उत्तर-वैदिक काळातील राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था
वैदिक
काळाचा कालावधी इ.स.पूर्व
1500 ते इ.स. पूर्व 600 पर्यंत आहे.
वैदिक काळाचे ऋग्वेदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ असे दोन भाग केले जातात. ऋग्वेदिक
काळ इ.स.पूर्व 1500 ते इ.स. पूर्व 1000 पर्यंतचा आहे. उत्तर
वैदिक काळाचा कालखंड इ.स. पूर्व 1000 ते इ.स. पूर्व 600 पर्यंत
मानला जातो.उत्तर वैदिक काळात गंगा आणि यमुनेच्या खोऱ्यात आर्य लोक कायमस्वरूपी
वस्ती करून राहू लागले. त्यामुळे उत्तर वैदिक काळात ऋग्वेद कालीन टोळ्यांची
व्यवस्था नष्ट होऊन क्षेत्रीय राज्य किंवा जनपदांची स्थापना झाली. क्षेत्रीय
राज्यांच्या उदयामुळे युद्ध गाई ऐवजी क्षेत्रावर ताबा मिळवण्यासाठी होऊ लागले.
वैदिक काळात अत्यंत साध्या सरळ प्रशासकीय व्यवस्था अस्तित्वात होत्या. उत्तर वैदिक
काळात प्रशासकीय व्यवस्था अधिक जटिल आणि गुंतागुंतीच्या बनल्या. ऋग्वेद काळात
जनांचे आकार अत्यंत लहान होते. परंतु उत्तर वैदिक काळात अनेक छोटे छोटे कुल आणि जन
एक दुसऱ्यात विलीन होऊ लागल्यामुळे त्यांचे जनपदात रूपांतर झाले. जनपदाच्या वाढता
भूभागामुळे राजाची कार्यक्षेत्र देखील वाढले. जनपदाच्या संरक्षणासाठी मोठ्या
प्रमाणावर सैन्याची आवश्यकता भासू लागली. सैन्याच्या वाढत्या संख्येमुळे देखील
राजाचे महत्व वाढू लागले. राजाकडे आलेल्या धार्मिक आणि न्यायविषयक अधिकारामुळे तो
परमेश्वराचा प्रतिनिधी आहे किंवा राजात दैवी अंश आहेत ही लोकांची धारणा झाल्यामुळे
राजाचे अधिकार वाढले. फार मोठ्या भूभागावर राजा राज्य करत असल्याने त्या भूभागाचे
रक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी सैन्य आणि नोकरशाहीची स्थापना केल्यामुळे राजाचे
अधिकार अधिकच वाढले.
उत्तर
वैदिक काळातील अनेक ग्रंथात राजा पदाचे महत्त्व वाढवण्याच्या दृष्टिकोनातून
प्रयत्न केले गेलेले दिसतात. या काळात निर्वाचन तत्व ऐवजी वंशपरंपरागत किंवा
अनुवांशिक तत्वाच्या आधारावर राजे सत्तेवर येऊ लागले. राज्याच्या वाढत्या
शक्तीमुळे जनतांत्रिक शासनाचे निरंकुश शासनात रूपांतर होऊ लागले. राज्याच्या
वाढत्या अधिकारामुळे सभा आणि समिती सारख्या प्रभावशाली संस्थेचे महत्व कमी होऊ
लागले. राजा अनेकदा या संस्थांचे मत डावलून निर्णय घेत असे. सामाजिक स्तरावर
वर्णव्यवस्थेच्या वाढत्या प्रभावामुळे सभा,समिती आणि
प्रशासनामध्ये महिलांना प्रतिनिधित्व देण्याची परंपरा समाप्त करण्यात आली. राजा
आपल्या क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी राजसूर्य यज्ञ, अश्वमेध
यज्ञ करू लागले. राज्य चालवण्यासाठी राजा लोकांकडून कर वसूल करू लागला. जनतेला
आपल्या उत्पन्नातील 16 वा भाग कराच्या रूपाने राजाला द्यावा लागत असे. कर हा पशु
किंवा वस्तूच्या रूपात जमा केला जात असे. राजाच्या वाढत्या अधिकारामुळे प्रशासकीय
व्यवस्थेमध्ये देखील बदल होत गेले. राजा शक्तिशाली बनल्यामुळे राजाला सहकार्य
करणारी प्रशासकीय व्यवस्थादेखील शक्तिशाली बनवण्यात आली. राजाला राजकारभारात मदत
करण्यासाठी बारा प्रकारच्या अधिकाऱ्यांचा उल्लेख शतपथ ब्राह्मण ग्रंथात केलेला
आहे. त्यात सेनानी, पुरोहित, युवराज, सूत, ग्रामीणी, प्रतीहार
इत्यादींचा उल्लेख आहे. न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये राजा हा सर्वोच्च अधिकारी
बनला. उत्तर वेदकालात 'रत्नीन मंडळ' हे सल्लागारांचे मंडळ राजाला
राज्यकारभारात मदत करीत असे. त्यामध्ये महिणी (पट्टराणी), युवराज,
ग्रामणी, सेनापती, भागधूक
(कर वसुली करणारा), सूत (सारथी), संग्रहिता
(कोषागार प्रमुख) इत्यादी अधिकाऱ्यांचा समावेश असे. धार्मिक आणि सैनिक कार्य
करणारी विदथ ही जनतांत्रिक संस्था राजाला संरक्षण व धार्मिक बाबतीत सल्ला देत
असे.विदथ सभेत समाजातील महत्त्वपूर्ण जनजातीला प्रतिनिधित्व दिले जात असे.