भारतीय नागरिकत्व कायद्यातील तरतूदी
भारतीय नागरिकत्व कायदा १९५५-
भारतीय राज्यघटनेच्या पाच ते अकरा कलमांमध्ये नागरिकत्वा विषयी तरतुदी केलेल्या आहेत. या तरतुदीं मध्ये अधिक स्पष्टता येण्यासाठी भारत सरकारने भारत नागरिकत्व कायदा १९५५ मध्ये संमत केला. या कायद्यात काळानुरूप बदल करण्यासाठी १९८६ ,१९९२,२००३,२००५, २०१५ आणि २०१९ मध्ये अशा सहा वेळा दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. नागरिकत्व कायद्यानुसार भारतीय व्यक्तींना पुढील आधारावर नागरिकत्व बहाल केले जाते.
जन्म तत्वाद्वारे नागरिकत्व प्राप्ती --
1. २६ जानेवारी १९५० ते १ जुलै १९८७ पूर्वी भारतात जन्माला आलेली व्यक्ती भारतीय नागरिक असेल.
2. १ जुलै १९८७ नंतर भारतात जन्मास आलेली व्यक्ती भारतीय नागरिक असेल परंतु पालकांपैकी एक भारतीय असणे गरजेचे असेल.
3. ३ डिसेंबर २००३ नंतर भारतात जन्माला आलेला व्यक्ती भारतीय नागरिक असेल परंतु पालकांपैकी दोन्ही किंवा एक भारतीय असणे आवश्यक आहे. दुसरा पालक बेकायदेशीर स्थलांतरित असता कामा नये.
वंश तत्वाद्वारे नागरिकत्व प्राप्ती -
भारताबाहेर राहणारी भारतीय वंशाची व्यक्ती भारतीय नागरिक बनू शकते.
1. २६ जानेवारी १९५० ते १० डिसेंबर १९९२ या कालावधीत जन्माला आलेली भारतीय वंशाची व्यक्ती वडील भारतीय असेल तर
2. १० डिसेंबर १९९२ ते ३ डिसेंबर २००४ भारतीय वंशाची व्यक्ती आई वडील पैकी एक भारतीय असेल तर
3. ३ डिसेंबर २००४ नंतर एखाद्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचा भारताबाहेर जन्म झालेला असेल; आई-वडिलांपैकी एक भारतीय असेल तर जन्मानंतर एक वर्षाच्या आत भारतीय दुतावासाकडे नोंदणी केल्यास नागरिकत्व प्राप्त होऊ शकते.
नोंदणी द्वारे नागरिकत्व प्राप्ती-- बेकायदेशीर स्थलांतरित सोडून कोणतीही व्यक्ती भारत सरकारकडे नागरिकत्वासाठी अर्ज करू शकते.
1. अर्ज करण्यापूर्वी किमान सात वर्षे भारतात वास्तव्य असणे गरजेचे आहे.
2. भारतीय व्यक्तीशी विवाह झालेली व्यक्ती अर्जापूर्वी किमान सात वर्षे वास्तव्य असेल तर
3. राष्ट्रकुल सदस्य देशाचे नागरिक भारतात राहणारे असतील किंवा भारत सरकारची नोकरी करणारे नागरिक असतील तर अर्ज करून भारतीय नागरिकत्व मिळू शकतात.
4. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ आणि इराण इत्यादी देशांच्या नागरिक नसलेला जन्माने भारतीय वंशाचा असलेल्या कोणताही देशाच्या PIO कार्ड धारक व्यक्ती भारतीय नागरिक मानला जाईल. परंतु २०१५ पासून हे कार्ड बंद करण्यात आले.
5. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय नागरिक बनण्यास पात्र असलेला OCI कार्ड धारक व्यक्ती भारतीय नागरिक मानला जाईल.
6. राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१९ नुसार पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश या देशातून स्थलांतरित झालेले हिंदू, जैन, बौद्ध, पारशी इत्यादी धर्मियांना सहा वर्षे वास्तव्य केल्यानंतर भारतीय नागरिकत्व प्राप्त करता येईल,( पूर्वी बारा वर्षे वास्तव्याची अट होती)
नैसर्गिकरणाद्वारे नागरिकत्व प्राप्ती-
1. नागरिकत्व कायदा तिसऱ्या अनुसूचीतील सर्व अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्ती भारतीय नागरिकत्व मिळू शकतात.
2. एखादा भूभाग भारतात समाविष्ट झाल्यास तेथील लोकांना भारत सरकार भारतीय नागरिकत्व बहाल करेल उदाहरणार्थ गोवा पांडेचेरी सिक्कीम भारतात विलीन झाल्यानंतर तेथील लोकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले.
नागरिकत्व समाप्ती-
1. एखाद्या व्यक्तीने स्वतःहून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर भारतीय नागरिकत्व समाप्त होईल.
2. एखाद्या व्यक्तीने भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला तर त्याचे नागरिकत्व समाप्त होईल.
3. भारत सरकार पुढील कारणावरून नागरिकत्व रद्द करू शकते.
* सतत सात वर्षे भारताबाहेर वास्तव्य
* बेकायदेशीर रित्या भारतीय नागरिकत्वाची प्राप्ती केली असेल तर
* देश विरोधी कारवायात भाग घेतला असेल तर
* घटना भंग केला असेल तर