सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रासाठी वरदान

 

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रासाठी वरदान


माहिती तंत्रज्ञानाच्या उदयानंतर शिक्षण क्षेत्रात अत्यंत वेगाने क्रांतिकारी बदल होत आहेत. माहिती तंत्रज्ञान विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात विकसित झालेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने शिक्षण क्षेत्रात एक नवी क्रांती घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून कार्य सुरू केलेले आहे. शिक्षण प्रक्रियेतील अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया अधिक दर्जेदार आणि सर्व समावेशक बनविण्याच्या दृष्टिकोनातून हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त आहेत. या तंत्रज्ञानाच्या वापराला काळ, वेळ इत्यादींच्या मर्यादा नाहीत. सद्य काळात हे तंत्रज्ञान निशुल्कपणे उपलब्ध आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचवून शैक्षणिक समानता निर्माण करण्यास हातभार लागणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक शैक्षणिक प्रणाली विकसित करण्यात हे तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचे सिद्ध होत आहे.

समकालीन शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांमध्ये असलेले कौशल्य, विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि कमकुवतपणा इत्यादींचे AI च्या माध्यमातून विश्लेषण करून योग्य प्रकारची शैक्षणिक सामग्री विकसित करता येऊ शकते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजानुसार आवश्यक मार्गदर्शन आणि सूचना करता येऊ शकतात. शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक आर्थिक विषमता, भौगोलिक अडथळे, वंशिक आणि लैंगिक पूर्वग्रह, संसाधने आणि संधीतील अंतर इत्यादी समस्यांमुळे शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण झालेले आहेत. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करूनही अपेक्षित यश प्राप्त झालेले नाही. पण कृत्रिम बुद्धिमत्ता सारखे प्रभावी तंत्रज्ञान या समस्यांवर मात करण्यासाठी मदत करू शकते. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वैयक्तिकृत शिक्षण अनुभव विद्यार्थ्यांना देता येऊ शकतात. शैक्षणिक संसाधनाच्या अभाव किंवा संधीच्या अभावामुळेमुळे शिक्षणाच्या परिघाबाहेर असलेल्या विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण प्रवाह समाविष्ट करता येईल. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या धोरणात्मक उपाययोजनांमध्ये शैक्षणिक प्रवेश आणि गुणवत्ता दोन्हींमध्ये लक्षणीयरीत्या वाढ घडून आणण्याची क्षमता आहे.

सद्यकालीन शिक्षण पद्धतीत वेगवेगळ्या गरजा असलेले विद्यार्थी एकाच पद्धतीने शिकत आहेत. विद्यार्थ्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी किंवा भिन्न सामाजिक आर्थिक स्थिती विचारात न घेता एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न शैक्षणिक अपंगत्वाला हातभार लावत आहे. नियमित वर्ग अध्यापनात सर्वच विद्यार्थ्यांना एका गतीने शिकवले जात असते. परंतु शिकण्याच्या अडचणी असणाऱ्या, माहितीवर प्रक्रिया करण्यात कमी गती असलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेने शैक्षणिक दृष्ट्या मागे पडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य निर्माण होते. शैक्षणिक कामगिरी कमी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कमी होऊ शकतो. अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीच्या डेटाचे AI च्या मदतीने योग्य पद्धतीने विश्लेषण करून आवश्यक उपाययोजना करता येतील. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा आणि क्षमतांची तपासणी करून त्यांच्या गरजेनुसार आवश्यक शैक्षणिक वातावरण विकसित करता येऊ शकते. नवीन नवीन प्रकारची शैक्षणिक टूल्स विकसित करता येऊ शकतात. शिकण्याची प्रक्रिया अधिक समृद्ध बनवण्यासाठी डिजिटल संसाधनांचा अधिक समृद्धपणे वापर करता येऊ शकतो. AI लर्निंग सिस्टीमचा वापर करून टोयोकावा आणि तिच्या सहकाऱ्यांनी जपान मधील प्राथमिक शाळेतील रिसोर्स रूम मध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शिक्षणातील संवाद आणि त्यांच्या हस्ताक्षरावरून त्यांच्या शिकण्याची कार्यक्षमता आणि अडचणींचा शोध घेतला. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाकडे डेटाचा प्रचंड वेगाने साठवण्याची आणि विश्लेषण करण्याची क्षमता असते. या क्षमतेचा उपयोग करून शिक्षक विद्यार्थ्यांचा डेटा मोठ्या प्रमाणावर इनपुट करू शकतात. इनपुट केलेल्या डेटाचे योग्य पद्धतीने विश्लेषण करून विद्यार्थ्यांमध्ये असलेले कौशल्य, मनाचा कल, मर्यादा यांचा शोध घेऊन योग्य प्रकारच्या उपाययोजना करू शकतात.

शिक्षण क्षेत्रात अनेक नवीन नवीन संकल्पनांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये केला जात असतो. या संकल्पना योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध नसते. हे तंत्रज्ञान आवश्यक शैक्षणिक साहित्य शिक्षकांना उपलब्ध करून देण्यास सहाय्यक ठरत आहे. आधुनिक काळात शिक्षण क्षेत्रात क्रिएटिव्ह थिंकिंगला महत्व आलेले आहे. विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग कशी विकसित करावी हा शिक्षकांपुढे मुख्य प्रश्न आहे. विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्ह थिंकिंग निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक शैक्षणिक साहित्य विकसित करण्यात देखील हे तंत्रज्ञान सहाय्यक ठरू शकते. शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या काळात संशोधनाचे महत्त्व वाढलेले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थी आपल्या आवडीच्या विषयांमध्ये संशोधन  करू शकतात. संशोधनासाठी आवश्यक स्रोतांचा शोध, त्यांचे मूल्यमापन आणि निष्कर्षाचे परीक्षण करून सिद्धांत निर्मिती करून संशोधन कौशल्य विकसित करू शकतात. हे तंत्रज्ञान फक्त विद्यार्थ्यांपर्यंत मर्यादित नसून शिक्षकांसाठी देखील वरदान ठरणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षक अधिक परस्पर संवादी, वैयक्तिकृत आणि प्रभावशाली अध्ययन पद्धतींचा वापर करू शकतात. शैक्षणिक व्यवस्थेतील अनेक कार्य स्वयंचलित करण्यास हातभार लावू शकते. विद्यार्थ्याचे मूल्यमापन करण्यापासून ते फीडबॅक मिळवण्यापर्यंत ही सर्व कामे जलद गतीने करू शकते.

 

 कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान पारंपरिक शिक्षण पद्धतीच्या वैयक्तिक शिक्षण, नवीन शैक्षणिक अनुभव आणि सुव्यवस्थित प्रशासकीय कार्य इत्यादी अनेक पैलूंमध्ये क्रांती घडवत आहे. शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्याची प्रतिबद्धता वाढवून शिक्षणाचे परिणाम सुधारण्यासाठी मदत करत आहे. शिक्षण क्षेत्रात अनेक नवीन नवीन संधी निर्माण करत आहेत. वैयक्तिकृत शिक्षण देण्याची या तंत्रज्ञानाची क्षमता प्रचंड मोठी आहे ‌ प्रत्येक विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या पद्धती आणि गतीनुसार शिकवण्याची क्षमता तंत्रज्ञान विकसित करत आहे. विद्यार्थ्यांच्या कमतरता आणि शिकण्यातील अडचणी ओळखून त्यात आवश्यक सुधारणा करण्यासाठी हे तंत्रज्ञान मदत करत असते. गेमिफिकेशन आणि सिम्युलेशनच्या मदतीने शिक्षण अधिक मनोरंजक बनू शकते. तसेच विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या वेळेचे अधिक प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यास सहाय्यक ठरू शकते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षकांना अशैक्षणिक आणि प्रशासकीय कार्य लवकर पूर्ण करता येतील आणि तो आधीचा वेळ विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरता येईल. 

अॅडॅप्टिव्ह लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार शिकवण्याचे कार्यक्रम शिक्षकांना आयोजित करता येतील. वर्च्युअल रियॅलिटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तविक जगात शक्य नसलेले अनुभव देता येतील. चॅटबॉट्सचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करता येईल. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची त्वरित उत्तरे देता येतील. ऑटोमेटेड ग्रेडिंगच्या माध्यमातून स्वयंचलित मूल्यांकन पद्धतीचा वापर करून परीक्षा आणि असाइनमेंटचे  कार्य लवकर पूर्ण करता येईल. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या संवादासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म विकसित करता येतील. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वैयक्तिक शिक्षण अनुभव, प्रशासकीय कार्य स्वयंचलित, डेटा विश्लेषण आणि रियल टाईम फीडबॅक प्रदान करू शकते. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि नवकल्पनांचा विकास करू शकते. शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार प्रश्नमंजुषा, चाचण्या, सिम्युलेशन इत्यादींसारखी परस्पर संवादी आणि गतिमान सामग्री तयार करून अध्यापनाचे अनुभव क्षेत्र विस्तारू शकते. गतिमान पद्धतीने मूल्यांकन करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल योग्य अभिप्राय देता येऊ शकतील. विद्यार्थ्यांच्या डेटाचे योग्य विश्लेषण करून शिकवण्याच्या पद्धतीत शिक्षक बदल करू शकतील. पारंपारिक अध्ययन पद्धती प्रयोगशाळेतील प्रयोगा व्यतिरिक्त दृश्य घटक विद्यार्थ्यांना दाखवू शकत नाही. परंतु हे तंत्रज्ञान व्हिज्युअलाइल्ड वेब आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने वास्तविक जीवन अनुभव विद्यार्थ्यांना देऊन शिकण्याचा वेग वाढवू शकते. गृहपाठ तपासणी, चाचण्या घेऊन ग्रेड देणे, अहवाल लेखन, सादरीकरण, नोट्स आणि प्रशासकीय कार्य स्वयंचलित पद्धतीने करू शकते. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल व कामगिरी आणि शिक्षणातील अंतर याची विश्लेषण करून अभ्यासक्रम विकसित आणि अद्ययावत करण्यास मदत करते.

 कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान निव्वळ शिक्षणाचे एकत्रीकरण करून शिकण्याची प्रक्रिया सुधारत नाही तर समस्या सोडवण्यासाठी आवश्यक कौशल्य निर्मितीला प्रोत्साहन देत असते. या तंत्रज्ञानाची मुळे जसजसी खोलवर जातील तसतशी शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ आणि प्रभावी बनत जाईल. शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही अधिक अधिक शैक्षणिक परिणाम साध्य करण्यासाठी हे तंत्रज्ञान सक्षम बनवते आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक अत्यंत शक्तिशाली साधन आहे. याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास शिक्षण पद्धती अधिक प्रभावी आणि वैयक्तिक बनविण्यास मदत होऊ शकते. या तंत्रज्ञानाला वेळ आणि काळाचे बंधन नसल्याकारणाने कधीही आणि कुठेही आणि कोणालाही शिक्षण उपलब्ध करून देता येईल.  तंत्रज्ञानाची 24 तास उपलब्धता पारंपारिक वर्ग तासाच्या पलीकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

मार्गदर्शक तत्त्वांची उगमस्थाने, महत्त्व, स्वरूप, प्रकार व वर्गीकरण आणि मूल्यमापन Directive Principal of State

  मार्गदर्शक तत्त्वांची उगमस्थाने , प्रकार व वर्गीकरण- घटनेच्या चौथ्या प्रकरणात ३६ ते ५१ कलमामध्ये मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. मूलभूत हक...