रविवार, २९ मार्च, २०२६

प्राचीन भारतीय राज्यव्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्था ऐतिहासिक पार्श्वभूमी

 

प्राचीन भारतीय राज्यव्यवस्था आणि  

प्रशासकीय ऐतिहासिक व्यवस्था पार्श्व

भारतीय राजकीय व्यवस्थेचा इतिहास भारतीय संस्कृती आणि धर्मा इतका पुरातन आहे. भारतात प्रशासकीय आणि राजकीय संरचनांचा विकास वैदिक संस्कृतीच्या काळात झालेला दिसून येतो. आर्यांच्या प्रमुख संस्थांचे उल्लेख वैदिक आणि उत्तर वैदिक काळातील उपलब्ध असलेल्या प्राचीन साहित्यात आढळून येते. सांस्कृतिक, धार्मिक, दार्शनिक प्रशासकीय आणि आर्थिक गतीविधीं सोबत राजकीय संस्थांचा परिचय वैदिक साहित्याच्या अभ्यासातून होत असतो. वैदिक साहित्यात शासन व्यवस्था आणि राजकारणाबद्दल विस्तृत विवेचन केलेले आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथ ऋग्वेदातील काही श्लोकांमध्ये राजकीय व्यवस्था संदर्भात उल्लेख सापडतात. अथर्व वेदामध्ये राजकीय व्यवस्थेशी संबंधित अनेक श्लोक आहेत. या श्लोकांमध्ये विशेषता राजपदा बाबत अनेक माहिती दिलेली आहे. वेदांमध्ये राजपदाचा सन्मान, राजाचे राज्यारोहण, राज्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि कार्य इत्यादीं संदर्भात विचार  विमर्श केलेला दिसून येतो. याशिवाय ब्राह्मणके वा आरण्यके, कल्पसूत्रे, स्मृति इत्यादी साहित्यात देखील प्रशासकीय व्यवस्था आणि राजकीय सिद्धांतान बद्दल व्यापक स्वरूपाची माहिती मिळते. रामायण, महाभारत आणि पुराणांमध्ये प्रशासन व्यवस्थेच्या नियमां बद्दल विस्तार पूर्वक प्रतिपादन केलेली दिसून येते.



भारतात प्राचीन काळापासून राजकारणाशी संबंधित विषयांची चर्चा फार प्राचीन काळापासून म्हणजे वैदिक काळाच्या पूर्वीपासून सुरू आहे.  राज्यशास्त्राला स्वतंत्र स्वरूप प्राप्त झालेले नव्हते. धार्मिक आणि सामाजिक साहित्याचा एक भाग म्हणून राजकीय विषयांची चर्चा केली जात असे. वेद, रामायण, महाभारत, बौद्ध ग्रंथ, जैन ग्रंथ, विविध स्मृतीकारांनी मांडलेली मते इत्यादी साहित्यात तत्कालीन काळातील राजकीय संस्था आणि विचारांची माहिती मिळते. उत्तर वैदिक काळानंतर राज्यशास्त्राच्या विकासाला जालना मिळू लागले. बृहस्पति, भारद्वाज, शुक्र, कौटिल्य इत्यादींसारखे राजकीय सिद्धांतकारांनी राजकीय संस्था आणि सिद्धांता बद्दल चिंतन मांडण्यास सुरू केले. परंतु या चिंतनाचा फारसा सविस्तर अभ्यास न झाल्यामुळे भारतात राजकीय सिद्धांतकारांचा फारसा शास्त्रीयपणे अभ्यास होऊ शकला नाही. औपनिवेशक काळात पाश्चिमात्य अभ्यासकांनी भारतीय राजकीय चिंतन अत्यंत प्रारंभिक स्वरूपाचे होते हा पूर्वग्रह विकसित केला होता. या पूर्वग्रहामुळे प्राचीन भारतीय राज्यशास्त्राच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत गेले. वास्तविक प्राचीन काळापासून भारतात अत्यंत प्रभावीपणे राजकीय चिंतन झालेले दिसून येते. तत्कालीन काळातील धर्मग्रंथांमध्ये राज्यशास्त्रासाठी विविध शब्दांचा वापर केला गेला. स्मृतिमध्ये राजधर्म, महाभारतात दंडनिती, कौटिल्याने अर्थशास्त्र, पंचतंत्रात नृपतंत्र, नीतिशास्त्र इत्यादी विविध शब्दांचा वापर केला गेलेला आहे.

प्राचीन भारतात राज्यशास्त्राशी संबंधित ग्रंथांमध्ये राजधर्म, राज्यशास्त्र, दंडनिती, नितीशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी शब्दांचा वापर केलेला दिसून येतो. काळानुरूप या संज्ञांची लोकप्रियता कमी किंवा जास्त होत गेली. मनुस्मृतीच्या सातवा अध्याय मध्ये राज्यशास्त्रासाठी राजधर्म हा शब्दप्रयोग केला गेलेला आहे. महाभारतातील शांती पर्वातील काही अध्याय मध्ये राजधर्माच्या संदर्भात अनेक ठिकाणी उल्लेख आलेला आहे. शांती पर्वातील 14 वा अध्यायात द्रौपदी युधिष्ठरांना सांगते की, 'राजाचा धर्म हा आहे की दुष्टांना दंड देणे आहे. त्यासाठी युद्ध देखील करण्यास हरकत नाही.' प्राचीन भारतात राज्यशास्त्र शब्दाचा प्रयोग महाभारतात आलेला दिसून येतो. राजधर्म आणि राज्यशास्त्र या दोन्हीही शब्दांचा प्रयोग राजपदाचा संदर्भात आलेला आहे. कारण तत्कालीन काळात राजतंत्र हा शासनाचा लोकप्रिय प्रकार होता. राजाची व्यक्तिमत्व, उत्तरदायित्व, अधिकार इत्यादींची चर्चा प्राचीन राज्यशास्त्रात केलेली दिसून येते. राज्यशास्त्र या शब्दाऐवजी राजधर्म हा शब्द अनेक ठिकाणी वापरलेला आहे. कारण प्राचीन भारतातील अभ्यासकांनी राज्यशास्त्राचा जास्तीत जास्त संबंध राजाच्या जीवन व्यवहाराशी निगडित घटनांच्या बाबतीत वापरलेला आहे. प्राचीन भारतात दंडनीती या शब्दाचा वापर देखील अनेक ठिकाणी केलेला आहे. भारतीय राजकीय विचारक सार्वभौम राज्याचा दंडनीती हा प्रमुख आधार सुरुवातीपासून मानत आले होते. अराजकता आणि अव्यवस्था नष्ट करण्यासाठी आणि अपराध्यांना दंडाचे भय दाखवून राज्याने निश्चित केलेल्या हे राज्याचे प्रमुख कर्तव्य मानले गेले आहे. महाभारताच्या कथनानुसार, 'व्यक्तींना दंडाचे भय नसेल तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला नष्ट करेल.' प्राचीन भारतीय राज्यशास्त्राशी संबंधित ग्रंथांमध्ये दंडनीतीचे महत्त्व लक्षात आलेले आहे. त्यामुळे राज्याचे संघटन आणि त्याच्या कार्याशी संबंधित शास्त्राला दंडनीती असे म्हटलेले आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्र ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी दंडनीती शब्दाचा उपयोग केलेला आहे. प्रजापतीद्वारा शासन तंत्रावर लिखित ग्रंथात दंडनीती शब्दाचा वापर केलेला आहे. राज्यशास्त्र विषयासंदर्भात अर्थशास्त्र हा शब्द देखील वापरलेला दिसून येतो. डॉ. काशीप्रसाद जयस्वाल यांनी 'अर्थशास्त्र म्हणजे जनपद संबंधित शास्त्र असा अर्थ सांगितलेला आहे.' वर्तमान काळात अर्थशास्त्र शब्दाचा प्रयोग संपत्तीशास्त्र याच्यासाठी केला जातो. कौटिल्याच्या मते, 'अर्थ या शब्दाचा प्रयोग केवळ व्यक्तीचे व्यवसाय किंवा धंदे निर्देशित करण्यासाठी केला जात नाही तर भूमीसाठी देखील केला जातो.' मानवी जीवनाच्या संचालनाचा आधार भूमी आहे. त्यामुळे कौटिल्याचा अर्थशास्त्र ग्रंथ मानवाला भूमीप्राप्ती आणि त्याच्या रक्षणासंदर्भात उपयासंदर्भात दिशादर्शन करण्याचं काम करत असतो. कौटिल्य यांनी दंडनिती या शब्दाची देखील व्याख्या केलेली आहे. दंडनीती म्हणजे अपराय अप्राप्य करना, प्राप्तीची रक्षा करणे, रक्षितचे अभिवर्धन करणे आणि अभिवर्घितचे उपयुक्त व्यक्तींमध्ये वितरण करणे. मनू यांनी देखील आपले कार्य राजा दंड आणि नीतीच्या माध्यमातून संपन्न करत असतो. मनू आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्र ग्रंथाने दंडनीती शब्दाचा प्रयोग भूमी आणि प्रदेशाशी संबंधित गोष्टींसाठी केलेला दिसून येतो. अमरकोशात अर्थशास्त्राने दंडनिती हे शब्द समानार्थी वापरलेले आहेत. हिंदू राज्यशास्त्राशी संबंधित ग्रंथांमध्ये नीतिशास्त्र हा शब्दप्रयोग देखील वापरलेला आहे. जे शास्त्र उचित अनुचित यात भेद करण्याबद्दल मार्गदर्शन करते. राजकीय क्षेत्रासंदर्भातल्या मार्गदर्शनाला देखील नीतीशास्त्र असे म्हटलेले आहे. शुक्र आणि कामदंक राज्य आणि शासनासंदर्भातील रचनेला नीतिशास्त्र असे नाव दिलेले आहे.कामदंक यांनी नीतीसार ग्रंथात राजकार्यशी संबंधित महत्वपूर्ण गोष्टींना संक्षिप्त रूप प्रदान केलेले आहे. प्राचीन भारतात राज्यशास्त्र विषयाला नीतिशास्त्र यासाठी म्हटले गेलेले आहे की दोघांच्या लक्ष्यांमध्ये भिन्नता दिसून येत नाही. दोन्ही शास्त्र समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्नरत दिसून येतात. तत्कालीन काळात नीतिशास्त्र या शब्दाचे प्रचलन खूप जास्त असल्यामुळे राज्यशास्त्राची संबंधित ग्रंथांना नीती हे नाव दिलेले दिसून येते. उदा. लक्ष्मीधर-नीती कल्पतरू परंतु राज्यशास्त्रासाठी नीतिशास्त्र हा शब्दाचा वापर योग्य नव्हता. नीतीशास्त्रात राज्याच्या नीतीसोबत सामान्य आचरणाबद्दल देखील उल्लेख आलेला आहे. त्यामुळे नितीशास्त्राचा राजनीति हा फक्त एक भाग आहे. त्यामुळे डॉ. भांडारकर यांच्या मते, नीतिशास्त्र शब्दाचा प्रयोग सामान्य आचरणाच्या नियमांसाठी वापरणे योग्य आहे. राज्याच्या व्यवहाराच्या नियमांसाठी राज्यशास्त्र या शब्दाचा प्रयोग करणे उचित ठरते. परंतु भारतात या शब्दाचा प्रयोग फारच कमी ठिकाणी केला गेलेला दिसून येतो. राज्यशास्त्र शब्द ऐवजी इतर शब्दांचा वापर केलेला दिसून येतो.

प्राचीन भारतीय अभ्यासकांनी धर्म, दार्शनिक चिंतन आणि अध्यात्म वादाच्या विकासावर विशेष भर दिलेला असला तरी ऐहिक  उन्नतीकडे दुर्लक्ष केलेले नाही. मानवाच्या वैयक्तिक आणि सामूहिक उन्नतीसाठी विविध विद्यांचा विकास केलेला दिसून येतो. शुक्राचार्याने 32 विद्या सांगितलेले आहेत. वायुपुराण आणि जातक ग्रंथात देखील 18 विद्यांचा उल्लेख आलेला आहे. प्राचीन साहित्यात आलेल्या विविध विद्यांच्या उल्लेखावरून हे सांगता येते की प्राचीन भारतात अध्यात्मिक ज्ञानासोबत ऐहिक ज्ञानाने देखील महत्त्व दिलेले आहे. त्याच्या विकासासाठी प्रयत्न केलेले आहेत. प्राचीन भारतीय साहित्यात राज्यशास्त्र ऐवजी राजनीति राजधर्म अर्थशास्त्र, दंडनीती इत्यादी शब्दांचा वापर केलेला आहे. सध्या काळात राज्यशास्त्राशी संबंधित फारच कमी ग्रंथ उपलब्ध आहेत. कौटिल्याने अर्थशास्त्राची रचना करताना स्पष्ट मत व्यक्त केलेले आहे की, अर्थशास्त्राच्या आधी आचार्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा संग्रह करून अर्थशास्त्राची रचना केलेली आहे. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात काही आचार्यांच्या मतांचा नावासह अर्थशास्त्राचे लेखन करताना उपयोग केलेला आहे. याशिवाय कौटिल्याने अर्थशास्त्राच्या पाच संप्रदायाचा देखील उल्लेख केलेला आहे याचा अर्थ प्राचीन भारतात ग्रीक प्रमाणे विचार संप्रदायाची परंपरा होती हे लक्षात येते. बौद्ध साहित्यात देखील 62 दार्शनीक संप्रदायाचा उल्लेख आलेला आहे. अर्थात या विविध संप्रदायाच्या विचार पद्धती संदर्भात जाणून घेण्यासाठी आवश्यक साधने आता आपल्याकडे उपलब्ध नाहीत. महाभारतातील शांती पर्वात देखील पूर्ववर्ती राजकीय अभ्यासकांची नाव आलेली आहेत. मध्य काळात देखील सोमदेव सुरी आणि इतर राज्यशास्त्र संदर्भात लेखन करणाऱ्या अभ्यासकांची माहिती प्राप्त झालेली आहे. याचा अर्थ प्राचीन भारतात राज्यशास्त्र विषयक विचार मांडणारे अनेक ग्रंथ आणि विद्वान अस्तित्वात होते. त्यांनी केलेल्या विचार मांडणीतून भारतात राज्यशास्त्राचा विकास झालेला होता. परंतु दुर्दैवाने आज हे सर्व प्राचीन ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे विचार सविस्तर पद्धतीने समाजापुढे आणताना अडचणी निर्माण होताना दिसतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

प्राचीन भारतीय राजकीय विचारांचे स्रोत

  प्राचीन भारतीय राजकीय विचारांचे स्रोत -भारतात प्राचीन काळापासून राज्यशास्त्र बद्दल विचार मांडले जात आहेत. भारताच्या राजकीय चिंतनाचे अनेक स...