्यवस्थेतील सहभाग यावर राजकीय सहभाग अवलंबून असतो. ज्या समाजातील जनता राजकीय व्यवस्थेत सहभागी होत नाही तेथील राजकीय विकास खुंटतो. सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी समाजात गतिशील नेतृत्व असणे आवश्यक असते. नेतृत्व प्रेरणा, उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करून समाजाला विकासाच्या मार्गात सहभागी करू शकतो.

६) राजकीय व्यवस्थेची समर्थता :- आधुनिक काळात जनतेच्या शासनाबद्दलच्या अपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त वाढलेल्या आहेत. त्यातून समाजाच्या राजकीय मागण्या वाढलेल्या आहेत. त्या मागण्यांचे धोरण व निर्णयात रूपांतर करून राजकीय व्यवस्था आपले सामर्थ्य वाढवू लागला की राजकीय विकास घडून येतो पण हे लोकशाही व्यवस्थेत शक्य असते. कारण लोकशाही नोकरशाही राजकीय विकासाचे माध्यम म्हणून कार्य करत असते. वैधानिक, प्रशासकीय व राजकीय पातळीवर नोकरशाहीच्या मदतीने राजकीय विकास घडवून आणू शकतात.

७) आधुनिक नोकरशाही :- काही विचारवंताच्या मते राजकीय विकासात नोकरशाहीची भूमिका देखील महत्त्वपूर्ण असते. नोकरशाही ही शासनाला स्थिरता देण्याचे कार्य करत असते. परपरागत समाजाला आधुनिक बनविण्याचा प्रयास करत असते. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोवर योग्य ध्येयधोरणे आखून राजकीय विकासाला गती देण्याचे कार्य करीत असतात. आधुनिक नोकरशाही यंत्रणेमुळे राजकीय व्यवस्थेला स्थायित्व प्रदान झालेले आहे. त्यामुळे आधुनिक काळात नोकरशाही राजकीय विकासाचे एक साधन मानली जाते. विकसनशील देशात राजकीय विकासात नोकरशाहीने सुरुवातीच्या काळात प्रभावी भूमिका बजावलेली होती. परंतु आधुनिक काळात भ्रष्टाचार, राजकीय सत्तेचा गैरवापर, राजकीय हस्तक्षेपाला बळी पडणे इत्यादीमुळे नोकरशाही जनआकांक्षाची पूर्तता करण्यात असफल ठरत असल्यामुळे राजकीय विकासासाठी त्यात सुधारणा करणे गरजेचे ठरले आहे.

८) राष्ट्रीयत्वाची भावना :- राष्ट्रीयत्वाची भावना राजकीय विकासाचे साधन मानले जाते. जनतेत राष्ट्राविषयी आत्मीयता, जिव्हाळा आणि निष्ठा असेल तर जनता राजकीय विकासासाठी कोणताही त्याग करण्यास सिद्ध होईल. राष्ट्रीयत्वाच्या भावना असलेल्या देशात राजकीय एकता आणि राजकीय स्थिरता मोठया प्रमाणावर आढळत असते हे सिद्ध झालेले आहे. राजकीय एकता आणि राजकीय स्थिरता या दोन्हीची राजकीय विकासासाठी आवश्यकता असते म्हणून राष्ट्रीयत्वाची भावना ही राजकीय विकासाचे साधन ठरते.

९) जन सहभाग :- जनसहभाग राजकीय विकासाचा एक घटक आधुनिक काळात मानला जातो. म्हणूनच आधुनिक काळात सर्वच देश राजकीय सहभागाला प्रोत्साहन देतात. जनसहभागातून जनतेची सामाजिक आणि राजकीय समज विकसित होत असते. जनसहभागातून राजकीय व्यवस्थेला मोठया प्रमाणावर अधिमान्यता मिळवून राजकीय स्थिरता निर्माण होत असते. जनसहभागामुळे राजकीय व्यवस्थेचे कायदे, नियम आणि ध्येयधोरणाची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकते. अंमलबजावणीसाठी जनतेचे सहकार्य मिळाल्यास दंडशक्तीच्या वापराची गरज नसते. म्हणूनच जनसहभाग हा राजकीय विकासाचा एक घटक मानला जातो.

१०) साम्यवादी नमुना :- राजकीय विकास घडविण्याचे मुख्य साधन म्हणजे साम्यवादी शासन व्यवस्था असल्याचे अनेक विचारवंताचे मत आहे. १९१७ साली लेनिनने मार्क्सवादाच्या आधारावर सर्व राजकीय शक्ती केंद्रीत करून अल्पकाळात रशियाचा विकास घडवून आणला. रशियाच्या विकासापासून प्रेरणा घेऊन चीन व साम्यवादी देशानी राजकीय विकास घडवून आणला. साम्यवादी विकास मॉडेलने प्रभावित होऊन विचारवंत या विकास प्रतिमाचे समर्थन केले करू लागलेले आहेत. लोकशाही देशात विकासाची संथ आणि दीर्घकालीन असते. त्यामुळे कम्युनिस्ट देशातील विकास प्रक्रिया गतीशिल असते. कारण राजकीय विकास संकल्पनेला विचारसरणीचे स्वरूप प्राप्त करून दिले जाते व त्यासंबंधीची लोकांमध्ये एक प्रकारची जाणीव, निष्ठा निर्माण केली जाते. त्यामुळे राजकीय विकासाचा हा नवीन नमुना सर्वमान्य नाही. त्यांच्या यशाबद्दल शंका आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...