रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

रामायणकालीन राज्य व्यवस्था, शासन व्यवस्था, स्थानिक शासन

 

रामायणकालीन राज्य व्यवस्था- रामायणात राज्याचे उत्पत्ती संदर्भात करार सिद्धांताचे विवेचन आलेले आहे. सुरुवातीच्या काळात लोक परस्परांची सुरक्षा करत असत. परंतु नंतरच्या काळात प्रजेचे नैतिक अधपतन आणि धर्माचा लोप झाल्यामुळे समाजात अराजकता निर्माण झाली. या अराजक्तेतून बाहेर काढण्यासाठी राज्याची निर्मिती करण्यात आली. लोकांनी मनूला राजा बनवले आणि आपल्या उत्पन्नातील काही अंश त्यांना देण्याचे कबूल केले. त्या मोबदल्यात जनतेचे रक्षण करणे राजाची कर्तव्य बनले. समाजात निर्माण झालेल्या परिस्थितीतून प्रजेवर मर्यादा आणि नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी राज्य निर्माण झाल्याची मत रामायणात व्यक्त केलेले आहे. राज्याच्या उत्पत्ती संदर्भात दैवी सिद्धांताचा उल्लेख देखील रामायणात आलेला आहे. राजा हा परमात्म्याचा अंश आहे. राजाला प्रजापतीचे पुत्र मानले गेले. राज्यात इंद्र, अग्नी, वायू, सूर्य, कुबेर इत्यादींचे गुण आहेत. रामायण काळात राज्य ही संस्था सामाजिक संघटन टिकवून ठेवण्यास मदत करत असे. राज्याचा उद्देश लोककल्याण आहे. प्रशासन सामान्य सामाजिक संघटनेचे एक अंग आहे. राज्याची कर्तव्य वर्णाश्रम व्यवस्थेची स्थापना करणे आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या पद आणि जीवन स्तरानुरुप कर्तव्य पार पाडण्यास सक्षम बनवणे हे राज्याचे कार्य आहे. वर्णाश्रम व्यवस्थेची पालन न करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार राजाला होता. रामाने शंबूकाला केलेली शिक्षा होय. राजा हे कर्तव्य पार पडण्यास अक्षम ठरल्यास त्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार जनतेला होता. राज्याची स्थिती धर्म, अर्थ, काम या मूल्यांच्या प्राप्तीसाठी अनुकूल करणे हे राजाचे काम आहे. धर्म रक्षणासाठी युद्ध करण्याचा राजाला अधिकार बहाल केलेला आहे. युद्धात नैतिक नियमाचे पालन करणे आवश्यक मानले जात होते.

राजपद-  रामायण काळात भारतात बहुसंख्य ठिकाणी राजतंत्र अस्तित्वात होते. रामायण काळात राजतंत्राला महत्त्व होते. परंतु ते निरंकुश राजतंत्र नव्हते. राजा हा सरकारचा प्रमुख होता. प्रजा कल्याण आणि धर्मरक्षण हे दोन राज्याची प्रमुख कामे मानली गेली होती. प्राचीन भारतात राजाच्या दिव्य गुणांबद्दल अनेक ठिकाणी चर्चा केलेली आहे. रामायणात देखील राजपदाचे महत्व, शिक्षण आणि गुणांसंदर्भात चर्चा केलेली दिसून येते. राजा हा सरकारचा प्रमुख होता. प्रजा कल्याण आणि धर्मरक्षण हे दोन राज्याची प्रमुख कामे मानली गेली होती. प्राचीन भारतात राजाच्या दिव्य गुणांबद्दल अनेक ठिकाणी चर्चा केलेली आहे. रामायणात देखील राजपदाचे महत्व, शिक्षण आणि गुणांसंदर्भात चर्चा केलेली दिसून येते. राजाच्या उत्पत्ती संदर्भात वाल्मीकी रामायणात अत्यंत अल्प स्वरूपात माहिती उपलब्ध आहे. रामायणातील विविध भागातील माहिती एकत्र केल्यानंतर श्यामलाल पांडेय यांनी आपल्या जनतंत्रवाद ग्रंथात स्पष्ट केले आहे की, "राजाच्या उत्पत्तीच्या संदर्भात दैवी उत्पत्तीचा सिद्धांत हा एकच सिद्धांत मांडलेला आहे. राजा दशरथ यांच्या मृत्यूनंतर भरत आपला मोठा भाऊ राम यांना अयोध्येत परत येऊन राज्य ग्रहण करण्याची विनंती करतो. त्या प्रसंगात भरतने राजा पदाच्या दैवत्वाबद्दल विचार मांडलेले आहेत". याशिवाय रामाने वालीला बाणाचा प्रहार करून जखमी केले. जखमी अवस्थेत वाली रामाला क्षात्र धर्माला कलंक लावला असा आरोप करतो. त्या समयी त्या आरोपाची उत्तर देताना राम सांगतो की, 'राजाचा तिरस्कार करू नये, राजा बद्दल वाईट बोलू नये कारण राजा हा देव आहे. मनुष्य रूप धारण करून तो पृथ्वीवर वावरत असतो.' या उपरोक्त उदाहरणाच्या आधारावर मत व्यक्त करता येते की रामायण काळात राजाच्या दैवी उत्पत्ती बद्दल सिद्धांताला मान्यता होती. वाल्मीकि रामायणत राज्याच्या आवश्यकतेवर विशेष भर दिलेला आहे. राजे शिवाय स्थिर शासन राहू शकत नाही. राज्यात अराजकता निर्माण होऊ शकते. 'बिना जल की नदिया, बिना घास का वन और बिना गोपाल का ग उओ जो दशा होती है वही दशा ऐसे राष्ट्र की हो जाती है|' वरील वाक्यातून राज्यपदाची आवश्यकता आणि महत्त्व लक्षात येते.

रामायण काळात ऋषी आणि आचार्य यांचे धार्मिक क्षेत्रा सोबत राजकीय क्षेत्रात देखील सल्ला मान्य केला जात असे. प्रजेचे हित लक्षात घेऊन राज्यकारभार करणे आवश्यक मानले जात असे. धर्माचे पालन करणे आवश्यक होते. राजे चक्रवती, सम्राट पदव्या धारण करत असत. साम्राज्य विस्तारासाठी किंवा साम्राज्य विस्तारानंतर राजे राजसूय, अश्वमेघ सारखे यज्ञ करत असत. उदा. श्रीराम यांनी असे यज्ञ केलेले आहेत.  रामायण काळात राजा हा सर्वोच्च प्रशासकीय प्रमुख होता. राजा हा राज्याचा प्रमुख होता. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्तीसाठी आवश्यक वातावरण निर्मितीसाठी राजाने शासन करणे आवश्यक मानले जात होते. राजाची नियुक्ती वश परंपरागत पद्धतीने होत असे. वंश परंपरागत पद्धतीने नियुक्ती होत असले तरी योग्यतेचा देखील विचार केला जात असे.  राजाच्या ज्येष्ठ पुत्राला सत्ता  बहाल केले जात असे. परंतु ज्येष्ठ पुत्र राजे पदासाठी योग्य नसेल तर त्यानंतरच्या ज्येष्ठ पुत्राला राजा बनवले जात असे. रामायणात राजपदावर उत्तराधिकार ज्येष्ठ पुत्राला दिला जात असे. यासंदर्भात रामाची सावत्र आई कैकयी आणि दासी मंथरा यांच्यातील संवादात विवेचन आलेले आहे. कैकयी दासी मंथराला सांगते की," भरताला रामाने 100 वर्ष राज्य केल्यानंतर राज्याची प्राप्ती होईल." कैकयीच्या विधानाला प्रतिवाद करताना मंथरा सांगते की, "रामचंद्र राजा झाला की त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजा होतील. भरत कायमचा राज्य अधिकारापासून वंचित होईल." वरील संवादावरून स्पष्ट होते की रामायण काळात राजपदाचा उत्तराधिकार ज्येष्ठ पुत्राकडे येत असे.

रामायण काळात राजाची नियुक्ती वंशपरंपरागत आधारावर केली जात असे. परंतु त्या नियुक्तीस सभा, जानपद पौर, मंत्रिमंडळ, परिषद इत्यादी कडून मान्यता घेतली जात असे. रामायणात काही ठिकाणी राजे जनतेद्वारे नियुक्त केले जात असल्याचे आढळून आलेले आहे. रामायण काळात राजा वंश परंपरागत पद्धतीने नेमला जात असला तरी त्याच्या अधिकाऱाला प्रजेची मान्यता घेतली जात होती. राजा सगर यांच्या मृत्यू नंतर गादीवर बसलेल्या अंशुमान नावाच्या राज्याची नियुक्ती प्रजेच्या संमतीने झाल्याचे उदाहरण आहे. रामाला युवराज बनवण्याची संबंधित प्रस्ताव राजा दशरथ यांनी परिषदेत मान्यतेसाठी ठेवला होता. प्रजेने रामाला युवराज बनविण्याच्या प्रस्तावाला मान्यता प्रदान केली होती. युवराज राम यांचा राज्याभिषेक करण्याचा प्रस्ताव राजा दशरथ यांनी सभेत ठेवला होता. सभेचे विचार जाणून घेतल्यानंतर दशरथानी रामाचा राज्याभिषेक केला.  राजा दशरथ यांच्या मृत्यूनंतर राम वनवासात गेल्यामुळे राज पद रिक्त झाले होते.  मंत्रिमंडळाने राजगुरू वशिष्ठ यांचा सल्ला घेतला. वशिष्ठ च्या मते राजाशिवाय राज्य म्हणजे अरा जकता होय. राजा शिवाय राज्यात अशांती निर्माण होईल. मत्स्य न्यायाला महत्त्व प्राप्त होईल. त्यामुळे ताबडतोब राजा नेमण्यासाठी वशिष्ठांनी भरताला रामचंद्रांना अयोध्येला बोलविण्याचा सल्ला दिला. हा निर्णय सर्वांनी मान्य करून रामांना अयोध्या येथे आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. राणी कैकयीमुळे ज्येष्ठ पुत्र रामाला वनवासात जावे लागल्यामुळे आयोध्या नगरीत प्रत्येक घरात तिची मोठ्या प्रमाणावर आलोचना केली जाऊ लागली.

रामायणात राजाची नियुक्ती करताना अनुवंशिक तत्वाला महत्व दिले जात असे. ज्येष्ठ पुत्राला राजा म्हणून संधी दिली जात असे. राजा दशरथ यांच्या मृत्यूनंतर रामाने राजत्याग केल्यामुळे भरताला राजा होण्यासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय सभेने घेतला. परंतु मोठा भाऊ जिवंत असताना धाकट्या भावाला राजा करणे इक्ष्वाकू धर्मविरुद्ध आहे असे सांगून भारतानेही ऑफर नाकारली याचा अर्थ राजपदावर ज्येष्ठ पुत्राचा दावा धर्मसंमत मानला जात असे. राजाशी संबंधित प्रशिक्षण, दैनंदिन वेळापत्रक, सल्लागार आणि सभा इत्यादी संदर्भात रामायणात वर्णन केलेले आहे. राजपुत्रांना वेद वेदांग विज्ञान कला साहित्य, धनुर्विद्या, शस्त्रविद्या, लष्करी रणनीती शिकवली जात असे. राजपुत्राच्या प्रशिक्षणात आत्मसंयमावर भर दिला जात असे. मंत्र्यांची सल्ला मसलत केल्यानंतरच निर्णय केला जात असे. निर्णय घेताना राजाने जनमताचा आदर करावा. प्रशासनाची पुरेशी व्यवस्था असल्याशिवाय राजधानी सोडू नये.

मंत्रीपरिषद-रामायण काळात राजाला मदत आणि सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद अस्तित्वात होती. सर्वगुणसंपन्ना, चरित्रवान, प्रमाणिक बुद्धिमान, दूरदर्शी शास्त्राचा जाणकार व्यक्तींची मंत्रिपदी नियुक्ती केली जात असे. मंत्र्यांकडे विविध विभागांची जबाबदारी सोपवली जात असे. रामायणातील बालकांडात राजा दशरथ यांनी आपल्या मंत्र्यांच्या श्रेष्ठ गुणांचे गुणगान केलेले आहे. मंत्री बनवण्यासाठी व्यक्ती राज्याचा नागरिक असणे आवश्यक होते. राज्याच्या निवासी असलेल्या व्यक्तीला मंत्री केले जात असे. मंत्री पदावरील व्यक्तीबद्दल प्रजेमध्ये विश्वास असणे आवश्यक होते. मंत्री परिषदेची वेळोवेळी बैठक बोलावली जात रामायणातील बालकांडामध्ये राजा दशरथ यांना पुत्र प्राप्तीसाठी अश्वमेध यज्ञ करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. रामाचा राज्याभिषेक आणि विवाहप्रसंगी देखील मंत्री परिषदेची बैठक बोलावलेली दिसून येते.मंत्री परिषदे शिवाय अमात्य, सचिव, राजपुरोहित इत्यादी पदांचा देखील उल्लेख केलेला दिसून येतो.रामायणात मंत्र्यांशिवाय राजपुरोहित विद्वान आणि सैनिक पदाधिकारी राजाला सल्ला देत असल्याचे उल्लेख आहेत. राजकुमार मंत्री, अमात्य आणि ऋषींच्या सल्ल्याला महत्त्वपूर्ण स्थान होते.  वाल्मिकी रामायणात 18 विभागांच्या प्रमुखाचा उल्लेख आहे. त्यात मंत्री, पुरोहित, युवराज, दुर्गपाल इत्यादी प्रमुख विभाग होते. मंत्री हे चारही  वर्णातून  घेतले जात होते. प्रशासनात पुरोहित यांना महत्त्वाचे मंत्रीस्थान होते. राजाला राज्यकारभारात मदत करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी असत. राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी सेनेचा प्रमुख सेनापती कडे असे. सेनापतीची नेमणूक करण्याचा अधिकार राजाला होता. रामायण काळात राजा निरंकुश सत्ताधीश न होता. राजा धर्माच्या नियमानुसार शासन करत असे. राजाला प्रजेच्या रक्षणाची शपथ घ्यावी लागेल. अन्याय किंवा दुराचारी राजाच्या वध करण्याची अनुमती होती. अत्याचारी राजा प्रजाद्वारे मारले गेल्याची उदाहरणे आहेत. धर्मशास्त्राच्या अनुसार न्यायदान करणे हे राजाचे काम होते. राजा हा सर्वोच्च न्यायाधीश होता. अंतिम न्यायदानाचा अधिकार देखील राजाला होता.   स्थानिक पातळीवर न्यायदान करण्यासाठी अधिकारी नेमले जात असे. राज्याच्या संरक्षणासाठी विशाल सेना निर्माण केली जात असे. चतुरंगिनी सेना अस्तित्वात होती. चतुरंगिनी सैन्यात रथ, हत्ती, धोडे सवार आणि पायी लढणाऱ्या सैनिकांचा समावेश असे. महाकाव्य काळात अर्थव्यवस्था कृषी आणि पशुपालनावर आधारित होती. लोक आपल्या उत्पन्नातील सहावा हिस्सा राजाला कर रूपाने देत असत. व्यापार शुल्काच्या माध्यमातून देखील राजाला उत्पन्न मिळत असे.

रामायण काळात राजा हा आदर्श प्रशासक आणि धर्मपरायण शासकाच्या स्वरूपात जबाबदाऱ्या पार पडत असे. प्रशासकीय व्यवस्थेत केंद्रीयकृत राजतंत्र आणि सहभागी गणतंत्र दोन्ही प्रकारच्या शासन प्रणाली अस्तित्वात होत्या. धर्मनीती आणि परंपरेच्या आधारावर शासन चालवले जात असे. राजाला शासन चालवताना मंत्री, अधिकारी आणि सैन्याची मदत मिळत असे.

शासकीय रचना-रामायण काळात राजा हा प्रशासनाचा केंद्रबिंदू होता. राजाला मदत किंवा सहाय्य करण्यासाठी आमंत्रित किंवा सचिव असत. राजाला एक वैयक्तिक सचिव देखील दिला जात असे. उदाहरणार्थ राजा दशरथ यांचा सारथी सुमंत्रा हा त्यांचा वैयक्तिक सचिव होता. अमात्य व्यतिरिक्त रामायणात काही मंत्र्यांचा देखील उल्लेख आहे. त्यात वशिष्ठ, वामदेव आणि इतर वंशपरंपरागत सात मंत्री आहेत. त्यात सुयज्ञ, जबाली, कश्यप गौतम, मार्कंडेय, दीर्घायु, कांत्यायन, ऋत्विक इत्यादींचा समावेश होता. मंत्री हे सल्लागाराच्या रूपाने काम करत असत तर दैनंदिन प्रशासनाची जबाबदारी अमात्यांकडे होती. रामायणात देखील राम आणि भरत यांच्यातील संवादात मंत्रिमंडळचा उल्लेख आलेला आहे.  राम वनवासात गेल्यानंतर भरत रामाला भेटायला जातो आणि रामाला परत राजा बनण्याची विनंती करतो. तेव्हाची राम भरत संभाषणात 18 तीर्थ किंवा विभागांची व्यवस्था असल्याचे निर्देशनाशी येते. त्यात

मंत्री (मंत्री)

पुरोहित (पुजारी)

युवराज (राजकुमार)

सेनापती (सेनापती)

दौवरिका (लॉर्ड चेंबरलेन)

अंतरवांशिक (पॅलेस मॅनेजर)

कारगराधिकारी (कारागृह अधीक्षक)

अर्थसंचयकृत (कोषाध्यक्ष)

कार्यानियोजक (कम्युनिकेशन्स आयुक्त)

प्राडविवाक (न्यायाधीश)

सेनानायक (लष्कर प्रमुख)

नागराध्यक्ष (राजधानीचे महापौर)

कर्मातिका (सिव्हिल पेमास्टर)

सब्य (परिषद सचिव)

धर्माध्यक्ष (मुख्य न्यायाधीश)

दंडपाल (पोलीस आयुक्त)

दुर्गापाल (किल्ल्यांचा सेनापती)

राष्टरांतरापाल (सरहद्द राज्यपाल)

इत्यादी विभागांची माहिती मिळते.

सभा- प्रशासनाचा पुढचा घटक म्हणजे सभा होय. रामायण कालीन शासन व्यवस्थेचे सभा,मंत्री परिषद आणि राजा हे प्रमुख तीन अंग होते. सभा हा शासन व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण संस्था होती. रामायण सभा शब्द हा सभा भवन आणि सदस्यांच्या बैठक या दोन अर्थाने वापरलेला दिसून येतो. रामायणातील अयोध्या कांडात राजा दशरथ यांनी प्रजेच्या विभिन्न वर्गांच्या प्रतिनिधींची एक परिषद सभा भवनात पुत्र राम यांची युवराज म्हणून नेमणुकीस स्वीकृती देण्यासाठी बोलवली असल्याचा उल्लेख आलेला आहे. दुसरा उल्लेख राजा दशरथ यांच्या मृत्यूनंतर राजगुरू वशिष्ठ आणि राज्याचे वरिष्ठ पदाधिकारी सभा भवनात एकत्र आले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी भावी राजाच्या नियुक्तीच्या संदर्भात चर्चा केलेली दिसून येते. रामायणात सभेबद्दल आलेल्या वर्णनात सभेसाठी अत्यंत उच्च दर्जाचे आसन बनवलेले असतात. राजगुरू किंवा राज पुरोहित एका विशेष प्रकारच्या आसनावर बसत असत. सदस्यांच्या दर्जेनुसार छोटे मोठे आसन तयार केलेले असतात. सभेतील सदस्य राजाकडे मुख करून पूर्वनिर्धारित आसनावर बसत असत. सभा सदस्यांची स्थान निश्चित केलेले असत. तत्कालीन काळात सभेच्या कामकाजात अनुशासन राखण्याच्या दृष्टिकोनातून विशेष लक्ष दिले जात असे. सभेत सहभागी होणाऱ्या सदस्यांना नियमाचे पालन करावे लागेल. सभाभवनाच्या दरवाजावर द्वारपाल नेमलेला असे. त्याच्या आज्ञेशिवाय कोणताही व्यक्ती सभेत प्रवेश करू शकत नसे. उदा. हनुमानाने रावणाच्या सभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु द्वारपालने त्यांना आत सोडण्यास मनाई केली. सभेच्या सदस्यांना सभासद असे म्हटले जात असे. राजा आणि युवराज, राजगुरूच्या  आगमनाच्या प्रसंगी सदस्य अभिवादन करण्यासाठी आसना जवळ उभे राहत असत. महत्वपूर्ण गोष्टींचा निर्णय करण्याआधी राजा त्यासंबंधीचा प्रस्ताव मांडत असतात. राजा राम यांना राजपुत्र  पदावर नेमण्याचा राजा दशरथ  यांनी निश्चय सभेच्या सदस्यांसमोर मांडलेला होता. सभेचे अध्यक्षता राजा ग्रहण करत असे. सभेत एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर सदस्य आप आपले विचार प्रकट करत असत आणि सर्वात शेवटी सर्व संमतीने निर्णय घेतला जात असे. सभेचा प्रधान राजा असे. राजाच्या अनुपस्थित सर्वश्रेष्ठ सदस्याला सभेचे अध्यक्ष पद धारण करावे लागत असे. सभा हे तत्कालीन काळातील शक्तिशाली संस्था असल्याकारणाने सभेला काहीदा न्यायदानाचे देखील काम करावे लागत असे.

सभेचे संघटन-सभेच्या संघटना संदर्भात रामायणात अनेक ठिकाणी उल्लेख आलेला आहे. सभा ही राजधानीच्या ठिकाणी भरत असे. अयोध्या ही राज्याची राजधानी असल्याकारणाने रामायणात सभा तेथे भरत होती. सभा भवन राजमहालाच्या जवळ असायचे.जनतेतील विविध वर्ग आणि हितांचे प्रतिनिधित्व करण्याचा सभा सदस्यांना अधिकार होता. सभा किंवा परिषदेत सदस्यांशिवाय राजगण देखील उपस्थित राहत असत. राज्याशी राजनीतिक संबंध असलेल्या लोकांना राजगण असे म्हटले जात असे. सभेत राजा, पुरोहित सेनापती, पौरजन, ऋषी, प्रजेचे प्रतिनिधी, मंत्री अमात्य इत्यादी उपस्थित राहत. राज घराण्याच्या सदस्यांना देखील सभेत सहभागी होण्याचा अधिकार होता.  सभेचे अध्यक्षपद राजा भूषित असे. क्षेत्रीय वर्गाचे श्रेष्ठी आणि वैश्यांमधील उच्चभ्रू प्रतिनिधी उपस्थित राहत असत. याशिवाय पट्टण नागर घोष आणि ग्राम इत्यादी ग्राम आणि नगराचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहत असे. यासोबत साम्राज्यातील इतर राजे देखील सभेत आमंत्रित सदस्य असत.रामायणात लंका राज्याच्या सभेचे वर्णन आलेले आहे. लंकेच्या सभेच्या कामकाजात काही प्रजा तंत्रात्मक तत्त्वांची देखील झलक दिसून येते. रावणाच्या आदेशानुसार राक्षसांची सभा बोलवण्यात आली. या सभेला उपस्थित राहण्यासाठी सदस्यांकडे दूत पाठवण्यात आले होते. या सभेत राजाशिवाय मंत्री गण, विविध विभागाचे अध्यक्ष, मुख्य योद्धा गण सहभागी झाले होते. सभेत सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा होत असे. महत्वपूर्ण खटल्यांबद्दल निकाल देण्याचा अधिकार देखील सभेला होता. पौरजन हे सभेतील सर्वात शक्तिशाली अंग मानले जात होते. पौरजन हे संपूर्ण राज्याच्या प्रजेचे प्रतिनिधित्व करत असे. पौर मध्ये राजधानीचे प्रतिनिधी असतात तर जनपदात राष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधी असतात. सभेत राजाला प्रस्ताव ठेवण्याचा अधिकार होता. सभासदांना विचार मांडण्याचे स्वातंत्र्य होते. रामायणात राम लंकेवर आक्रमण करणार आहे या बातमीने रावणाने अस्वस्थ होऊन सभेची बैठक बोलावली होती. या सभेत कुंभकर्णाने सीतेला या ठिकाणी आणण्याचे आधी आमच्याशी परामर्श करणे गरजेचे होते हे मत कुंभकर्णाने मांडले होते. बिभीषण यांनी देखील रावणाच्या निर्णयाला विरोध केला होता. सीतेला सन्मानाने रामाकडे परत करण्याची विनंती केली होती. विभीषणाने विरोधी मत व्यक्त केल्यामुळे त्यांना देश त्याग करावा लागला होता.  सभेत बहुमताच्या आधारावर निर्णय घेतले जात होते.

पौर-जनपद- पौर जनपद सारख्या प्रातिनिधिक संस्था अस्तित्वात होत्या. पौर -जनपद सारख्या संस्थेत नगर आणि ग्रामीण क्षेत्रातल्या प्रतिनिधींचा समावेश होता. पौर-जनपद हा शब्द पुर आणि जनपदाचे प्रतिनिधी यांचा मिळून बनलेला आहे. रामायणातील स्थानिक शासनाचे प्रमुख दोन भाग होते. एक पौर आणि दुसरा जनपद होय. शहर आणि ग्रामीण प्रतिनिधींची मिळून ही संस्था बनलेली असेल. आपत्कालीन परिस्थितीत आणि कर निर्धारण करताना ही समिती राजाला मदत करत असे. एस एस अलतेकर यांच्या मते, पौर हा शब्द नगरातील निवासी या अर्थाने वापरला जात आहे.पौर-जनपदाच्या रचना आणि कार्यासंदर्भात रामायणात त्रोटक माहिती दिलेले असल्यामुळे तिच्या रचना व कार्याबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद दिसून येतात. रामायणात स्थानिक प्रशासना विषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.

रामायणकालीन राज्य व्यवस्था, शासन व्यवस्था, स्थानिक शासन

  रामायणकालीन राज्य व्यवस्था - रामायणात राज्याचे उत्पत्ती संदर्भात करार सिद्धांताचे विवेचन आलेले आहे. सुरुवातीच्या काळात लोक परस्परांची सुरक...