भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क
भारतीय घटनेच्या तिस-या विभागात १२ ते ३५ कलमांमध्ये
सुरूवातीला सात मूलभूत हक्काचा समावेश होता. ४४ व्या घटनादुरुस्तीने मालमत्तेचा
अधिकार हक्कांच्या यादीतून वगळलेला आहे. त्यामुळे घटनेत सद्या सहा मूलभूत हक्क
आहेत. घटनाकारांनी कॅनडा, फ्रॉन्स व अमेरिकेच्या
घटनांचा विचार करून आपल्या देशाच्या घटनेत हक्कांचा समावेश केलेला आहे
१. समतेचा हक्क - घटनेच्या १४ ते १८ कलमांत समतेच्या हक्कांचा
समावेश आहे. त्यात पुढील तरतूदीचा समावेश आहे.
अ) कायदयासमोर समानता- घटनेने प्रत्येक व्यक्तीला कायदयासमोर समान
मानलेले आहे. कायदयाचे समान संरक्षण दिलेले आहे. कायदयासमोर समानता म्हणजे व्यक्ती
कोणत्याही दर्जाची असो वा हुद्दांची असो कायदयापेक्षा श्रेष्ठ नाही.सर्व कायदे व
न्यायालयाचे आदेश सर्वांना समान लागू होतील. राष्ट्रपती असो की झाडू कामगार समान
गुन्हासाठी समान शिक्षा दिली जाईल.
ब) भेदभावाचा अभाव- घटनेनुसार धर्म, जात, वंश, लिंग व पंथ इ. आधारावर
कोणताही भेदभाव केला जाणार नाही. रस्ते, सार्वजनिक उपहारगृह व
तलाव इ. सार्वजनिक ठिकाणे सर्वांसाठी खुली राहतील. मात्र १६ व्या कलमानुसार लहान
बालके, स्त्रिया व मागासलेल्या जाती व जमातीसाठी सरकार विशेष तरतूदी करेल, त्या समतेच्या विरोधी
मानल्या जाणार नाहीत.
क) अस्पृश्यता निवारण- भारतात प्राचीन काळापासून अस्पृश्यता
पाळली जात होती. ही अत्यंत अमानुष रूढी घटनेच्या १७ व्या कलमानुसार घटनाबाहय
ठरविण्यात आली. अस्पृश्यता पाळणे फौजदारी गुन्हा आहे. अस्पृश्यतेच्या नावाखाली
कुणालाही अपात्र ठरविता येणार नाही.
ड) पदव्यांचे समाप्तीकरण- ब्रिटिशकाळात रावसाहेब, रावबहादूर, रावदिवाण इ.
स्वरूपाच्या भेदभाव निर्माण करणाऱ्या पदव्या दिल्या जात असत. घटनेच्या १८ व्या
कलमानुसार या पदव्या रद्द करण्यात आल्या. मात्र विविध क्षेत्रात विशेष काम
करणाऱ्या व्यक्तीचे कौतुक करण्यासाठी सरकार पदव्या देऊ शकते उदा. भारतरत्न पदवी
मात्र या पदव्या नसून पदके आहेत. तसेच राष्ट्रपतीच्या परवानगीशिवाय भारताच्या
नागरिकाला परदेशातील पदवी स्वीकारता येणार नाही.
२. स्वातंत्र्याचा हक्क- घटनेच्या १९ ते २२ कलमात स्वातंत्र्याचा
हक्काचा समावेश आहे. १९ व्या कलमात सप्त स्वातंत्र्याचा समावेश आहे.
अ) भाषण
व मतप्रदर्शन स्वातंत्र्य - भाषण व लेखनाद्वारे व्यक्ती
आपले विचार इतरांसमोर ठेऊ शकते. म्हणून घटनेने हे स्वातंत्र्य नागरिकांना दिलेले
आहे. मात्र या हक्कावर काही मर्यादा टाकलेल्या आहेत उदा. कायदा सुव्यवस्था नष्ट
होईल वा एखादया व्यक्तीचे चारित्र्यहनन होईल असे भाषण व लेखन करता येणार नाही. आणि
केल्यास सरकार भाषणावर बंदी लादू शकते.
ब) निशस्त्रपणे
सभा भरविणे - घटनेने शांततापूर्वक सभा भरविण्याचा अधिकार
नागरिकांना दिलेला आहे. कारण सभा भरविल्याशिवाय आपले विचार लोकांसमोर मांडता येणार
नाहीत. मात्र हा अधिकार अमर्याद स्वरूपात नाही.
सार्वजनिक शांततेला बाधा पोहचत असेल तर सरकार या अधिकारावर बंदी लादू शकते.
क) संघटन स्वातंत्र्य- घटनेने व्यक्तिमत्त्व विकासासाठी संस्था व
संघटना स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे. या अधिकाराचा वापर करून सांस्कृतिक व
राजकीय संघटना स्थापन करता येतात. मात्र हा अधिकार अमर्याद नाही. देशाच्या
एकात्मताला बाधा पोचवणाऱ्या संघटनेवर सरकार बंदी लादू शकते उदा. महाराष्ट्र
सरकारने सिमी संघटनेवर बंदी लादली आहे.
ड) संचार स्वातंत्र्य- घटनेनुसार भारतीय नागरिकाला भारतात कुठेही
संचार करता येईल त्यासाठी परवानगीची गरज राहणार नाही. मात्र सरकारने सुरक्षित
घोषित केलेल्या क्षेत्रात सरकारच्या परवानगीशिवाय प्रवेश करता येणार नाही.
इ) वास्तव्य स्वातंत्र्य- भारताच्या नागरिकाला भारताच्या कोणत्याही
भागात जाऊन वास्तव्य करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे. पण वास्तव्यामुळे
सार्वजनिक हिताला धोका वा बाधा येत असेल तर सरकार बंदी लादू शकते.
ई) व्यवसाय स्वातंत्र्य - भारतात पूर्वी जातीच्या आधारावर व्यवसाय
केला जात असे एका जातीचा व्यवसाय दुसऱ्या जातीला करता येत नसे. सद्या घटनेनुसार
भारतीयांना कोणत्याही व्यवसाय करता येईल. मात्र काही व्यवसाय करण्यासाठी सरकार
पात्रता लादू शकते.
ग) व्यक्ती स्वातंत्र्याची हमी- घटनेच्या २० ते २२ कलमात व्यक्ती
स्वातंत्र्य रक्षणासाठी पुढील तरतूदी केलेल्या आहेत. २० व्या कलमानुसार प्रचलित
कायदयानुसार गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीला गुन्हेगार मानले
जाणार नाही. एका गुन्हासाठी एकदाच शिक्षा दिली जाईल. २१ व्या कलमानुसार व्यक्तीचे
जीवित व स्वातंत्र्य कायदयाने घालून दिलेल्या पद्धतीशिवाय हिरावून घेता येणार
नाही. २२ व्या कलमानुसार अटक केलेल्या व्यक्तीला २४ तासाच्या आत न्यायाधीशासमोर
हजर केले जाईल. मात्र परकिय नागरिक व प्रतिबंधक स्थानबध्दता कायदयाखाली अटक
केलेल्या व्यक्तीला ही सवलत मिळणार नाही.
३.
शोषणाविरूध्द वा पिळवणूकीविरूध्दचा हक्क- भारतात फारपूर्वी पासून वेठबिगारी, देवदासी,
सतीप्रथा व गुलामाची खरेदी विक्री इ. रूढी अस्तित्वात होत्या. या
रूढीच्या माध्यमातून पदलित वर्गाची आणि महिलांची पिळवणूक सुरू होतो. म्हणून
घटनेच्या २३ व्या कलमानुसार या सर्व रूढी घटनाबाहय मानण्यात आल्या. सक्तीचा वेश्या
व्यवसाय तसेच १४ वर्षाच्या आतील लहान मुलाकडून शारीरिक काम करून घेण्यास बंदी
लादण्यात आली. २४ व्या कलमानुसार सरकार सार्वजनिक हितासाठी नागरिकांकडून एखादे काम
करून घेऊ शकते. उदा युद्धकाळात सक्तीने लष्कर भरती मात्र सक्ती करतांना जात,
धर्म, लिंग इ. आधारावर भेदभाव करता येणार
नाही.
४.
धार्मिक स्वातंत्र्य- घटनेच्या २५ ते २८ कलमात धार्मिक स्वातंत्र्याचा
समावेश आहे. हिंदुस्थानचो फाळणी धर्म घटकावर झालेली असल्याने
घटनाकारांनी धर्म ही वैयक्तिक बाब मानली. प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार
धर्म बदलण्याचा, पुजा व
अर्चा करण्याचा अधिकार दिलेला आहे. धार्मिक कार्यासाठी नागरिक धार्मिक संस्था वा
मंडळ निर्माण करू शकतात धार्मिक कार्यासाठी देणगी गोळा करता येते.
मात्र देणगी गोळा करतांना सक्ती करता येत नाही.
सरकारी मदतीवर चालणाऱ्या शिक्षणसंस्थेत धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही वा विशिष्ट
शिक्षण घेण्याची सक्ती केली जाणार नाही. या तरतूदीचा विचार करता भारत धर्मनिरपेक्ष
देश आहे. कारण भारताचा अधिकृत असा कोणताही धर्म नाही. सर्व धर्माना समान स्थान
आहे.
५.
सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क- घटनेच्या २९ व्या कलमानुसार प्रत्येक
नागरिकाला आपली भाषा,
लिपी व संस्कृती जतन करण्याचा अधिकार आहे. तसेच सरकारी मदतीवर
चालणाऱ्या संस्थेत धर्म, जात, लिंग इ.
आधारावर भेदभाव केला जाणार नाही या प्रवेश नाकारता येणार नाही. ३० व्या कलमानुसार
भाषिक व धार्मिक अल्पसंख्याक आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी
शिक्षण संस्था स्थापन करू शकतात. या संस्थाना मदत करताना सरकार कोणताही भेदभाव
करणार नाही. या हक्काच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाला संरक्षण देण्याचा
प्रयत्न घटनेने केलेला दिसतो.
६.
घटनात्मक उपायोजनेचा हक्क- घटनेच्या ३२ व्या कलमानुसार मूलभूत हक्काना
न्यायालयाचे संरक्षण दिलेले आहे. हक्कांवर कुणी ही
अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालयात दाद मागता येते. हक्क रक्षणासाठी
उच्च व सर्वोच्च न्यायालयात पाच प्रकारचे अर्ज दाखल करता येतात.
अ) बंदीप्रत्यक्षीकरण- एखादया व्यक्तीला बेकायदेशीररीत्या अटक केलेली असेल तर त्या व्यक्तीला
वा तिच्या मित्र व नातेवाईकाना हा अर्ज करता येतो. अर्ज मान्य झाल्यास अटक
केलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर हजर केले जाते. अटक करणाऱ्याला अटकेची कारणे
द्यावी लागतात. ती कारणे अयोग्य वाटल्यास न्यायालय संबंधित व्यक्तीची सुटका करू
शकते याचा अर्थ सरकार कुणालाही कारणाशिवाय अटक करू शकत नाही.
ब) परमादेश- एखादया व्यक्तीवर अन्याय झाल्यास अन्याय दूर करण्यासाठी परमादेश अर्जाचा
उपयोग करता येतो. उदा. एखादया कारखान्यात अपघात झाल्यास कंपनी कायदयानुसार मालक
नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत असेल तर या अर्जाचा वापर करता येतो. न्यायालयाने
अर्ज मान्य केल्यास संबंधित व्यक्तीवरील अन्याय दूर करण्याचा आदेश न्यायालय देत
असते.
क) अधिकारपृच्छा - कोणतेही सरकारी वा सार्वजनिक पद पात्रता नसतांना एखादी व्यक्ती भूषवित
असेल आणि ते पद कायमस्वरूपी असेल. त्या पदाशी आपले हितसंबंध गुंतलेले असतील तर
न्यायालयात हा अर्ज करता येतो. न्यायालयाने अर्ज मान्य केल्यास अपात्र व्यक्तीस पद
सोडण्याचा आदेश न्यायालय देते.
ड) प्रतिषेध - एखादा खटला कनिष्ठ न्यायालयात सुरू असेल तो खटला चालविण्याचा कनिष्ठ
न्यायालयास अधिकार नसेल वा त्या न्यायालयाकडून
निर्णय घेणे योग्य वाटत नसेल तर हा अर्ज करता येतो. वरिष्ठ न्यायालयाने अर्ज मान्य
केल्यास कनिष्ठ न्यायालयाताल खटल्याचे कामकाज ताबडतोब थांबविले जावे असा आदेश
वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयास देते.
इ) उत्पेक्षण- कनिष्ठ न्यायालयात चालत असलेला खटला वरिष्ठ न्यायालयात चालवावा अशी विनंती करणाऱ्या अर्जास उत्पेक्षण असे म्हणतात. हा अर्ज मान्य झाल्यास वरिष्ठ न्यायालय खटल्याशी संबंधित सर्व कागदपत्रे आपल्या ताब्यात घेऊन स्वतः निर्णय देते त्यास उत्पेक्षण म्हणतात.
मूलभूत हक्कांचे मूल्यमापन वा परीक्षण - भारतीय राज्यघटनेत समाविष्ट मूलभूत हक्कांवर अनेक विचारवंतानी पुढील टीका केलेल्या दिसतात.
१.
खऱ्या मूलभूत हक्कांचा समावेश नाही - हक्कांच्या यादीत शिक्षणाचा हक्क, रोजगाराचा
हक्क इ. सारख्या महत्वपूर्ण हक्कांचा समावेश केलेला नाही. वास्तविक रोजगाराच्या
हक्काबद्दल अनेकदा चर्चा होऊनही हा हक्क घटनेत समाविष्ट केलेला नाही त्यामुळे
हक्कांची यादी अपुरी वाटते.
२.
हक्कांवर मर्यादा अधिक - घटनाकारानी हक्कांवर प्रचंड मर्यादा टाकलेल्या
आहेत. त्यामुळे या प्रकरणाला मूलभूत हक्क ऐवजी हक्कांवरील
मर्यादा हे नांव द्यावे ही टीका केली जाते. उदा. भाषण स्वातंत्र्यावर राज्याची
कायदा व सुव्यवस्था,
व्यक्तीचे चारित्र्यहनन, अंर्तगत सुरक्षा व
परराष्ट्र संबंधाला धोका इ. कारणावरून मर्यादा लादता येतात. या प्रचंड
मर्यादांमुळे हक्कांचा पूर्ण उपभोग नागरिकांना घेता येणार नाही.
३.
आणाबाणीच्या काळात हक्क स्थगित - आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित
केले जातात. कारण आणीबाणीच्या काळात हक्क संरक्षणासाठी न्यायालयात जाता येत नाही
याचा अर्थ आणीबाणीच्या काळात सरकारची दडपशाही जनतेला निमूटपणे सहन
करावी लागते.
४.
संदिग्ध वाक्यरचना- मूलभूत हक्कांच्या यादीत अनेक शब्दप्रयोग संदिग्ध
स्वरूपाचे आहेत. सरकार या शब्दाचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावू शकते. उदा.
सार्वजनिक कल्याण,
राष्ट्रहित इ. च्या नावावर सरकारने घटनादुरूस्त्या करून हक्क कमी
केलेले आहेत.
५.
मार्गदर्शक तत्वे श्रेष्ठ- सुरूवातीला मूलभूत हक्क श्रेष्ठ आणि मार्गदर्शक
तत्वे दुय्यम मानली जात असत पण नंतरच्या काळात सरकारने घटनादुरूस्त्या करून
हक्कांपेक्षा मार्गदर्शक तत्वांना श्रेष्ठ स्थान दिल्यामुळे हक्काचे महत्व कमी झाले.
अशा
प्रकारच्या वरील मर्यादा मूलभूत हक्कांत दिसून येतात.