मंगळवार, २२ जुलै, २०२५

भारतीय लोकशाहीत पैशाची ताकद किंवा भूमिका/Role of money power in Indian Politics

 

भारतीय लोकशाहीत पैशाची ताकद किंवा भूमिका-भारतीय लोकशाही प्रक्रियेत आर्थिक ताकदीचा वापर ही सर्वसामान्य बाब बनलेली आहे.  भारतीय राजकारणात पैशाची ताकद महत्वपूर्ण भूमिका निभावत असते. भारतीय राजकारणावर पैशाच्या ताकदीचा वाढता प्रभाव लोकशाहीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून घातक मानला जात आहे. निवडणुकीत पैशांच्या केल्या जाणाऱ्या मुक्त वापरामुळे निवडणूक खर्चाचे प्रमाण प्रचंड वाढल्याने निवडणुका प्रचंड खर्चिक बनलेल्या आहेत.  निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या अधिकृत मर्यादेपेक्षा कितीतरी जास्त पैसा निवडणूक सभा दौरे, रॅली, जाहिराती यांच्यावर खर्च केला जातो आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर काळ्या पैशाचा वापर केला जातो. 

    भारतातील राजकीय पक्षांकडून तिकीट वाटप करताना उमेदवाराची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन उमेदवारी बहाल केली जाते. निवडणुकीच्या रिंगणात विजयी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवार पैशाचा वापर करतात. मतदारांना प्रभावित करण्यासाठी रोख रक्कम किंवा भेटवस्तू दिल्या जातात. भारतीय राजकारणात पैशांचा वापर निवडणूक प्रचार आणि उमेदवार निवडी पुरता मर्यादित नाही तर शासनाच्या धोरण आखणीवर देखील त्याचा प्रभाव पडत असतो. निवडणुकीतील वाढता खर्च भरून काढण्यासाठी राजकीय पक्ष मोठमोठ्या कार्पोरेट संस्था, भांडवलदार यांच्याकडून देणग्या घेत असतात. भांडवलदारांकडून मिळणाऱ्या मोठ्या देणग्यांमुळे राजकीय पक्ष त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या असतात. त्यामुळे सत्ता आल्यानंतर त्यांच्या ही त्याला अनुकूल परवानगी, कर सवलती, लायसन्स दिले जातात. सत्ताधारी आणि मोठ्या पक्षांना मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळतात. लहान पक्षांना देणग्या मिळत नसल्यामुळे ते अनेकदा निवडणुकीच्या राजकारणातून हद्दपार होतात. निवडणुकीत देखील श्रीमंत उमेदवारांना राजकीय पक्षाकडून तिकिटे बहाल केली जातात. शासकीय पातळीवर धोरण आखणी करताना सामान्य माणसांच्या प्रश्नाला प्राधान्य मिळण्याऐवजी निवडणुकीत पैसे पुरवणाऱ्या उद्योग समूहांच्या मागण्यांना प्राधान्य दिले जाते. निवडणुकांमध्ये केल्या जाणाऱ्या पैशाच्या वापरामुळे सामान्य माणसांचा आवाज दाबला जातो. भारतीय राजकारणात पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवाराला निवडणुकीत त्याचा निश्चित फायदा होतो. कारण तो आपल्या आर्थिक ताकदीचा वापर करून मतदारांना प्रभावित करत असतो. आर्थिक दृष्ट्या कमकुवत उमेदवारांची निवडणूक जिंकण्याची क्षमता पैशाच्या वापरामुळे कमी होते. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर वाढल्यामुळे भारतीय लोकशाहीमध्ये भ्रष्टाचाराचे देखील प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. कारण निवडणूक काळात केला जाणारा खर्च वसूल करण्यासाठी प्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराला उत्तेजन दिले जात असते. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर गैरमार्गाने जमा केलेल्या पैशाचा वापर केला जात असतो. त्यामुळे निवडणुका  ह्या बेकायदेशीर पैशाला अधिकृतता प्राप्त करून देणाऱ्या ठरतात.

निवडणुकीत पैशाच्या ताकदीच्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी व्यापक निवडणूक सुधारणा करणे गरजेचे आहे. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्याची ऑनलाइन पारदर्शक पद्धतीने नोंदणी करणे गरजेचे आहे. निवडणूक खर्चावर आयोगाने बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. प्रमाणापेक्षा जास्त निवडणूक खर्च करणाऱ्या उमेदवारास निवडणूक लढवण्यास बंदी आणली पाहिजे. मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणे गरजेचे आहे. निवडणुकीत पैसे वाटप करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. कारण पैशाचा वापर ही भारतीय लोकशाहीतील प्रमुख समस्या बनलेले आहे. या वापराला रोखण्यासाठी मजबूत कायदे, नियंत्रण ठेवणाऱ्या प्रभावी संस्था, माध्यमे आणि नागरिकांची जागरूकता यांच्या साह्याने या समस्येवर मात करून भारतीय लोकशाहीला सक्षम बनवता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

भारतीय लोकशाहीत पैशाची ताकद किंवा भूमिका/Role of money power in Indian Politics

  भारतीय लोकशाहीत पैशाची ताकद किंवा भूमिका- भारतीय लोकशाही प्रक्रियेत आर्थिक ताकदीचा वापर ही सर्वसामान्य बाब बनलेली आहे.   भारतीय राजकारणात ...