शनिवार, १६ जुलै, २०२२

राजकीय संसूचनाची मार्ग, साधने व माध्यमे वा लोकमत निर्मितीची माध्यमे Mean of Communication or Mean of Formation of Public Opinion

 

राजकीय संसूचनाची मार्ग, साधने व माध्यमे वा लोकमत निर्मितीची माध्यमे:-Mean of Communication or Mean of Formation of Public Opinion 

राजकीय स्वरूपाची वैचारिक देवाणघेवाण ही राजकीय संसूचनाच्या अनेक प्रकारच्या माध्यमांतून होत असते. यात वर्तमानपत्रे, रेडिओ, दूरचित्रवाणी ही जनता संसूचन साधने सर्व परिचित असली तरी या माध्यमाशिवाय इतर माध्यमे देखील राजकीय संसूचन घडवून आणण्यामागे प्रभावी भूमिका बजावित असतात.

) वृत्तपत्रे :- संसूचनाची अनेक माध्यमे असतांना देखील वर्तमानपत्राचे महत्त्व कमी झालेले नाही. साक्षरामध्ये हे माध्यम विशेष प्रभावी असते. वर्तमानपत्रात दैनिक, साप्ताहिक, मासिके इ. चा समावेश होतो. छपाई कलेचा शोध लागल्यानंतर वर्तमानपत्राचा झपाटयाने प्रसार झाला. औद्योगिक क्रांतीनंतर वृत्तपत्र माध्यमाचे महत्त्व वेगाने वाढल्याचे आढळते. दररोज लक्षावधी लोकाकडून वर्तमानपत्र वाचली जातात. लोकशाही व हुकूमशाही व्यवस्थामध्ये वर्तमानपत्र लोकनिर्मितीचे प्रभावी साधन आहे. जगातील शंभराहून अधिक देशातील वृत्तपत्राचा अभ्यास करून युनेस्काने प्रसिद्ध केलेल्या अहवालात प्रगत देशात वृत्तपत्राच्या खपानी उच्चांक गाठल्याचे निरीक्षण नोंदविलेले आहे. आशिया व आफ्रिका खंडातील देशातही वर्तमानपत्राचा खप व वाचक वर्ग वाढलेला आहे हा महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढलेला आहे. वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य लोकशाहीत महत्त्वाचे मानले जाते. बातम्या प्रसारावर शासनाचे नियंत्रण असले तरी खाजगी मालकीची वर्तमानपत्रे बऱ्याच देशात दिसून येतात. वृत्तपत्र चालविणे अत्यंत खर्चिक आणि कठीण काम असते. त्यामुळे बऱ्याच वर्तमानपत्राची मालकी भांडवलदार वर्गाकडे केंद्रीत झालेली दिसतात. काही देशात राजकीय पक्षांनी स्वतः वर्तमानपत्रे चालवित असतात. उदा. सामना शिवसेना पक्षाचे अधिकृत पक्ष आहे. वर्तमानपत्राचे वाचक बहुदा निश्चित असतात, उदा. तरुण भारत वाचणारा वाचक बहुदा भाजपला मतदान करतो. निवडणूकीच्या - वेळी हे माध्यम अधिक क्रियाशील असते. संपादकीय अग्रलेख, व्यंगचित्र, जाहिरनामा, छायाचित्रण इत्यादीद्वारे वृत्तपत्रे लोकमतावर प्रभाव टाकण्याचे कार्य करतात. जनतेच्या मागण्या शासनापर्यंत नेणे व शासनाचे कार्यक्रम जनतेपर्यंत नेणे हे दुहेरी स्वरूपाचे कार्य देखील वर्तमानपत्र करतात. लोकमताच्या जडणघडणीमध्ये वृत्तपत्राचा मोठा बाटा असला तरी प्रत्येक वृत्तपत्रावर कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाचा, संघटनेचा आणि तत्त्वज्ञानाचा प्रभाव असतो. ज्या गटाची मालकी आणि प्रभाव असेल त्यांच्या तत्त्वज्ञानाची तरफदारी करणे वा जाणूनबुजून चूकीची माहिती पुरविणे ही अपरिहार्य बाब आहे. बातम्यांचे संपादन आणि प्रकाशन करतांना आपल्या तत्त्वज्ञानाला अनुकूल गोष्टींना जाणूनबुजून प्राधान्य दिले जाते कारण पूर्णतः निपक्षपाती आणि निरपेक्ष वृत्तपत्र आढळत नाही असे असले तरी विविध मतांच्या प्रभावातून बातम्या प्रकाशित करणारे विविध वृत्तपत्रातील बातम्याचे आकलन करून योग्य तथ्यापर्यंत पोहचविता येते. व्यंगचित्रे आणि छायाचित्राच्या माध्यमातून एखादी मोठी गोष्ट अत्यंत कमी जागेत आणि प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचविता येते. व्यंगचित्राच्या माध्यमातून विनोदी पद्धतीने वास्तव परिस्थितीचे प्रभावी दर्शन जनतेला घडविता येते. वरील मार्गाशिवाय चर्चासत्राचे अहवाल, विविध स्वरूपाचे परीक्षण, निवेदने इत्यादीच्या माध्यमातून वृत्तपत्रातून राजकीय संसूचन साधले जाते. राजकीय नेतृत्वाचे व्यक्तिमत्व घडविण्यात आणि विकसित करण्यात वृत्तपत्राचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे राजकीय नेते वृत्तपत्राशी जवळीक साधून असतात. वृत्तपत्र साधनाचा प्रभाव पाहता हुकूमशाही राजवटीत या माध्यमावर प्रभावी नियंत्रण ठेवले जाते. सरकारच्या परवानगी शिवाय बातम्या प्रकाशित करू दिल्या जात नाहीत. लोकशाही व्यवस्थेतसुद्धा राज्यकर्ता वर्ग आपला स्वार्थ साधण्यासाठी वृत्तपत्रावर सेन्सॉरशिप लादत असतात. उदा. भारतात आणीबाणीच्या काळात वर्तमानपत्रावर सेन्सॉरशिप लादली होती.

२) आकाशवाणी :- वर्तमानपत्राच्या खालोखाल नभोवाणीला महत्त्व आहे. हे साधन निरक्षर लोकापर्यंत पोहचू शकते. ज्या देशात निरक्षरतेचे प्रमाण जास्त असते तेथे हे माध्यम प्रभावी ठरते. या माध्यमाच्या माध्यमातून कोटयवधी लोकांना एकाच वेळेस माहिती पुरविता येते. पहिल्या महायुद्धाच्या काळात नभोवाणीचा उपयोग गुप्त बातम्या देण्यासाठी होत होता. परंतु १९३० नंतर या माध्यमाचा वापर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या आणि व्यावसायिक कारणासाठी उपयोग होऊ लागला. या माध्यमाचा मुख्य उद्देश मनोरंजन असला तरी त्यासोबत लोकमत देखील घडवून आणते. बातम्या, राजकीय भाषणे, राजकीय चर्चा व युद्ध वर्णन इ. माहिती नभोवाणीद्वारा दिली जाते. संसद आणि विधिमंडळाचे थेट समालोचन आणि प्रक्षेपणामुळे मोठया प्रमाणावर राजकीय संसूचन साधले जात असते. बहुसंख्य देशात हे माध्यम शासनाच्या ताब्यात असल्यामुळे सत्ताधारी पक्षाला जास्त बाब दिला जातो अर्थात आधुनिक काळात हे माध्यमांचे नियंत्रण स्वायत्त संस्था आणि खाजगी क्षेत्राकडे दिल्यामुळे विरोधकांनाही वाव मिळू लागला आहे. निवडणुकीच्या काळात नभोवाणीचा वापर प्रचारासाठी केला जातो. निवडणुकीच्या काळात सर्वच •पक्षांना प्रचारासाठी वेळ व संधी दिली जाते. उपग्रह क्रांतीमुळे जगाच्या बातम्या एका सेकंदात आपल्याला कळू शकतात. आंतरराष्ट्रीय राजकारणातही नभोवाणी माध्यमाचा मोठया प्रमाणावर उपयोग केला जातो. प्रभावी प्रक्षेपण यंत्रणा आणि जगभर या यंत्रणेचे असलेल्या बातमीदारामुळे जगातील कानाकोपऱ्यातील राजकीय घडामोडी जगावर वेगाने पोहचविता येतात. खाजगी नभोवाणी केंद्राच्या निर्मितीमुळे राजकीय संसूचनात मोठया प्रमाणावर विविधता आलेली दिसून येते..

३) दूरचित्रवाणी :- हे संसूचनाचे अत्यंत प्रगत माध्यम आहे. हे दृकश्राव्य माध्यम असल्याने इतर माध्यमापेक्षा जास्त प्रभाव पडतो. अर्थात हे माध्यम अत्यंत खर्चिक असल्याने राजकीय पक्षाना याचा वापर मोठ्या प्रमाणावर करता येत नाही. अमेरिकेसारख्या देशात या माध्यमांचा खूप प्रभाव पडतो. उदा. १९६० मध्ये कॅनेडी व निक्सन यांच्यातील टि. व्ही. वरिल वादविवादामुळे कॅनेडीचा मतदारावर प्रभाव पडला. शासकीय योजना, बातम्या, राजकीय चर्चा व करमणूक इ. माध्यमातून दूरचित्रवाणीचे कार्य चालते. अनेक देशात सरकारचे या माध्यमावर सरकारचे नियंत्रण असल्याने सत्ताधाऱ्यांना जास्त वाव दिला जातो. अर्थात खाजगी चॅनल्स सुरू झाल्यामुळे विरोधकांना ही भरपूर संधी मिळते. खाजगी चॅनल्समुळे कोणत्याही एका राजकीय पक्षाला या माध्यमावर वर्चस्व मिळविता येत नाही. अहोरात्र प्रक्षेपण करणाऱ्या खाजगी चॅनल्समुळे या माध्यमाची राजकीय संसूचन करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. हे माध्यम एकाच वेळेस माहितीचे विश्लेषण व दृश्य स्वरूपाचे चित्र दाखवत असल्याने इतर माध्यमापेक्षा जास्त प्रभाव निर्माण करते. हे माध्यम अत्यंत प्रभावी असले तरी ते अतिखर्चिक •असल्यामुळे भांडवलदार वर्ग या माध्यमाचा उपयोग करून आपले तत्त्वज्ञान रुजविण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच निवडणुकीच्या कार्यात या माध्यमाचा प्रभाव पडल्यामुळे निवडणुका मोठ्या प्रमाणावर खर्चिक होण्यास हातभार लागलेला दिसतो. निवडणुकाच्या काळातील प्रचारमोहिमा, विशेष कार्यक्रम, राजकीय चर्चा व वादविवाद, राजकीय नेत्यांची भाषणे इत्यादी कार्यक्रमामुळे जनतेच्या राजकीय ज्ञानात ही माध्यमे मोठ्या प्रमाणावर भर टाकतात. या माध्यमाच्या माध्यमातून केला जाणाऱ्या प्रचारातून जनतेचे राजकीय दृष्टिकोन विकसित होण्यास हातभार लागतो. टी. व्ही मुळे प्रत्यक्ष राजकीय नेत्यांना पाहण्याची संधी मिळत नसली तरी अप्रत्यक्ष त्यांच्या दर्शनाने राजकारणाविषयी उदासीनता असलेल्या लोकांमध्ये राजकारणाविषयी कुतूहल वा आस्था निर्माण होण्याची शक्यता असते.

४) चित्रपट व नाटके :- ही माध्यमे मनोरंजनाची साधने असली तरी आधुनिक काळात या माध्यमाचा वापर राजकीय संसूचनासाठी मोठया प्रमाणावर केला जातो. राजकीय संसूचनामध्ये चित्रपट व नाटके यांना महत्त्वाचे स्थान आहे. एकच चित्रपट एकाच वेळेस अनेक ठिकाणी दाखवितो येतो. चित्रपटांना राजकीय शिक्षणाचे मूल्य असू शकते. राजकीय विचारप्रणालीचा प्रचार चित्रपटांद्वारा होऊ शकतो. चित्रपटाद्वारे किंवा नाटकाद्वारे एखादा उपदेश वा संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहचविता येतो. त्याचा प्रभाव जनतेवर खूप मोठया प्रमाणावर पडतो. या साधनामुळे मनोरंजनाबरोबर एखादा उपदेशही देता येतो. या माध्यमावर सरकारचे कडक नियंत्रण असते. सामाजिक राजकीय मूल्य प्रसारित करणाऱ्या माध्यमाला सरकारची संमती आवश्यक असते. सरकारला नको असलेल्या कलाकृतींना सरकार सेन्सॉरच्या माध्यमातून कात्री लावत असतो. उदा. इंदिरा गांधींच्या काळात आंधी चित्रपटावर बंदी लादली होती. नाटक हे माध्यम देखील राजकीय संसूचनाचे प्रभावी माध्यम असते. नाटकाच्या माध्यमातून राजकीय दृष्टया महत्त्वाचा विषय हाताळला जाऊ शकतो. सामाजिक आणि राजकीय मूल्यांच्या प्रसारासाठी नाटकाच्या संहिता लिहिल्या जातात. ब्रिटिश काळात राष्ट्रनिष्ठा आणि शासनविरोध उघडपणे प्रदर्शित करायला बंदी होती. त्यामुळे अनेक लेखक नाटक वा साहित्यकृतीच्या माध्यमातून राष्ट्रनिष्ठा प्रदर्शित करत असत. उदा. खाडिलकरांचे कीचकवध नाटक चित्रपट आणि नाटकाशिवाय सरकारच्या नभोवाणी खात्यामार्फत तयार केल्या जाणाऱ्या लघुपटाच्या माध्यमातून देखील राजकीय संसूचन साधनाचा प्रयत्न केला जात असतो. भारत सरकारच्या नभोवाणी खात्यामार्फत विविध सरकारी योजना आणि कार्यक्रमाच्या प्रसारासाठी लघुपटाची निर्मिती केली जात असते. स्वयंसेवी संस्थामार्फत देखील विविध प्रश्नावर जागृती करण्यासाठी लघुपट निर्माण केले जात असतात त्यांच्या माध्यमातून देखील राजकीय संसूचन साधले जात असते.

 ५) सामाजिक प्रसार माध्यमे :- आधुनिक काळात संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या विकासातून अनेक सामाजिक प्रसार माध्यमे राजकीय संसूचनात प्रभावी भूमिका बजावताना दिसतात आहेत. सामाजिक प्रसार माध्यमामध्ये Twitter, Facebook, Hangouts and WhatsApp सारखा सामाजिक प्रसार माध्यमांनी राजकीय संसूचन फार मोठी भूमिका बजावलेली आहे. १६ व्या लोकसभा निवडणुकीत या माध्यमांचा मोठया प्रमाणावर राजकीय संसूचनावर प्रभाव पडलेला आहे. जगातील कोनाकोपऱ्यातील बातम्या, व्हिडिओ, फोटोग्राफ, संदेशाच्या देवाणघेवाण अत्यंत वेगवान पद्धतीने होत असल्याने ही माध्यमे राजकीय जागृती विकसित करण्यात मोलाचा वाटा उचलता आहेत. सामाजिक प्रसार माध्यमातून पसरणाऱ्या माहितीवर ताबडतोब प्रतिक्रिया नोंदविण्याची सोय असल्यामुळे मोठया प्रमाणावर जनता प्रतिक्रिया नोंदवून प्रतिसाद देत असते. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रसारामुळे ह्या माध्यमाचा जनमाणसातील वापर वाढताना दिसतो. माध्यमाचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन राजकीय नेतृत्वही सकारात्मक प्रतिसाद देत ह्या माध्यमाचा मोठया प्रमाणावर वापर करत आहेत. वेगवान पद्धतीने राजकीय संसूचन निर्मितीचे कार्य सामाजिक प्रसारमाध्यमे करत असल्यामुळे लोकमताची मोठ्या प्रमाणावर घुसळण होत आहे. राजकीय जाणिवाची निर्मिती, राजकीय प्रेरणा आणि प्रतिकांचा निर्मितीमुळे मोठया प्रमाणावर राजकीय संसूचन निर्मितीत सामाजिक प्रसारमाध्यमाचा वाटा वाढतो आहे.

६) लोकनेते :- राष्ट्रीय, राज्य व स्थानिक पातळीवर काही नेते आपल्या व्यक्तिमत्त्वाने किंवा भाषणाने जनतेवर प्रभाव पाडून लोकमत तयार करीत असतात यांना लोकनेते असे म्हणतात. राजकीय संसूचनामध्ये राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्त, स्वयंसेवी संघटनाचे कार्यकर्त, शासकिय अधिकारी, शिक्षक, कीर्तनकार व समाजसेवक इ. लोकमत निर्मितीचे कार्य करतात. आपली राजकीय भूमिका लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात. तसेच विरोधकांच्या भूमिकेचेही खंडन करण्याचा प्रयत्न करतात. इंदिरा गांधी सारख्या राष्ट्र नेत्याचा लोकमतावर खूप प्रभाव होतो. भारतासारख्या देशात पारंपरिक जहागिरदार, सांमत आणि राजघराण्यातील व्यक्तीच्या ऐवजी स्थानिक पातळीवर कार्यरत असलेले सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हापरिषद सभापती इत्यादीचा जनतेवर प्रभाव पडत असतो त्यांना स्थानिक पातळीवरील लोकनेते मानले जातात. विधानसभा आणि संसदेच्या निवडणुकीत स्थानिक लोकनेत्यांच्या मदतीने निवडणुकीत विजय संपादन केला जात असतो. स्थानिक लोकनेत्यांच्या शब्दाला मान असल्यामुळे त्यांच्या पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न राज्य आणि देशपातळीवरील नेतेमंडळी करत असते. राजकीय संसूचनात लोकनेत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते.

७) कायदेमंडळाचे सभासद :- संसद सदस्य आणि विधिमंडळ सदस्य आपआपल्या मतदारसंघात लोकमत घडविण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत असतात. अप्रत्यक्ष लोकशाहीत प्रतिनिधीच्या मार्फत राज्यकारभार चालतो. प्रतिनिधी ज्या भागाचे नेतृत्व करतात तेथील लोकांचे प्रश्न सरकारकडे नेतात. मतदारसंघातील प्रश्नाबद्दल सभागृहात आवाज उठविणे, मंत्र्यांना निवेदन देणे, शिष्टमंडळाचे नेतृत्व करणे, अर्थसंकल्पात आपल्या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी निधीची तरतूद होण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी माध्यमातून प्रतिनिधी कार्य करीत असतात. प्रतिनिधीचा जनतेशी थेट संपर्क असल्यामुळे त्यांच्याद्वारे होणारे संसूचन अत्यंत प्रभावशाली मानले जाते. मतदारसंघ, स्थानिक शासन, पक्षिय यंत्रणा, शासकिय यंत्रणा इत्यादी महत्त्वपूर्ण राजकीय घटकाशी विधिमंडळाचा सदस्याचा संबंध येत असतो. सरकार व जनता यातील दुवा म्हणून काम करतात. आपला प्रभाव वाढविण्यासाठी किंवा पक्षाचा कार्यक्रम पटवून देण्यासाठी जनसंपर्क दौरा काढून लोकांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन लोकमत घडविण्याचे कार्य प्रतिनिधी करतात,

८) प्रत्यक्ष संपर्क, सभा व संभाषणे:- प्रत्यक्ष जनसंपर्काने जे राजकीय संसूचन साधले जाते ते अधिक परिणामकारक असते. प्रत्यक्ष भेटीमुळे वैचारिक देवाण घेवाण होते. लोकाच्या मनातील शंका दूर करून आपली मते पटवून देता येतात. निवडणुकीच्या जात उमेदवार प्रत्यक्ष मतदाराच्या भेटी घेऊन आपली भूमिका मांडत असतात भारतात विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाचा आकार आणि विस्तार फार व्यापक असल्यामुळे सर्वाच्या प्रत्यक्ष भेटी घेणे शक्य नसते. त्या ऐवजी सार्वजनिक सभा घेऊन नेते मंडळी लोकमत निर्मितीचा प्रयत्न करतात. सभेत आकडेवारी, घोषणाबाजी व भावनिक प्रश्नाचा अवलंब करून नेते मंडळी लोकमत आपल्याला अनुकूल करून घेतात. सभेच्या माध्यमातून लाखो लोकांची एका वेळेस जनसंपर्क साधता येतात. दळणवळण साधनाच्या विकासामुळे देशभर सभाचे आयोजन करून नेतेमंडळी जनतेशी संवाद साधत असते. उदा. १६ व्या लोकसभा निवडणुक प्रचार भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी देशभर ४०० पेक्षा जास्त सभा घेतल्या. सभा यशस्वी करण्यासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी नेतेमंडळी आणि राजकीय पक्ष विविध तंत्राचा वापर करीत असते. आकर्षक व्यासपीठ, रोषणाई, प्रभावी ध्वनिक्षेपण यंत्रणा, जाहिरातबाजी, घोषणाबाजी, आकडेवारी, सभा ज्या ठिकाणी असेल त्या भागातील प्रतीकांना आदरयुक्त वा उल्लेख, उदाहरणे, स्थानिक पोशाख, स्थानिक मुद्यांबाबत आश्वासन इत्यादी तंत्राचा वापर करून नेतेमंडळी आपले मत्त जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. राजकीय संसूचन माध्यमात सभेला महत्त्वपूर्ण स्थान आहे.

९) राष्ट्रीय दौरे:- प्रत्येक देशाचे राष्ट्रीय नेते संपर्क वाढविण्यासाठी निवडणुकीच्या काळात देशभर दौरे काढतात. दौऱ्यामुळे त्याचे व्यक्तिमत्त्व उजळते. लोकमतावर चांगला परिणाम होतो. संसदीय पद्धती पंतप्रधान किंवा निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी घोषित केलेल्या उमेदवाराचा दौरा विशेष उल्लेखनीय मानला जातो. विरोधी पक्षातील नेते लोकमत आपल्या बाजूकडे वळवून घेण्यासाठी राष्ट्रीय दौरे काढत असतात. भारतात इंदिरा गांधी व अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांचे दौरे विशेष गाजलेले दिसतात. हवाई वाहतुकीमुळे देशभर दौरे काढणे आणि देशाच्या काना कोपऱ्यात जनसंपर्क प्रस्थपित करणे सोपे झाले आहे. जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधणे आणि आपली भूमिका मांडणे हा दौऱ्यामागील उद्देश असतो. भारतात लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रीय नेते दौरे, रोड शो, सभा इत्यादीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकमत घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. आधुनिक काळात जनतेशी प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित करण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे राष्ट्रीय नेते राष्ट्रीय दौऱ्याची आखणी करून जनसंपर्क प्रस्थापित करतात.

१०) शासकीय समित्या :- कायदेमंडळात कोणत्याही प्रश्नाची सर्वांगीण चर्चा होणे शक्य नसते कारण तेवढा वेळ आणि तज्ञ व्यक्तीच्या अभावातून त्या प्रश्नाचा सविस्तर व सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी शासनाकडून समिती नेमली जाते किंवा शासनाला एखादया विषयावर कायदा करावयाचा असेल तर शासन एखादी समिती नेमून त्या विषयाचा सविस्तर माहिती जमा करत असते. उदा. महाराष्ट्रात पंचायतराजचे अध्ययन करण्यासाठी पी.बी.पाटील समिती नेमली होती. समिती ज्या कारणासाठी नेमला असेल त्या कारणाची अभ्यास करण्यासाठी व माहिती मिळविण्याकरिता जनतेशी संपर्क प्रस्थापित केला जात असतो. प्रश्नावली, मुलाखत, सर्वेक्षण तज्ञाशी चर्चा, संबंधित साहित्याचे अवलोकन इत्यादीच्या मार्गाने माहिती जमा केली जाते. लोकांशी विचारविनिमय करून माहिती गोळया केली जाते. कागदपत्राचे विश्लेषण केले जाते. संबंधित प्रश्नांच्या विविध बाजूंचे सांगोपांग विवेचन करून अहवाल तयार करून शासनाला सोपविला जातो. शासन तो अहवाल कायदेमंडळात मांडते. कायदेमंडळात संपूर्ण अहवाल मांडला जात नाही तर साररूपाने मांडला जात असतो. कायदेमंडळातील चर्चा प्रसिद्धी माध्यमापर्यंत प्रसारित केली जाते. जनता देखील आपल्या प्रतिक्रिया देते. त्यातून लोकमताची निर्मिती होते.

११) चौकशी आयोग:- राजकारणातील वादग्रस्त घटनेची चौकशी करण्यासाठी शासनाकडून चौकशी आयोग नेमला जातो. आयोगाच्या कामकाजाचे स्वरूप न्यायालयासारखे असते. आयोगाचे काम अनौपचारिक पद्धतीने चालत असते. आयोग ज्या कारणासाठी नेमलेला असेल त्या घटनेशी संबंधित लोकांच्या साक्षी घेणे, लोकांना समन्स पाठविणे, विविध कागदपत्राची पाहणी व विश्लेषण करणे, घटना घडली त्या भागाची पाहणी इत्यादी मार्गाने आयोग साधारणत: कार्य करत असतो. आयोगाचे काम शवचिकित्सेसारखे असते. उदा. ग्रोधा हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने नानावटी आयोग नेमला होता. मुंबई दंगलीची चौकशी करण्यासाठी सरकारने श्रीकृष्ण आयोग नेमला होता. आयोगाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर अहवाल तयार केला जातो. अहवाल स्वीकारणे किंवा नाकारणे सरकारच्या मर्जीवर अवलंबून असते. सरकार आयोगाने तयार केला अहवाल सभागृहात मांडत असते. सभागृहात अहवालावर खुली चर्चा होऊन दोषी व्यक्तीवर कार्रवाईची शिफारशी केली जाते. आयोगाचा अहवाल आणि त्यावरील चर्चा प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविली जाते. चौकशी आयोगाच्या माध्यमातूनही मोठया प्रमाणावर राजकीय संसूचन साधले जाते.

लोकशाही व्यवस्था ही लोकमतावर आधारलेली असते. लोकशाहीत लोकमत निर्मिती करणाऱ्या माध्यमाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या माध्यमाचा अभ्यास राजकीय संसूचनाच्या माध्यमाद्वारे होऊ शकतो. राजकीय संसूचन साधण्यात वरील प्रकारचे माध्यमे महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असल्याचे दिसून येते.




 

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...