महाराष्ट्राचे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण हळूहळू भाजपच्या
नियंत्रणाखाली जाण्याची प्रक्रिया वेगवान पद्धतीने होऊ लागले. विधानसभा निवडणुकीत
भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाचा वाटा
होता. मात्र संख्यात्मक दृष्टिकोनातून दोन्ही पक्षांच्या जागा फारच कमी आहेत.
भाजपच्या जागा बहुमताच्या जवळपास जाणाऱ्या आहेत.
संख्यात्मक बळामुळे भाजपसोबत फरपटत जाण्याशिवाय राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे
पर्याय नव्हता. एकनाथ शिंदे नाराजी प्रदर्शित करत भाजप नेतृत्वावर दबाव आणण्याचा
प्रयोग अनेकदा केला. गृहमंत्री अमित शहा यांच्या
भेटी घेतल्या. परंतु भाजपचे नेतृत्वाने कोणतीही भीक घातली नाही. तक्रार
करण्या ऐवजी जुळून घेण्याचा सल्ला देण्यात आला.
https://www.effectivegatecpm.com/hwbwbwfu?key=6f4040dd4ddb6847604eefe64fbb0be7
अजित पवार यांनी
वास्तवाचे भान ठेवून भाजप नेतृत्वाशी जुळवून घेतले. भाजपने दिलेल्या सत्तेच्या
वाट्यावर समाधान मानून राजकीय राजकीय ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पार्टीच्या पक्षाच्या नेत्यांची संवाद व संपर्क साधण्यास सुरुवात केली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना सत्तेचे डोहाळे लागलेले होते.
विरोधात राहून राजकारण करण्याची सवय नसलेल्या मोजक्या सरदारांचा हा पक्ष असल्याने
अजित पवारांनी मैत्रीचा हात पुढे करताच पक्षाच्या वैचारिक भूमिकेचा विचार न करता
महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आपला पक्ष अजित पवारांना आंदण म्हणून
देऊन टाकला. अजित पवारांच्या पक्षाशी युती हा सत्तेत शिरण्याचा एक राजमार्ग आहे हे
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील चाणक्यांनी बरोबर हेरले. पक्षाच्या
नेत्यांच्या कृतीला शरद पवारांनी मुकसंमती देऊन आपल्या वैचारिक धरसोडीचे पुन्हा
एकदा महाराष्ट्राला दर्शन दिले. दोन डगरीवरच्या पाय ठेवून राजकारण करणाऱ्या
यशवंतरावांचाच कित्ता शरद पवारांनी गिरवल्यामुळे त्यांच्या एकंदरीत राजकारणाबद्दल
संशयकल्लोळ निर्माण होत गेला. त्याबद्दल पवारांनी तो संशय दूर करण्याचा कधी
प्रयत्न केला नाही. परस्पर विरोधी विधाने करून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न
केला. अजित पवारांच्या पक्षाशी युती करताना पवारांनी हीच नेहमीची भूमिका घेतली.
आपला पक्षच अजित पवाराच्या स्वाधीन केल्यामुळे प्रशांत जगताप सारख्या काही मोजक्या
नेत्यांनी खळखळ व्यक्त केली. पण सत्तातुर असलेल्या राष्ट्रवादीतले नेत्यांनी
सोईस्कर दुर्लक्ष करून अजित पवार यांच्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर आपल्या
पक्षाचे उमेदवार उभे केले.
राष्ट्रवादी
काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या मनोमिलनाकडे भाजपचे बारीक लक्ष होते.
परंतु जोपर्यंत चेंडू टप्प्यात येत नाही तोपर्यंत बॅट फिरवायची नाही हि भाजपची आजवरची
रणनीती राहिलेली आहे. या रणनीतीचा वापर करून भाजपने अनेक प्रादेशिक पक्षांना
राजकीय स्पर्धेतून बाजूला काढलेले आहे. भाजपला ही संधी अजित पवारांच्या निधनाने
उपलब्ध झाली. अजित पवारांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोरका बनला. अजित
पवारांची जागा समर्थपणे सांभाळू शकेल असा नेता राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपलब्ध
नसल्यामुळे अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे भाजपशी जवळीक असलेल्या
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ या नेत्यांकडे
गेली. या नेत्यांच्या मदतीने भाजपने सूत्रे हलवण्यास सुरुवात केली. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या
भावनिक वातावरणाचा लाभ उठवण्यासाठी शरद पवार गटातील नेत्यांनी राष्ट्रवादीच्या
विलीनीकरणाची चर्चा सुरू केली. दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणाबाबत अजित
पवार आणि जयंत पवार यांच्यात अनेकदा चर्चा झाल्याची दाखले देण्यात आले. 12 फेब्रुवारीला विलीनीकरणाची
करण्याची घोषणा केली जाणार होती असा दावा सुरू केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांच्या
नेत्यांची रणनीती भाजपच्या चाणक्यांच्या लक्षात आली.
राष्ट्रवादीच्या
दोन्ही गटाच्या विलीनीकरणातून होणाऱ्या संभाव्य धोक्याची भाजपच्या चाणक्यांना जाण
होती. दोन्ही गटाच्या विलीनीकरणानंतर पक्षाची सूत्रे शरद पवारांकडे जाणार हे
जवळपास निश्चित होते. शरद पवारांकडे सूत्रे गेल्यास राष्ट्रवादीत फूट पाडण्यासाठी
भाजपने केलेल्या प्रयत्नावर पाणी फिरेल. सरकार चालवत असताना एकनाथ शिंदेंच्या लहरी
स्वभावाचा अगोदरच भाजपला ताण पडतो आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची
सूत्रे शरद पवारांकडे जाणे भाजपच्या सरकारच्या दृष्टीने नवी डोकेदुखी बनेल.
पवारांचे एकंदर राजकारण भाजपला बऱ्यापैकी माहित असल्याने त्यांना दूर ठेवणे योग्य
ठरेल. तसेच पवारांचा गट राष्ट्रवादीत विलीन झाल्यास त्यांना सत्तेत वाटा द्यावा
लागेल. मुळातच सत्तेत पदांपेक्षा वाटेकरी अधिक आहेत. एक नवा वाटेकरी आल्यामुळे
आधीच्या इच्छुकांचा हिरमोड होईल. या सर्व बाबी लक्षात घेऊन भाजपने सूत्रे हलवण्यास
सुरुवात केली. राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या आपल्या जवळच्या मित्रांना कामाला
लावले. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनविण्याच्या
हालचाली सुरू झाल्या. अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसात सुनेत्रा पवार
यांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी
काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करून शपथविधी घडून आणला. या सर्व
घटनाक्रमामध्ये शरद पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्यांना जाणीवपूर्वक दूर
ठेवण्यात आले. सुनेत्रा पवार यांची शपथविधी झाल्यानंतर पवारांनी घेतलेल्या पत्रकार
परिषदेत आपल्याला जाणीवपूर्वक बाजूला सारले गेल्याची हतबलता व्यक्त केली. शपथविधी
बाबत आपल्याला वर्तमानपत्रातून कळले असा पवित्रा घेतला. शरद पवारांच्या विधानानंतर
त्यांना राजकीय सहानभूतीमुळे मिळू नये म्हणून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार
यांची ताबडतोब बारामतीला रवानगी करण्यात आली. त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन दीर्घ
चर्चा करून त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.
भाजपने टाकलेल्या
जाळ्यात पवार कुटुंब पूर्णपणे अडकले. या जाळ्यातून सुटका करून घेण्यासाठी पवार
कुटुंबातील सुप्रिया सुळे,
रोहित पवार यांनी
आम्ही अजित पवारांच्या निधनाच्या धक्क्यात आहोत. अजित पवारांचा दुखवटा
संपल्यानंतर सविस्तर पत्रकार परिषद घेऊन
आपली भूमिका मांडून केविलवाणी पद्धतीने बचाव करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या
राजकारणाला प्रतिशह देण्यासाठी शरद पवारांनी आपल्या पक्षातील विविध नेत्यांच्या
माध्यमातून राष्ट्रवादीच्या विलीनीकरण ही अजित पवारांची इच्छा होती ही भावनिक
टॅगलाईन मीडिया मार्फत पसरवण्यास सुरुवात केली. या विलनीकरणाला राष्ट्रवादीचे नेते
दाद देत नाही हे लक्षात आल्यानंतर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना प्रामुख्याने विलीनीकरणाच्या
मार्गातील प्रमुख शत्रू म्हणून सादर करण्यास सुरुवात केली. त्यांच्या बचावासाठी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे आले. अजित पवारांनी विलीनीकरणाबाबत आपल्याला
काही सांगितले नसल्याचा दावा केला. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीची विलीनीकरण
झाल्यास पवार भाजपसोबत यायला तयार होतील का? याबद्दल खुलासा करावा असा पलटवार करून शरद पवारांना अडचणीत
आणण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या
नेत्यांनी निरुउत्साह दाखवलेला असताना शरद पवार गटातील नेत्यांनी दाखवलेला उत्साह
शरद पवारांची हतबलता दाखवतो. भाजपची वैचारिक भूमिका मान्य नसताना आपल्या
सहकाऱ्यांची सत्ता आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शरद पवार विलीनीकरणासाठी पुढाकार
घेताना दिसतात. दीर्घकाळ आपल्या पक्षातील सहकारी सत्तेच्या बाहेर राहिल्यास पक्षात
फूट पडण्याचा धोका देखील पवारांना जाणवू लागलेला आहे. पक्षातले अनेक सहकारी उघड
उघड पवारांचा विरोध असताना अजित पवारांना भेटत होते. आपले वाढते वय दीर्घकाळ
संघर्ष करून पक्षाला नवी उभारी देऊ शकत नाही हे वास्तव जाणून आपले अस्तित्व
टिकवण्यासाठी पवारांनी विलीनीकरणाचा करण्याचा डाव टाकला. शरद पवारांची अगतिकता आणि
हतबलता भाजपाच्या चाणक्यांनी हेरून विलीनीकरणाच्या मार्गात खोडा उभा केला.
राष्ट्रवादीच्या
विलीनीकरणाच्या लढाईत आपण पिछाडीला पडत असल्याची दिसू लागल्यानंतर प्रदेशाध्यक्ष
शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी मासिकात
लेख लिहून विलीनीकरणासंदर्भात अनेक खुलासे केले. अजित पवारांच्या आकस्मित निधनाने
एकत्र येण्याची प्रक्रिया रखडली. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरू
होती. अजित पवार यांना एकत्रित राष्ट्रवादीचे अध्यक्ष केले जाणार होते असा दावा केला. अजित पवार गटातील नेत्यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी
आम्हीच मागे लागलोय असे चित्र निर्माण करणे सुरू केलेले आहे. त्यामुळे
विलीनीकरणाबाबत आम्ही बोलणार नाही असा बचावात्मक पवित्रा घेतला.
एकंदरीत अजित
पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबातील चाणक्य शरद पवार यांनी राष्ट्रवादीवर पुन्हा
पकड मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या प्रयत्नात पवारांच्या रणनीतीपेक्षा
हतबलतेचे दर्शन जास्त दिसले. या सर्व घडामोडीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे
नियंत्रण भाजपच्या ताब्यात गेले. भाजपचे चाणक्य आपल्या मर्जीनुसार सोंगाट्या हलवून
राष्ट्रवादीचा पट पुढे नेताना दिसतात. या सर्व घडामोडींमध्ये काँग्रेस आणि उबाठा
पक्ष पूर्णपणे वाऱ्यावर गेलेले दिसतात. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास
आघाडीचा प्रमुख घटक पक्ष होता. शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत.
महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष सत्ताधारी भाजप आघाडीत समाविष्ट असलेल्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीनीकरणाची भाषा करत असताना उबाठाच्या आक्रमक
नेत्यांनी सावध भूमिका मांडली. विलीनीकरण झाले तर आनंद आहे. परंतु विलीनीकरण होईल
असे वाटत नाही. विलीनीकरण झाल्यास बघू ही भूमिका संजय राऊत यांनी मांडली.
राष्ट्रवादीचे विलीनीकरणाबाबत तुम्ही चुकीच्या पक्षाला विचारतात. राष्ट्रवादी
काँग्रेसचा अंतर्गत घडामोडींशी संबंधित प्रश्न आहे. काँग्रेस आणि शिवसेना
यांच्याशी काय संबंध; फारतर भाजपशी
संबंध असू शकेल असे उत्तर देऊन आपली सुटका करून घेतली. दोन्ही राष्ट्रवादीच्या
विलीनीकरणाबद्दल काँग्रेस पक्षाने अद्याप पर्यंत आपली प्रतिक्रिया सविस्तरपणे
व्यक्त केलेली नाही. महाराष्ट्राच्या
राजकारणातील राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासारख्या महत्त्वाच्या घडामोडीत काँग्रेस सारख्या पक्षाने भूमिका न मांडणे
म्हणजे आपल्या 'अकेले चलो' या भूमिकेवर शिक्कामोर्तब केलेले
दिसून येते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box