रविवार, २३ मार्च, २०२५

भारतीय राज्यघटनेतील सरनामा किंवा उद्देशपत्रिकेचे विश्लेषण करून त्यातील तत्वज्ञान वा मूल्ये

 

भारतीय राज्यघटनेतील सरनामा किंवा उद्देशपत्रिकेचे विश्लेषण करून त्यातील तत्वज्ञान वा मूल्ये 

प्रत्येक देशाची राज्यघटना विशिष्ट उद्देश लक्षात घेऊन लिहिली जाते. त्या उद्देशाचा समावेश उद्देशपत्रिकेत केलेला असतो. सरनामा घटनेचा आत्मा मानला जातो. भारतीय घटनेचा सरनामा पंडित नेहरूंनी लिहिलेला आहे.

घटनेचा सरनामा वा उद्देशपत्रिका-आम्ही भारतीय लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य, निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना,

न्याय-आर्थिक, सामाजिक, राजकीय न्याय

स्वातंत्र्य-विचार, उच्चार, धर्म, श्रद्धा आणि उपासना

समता-समान संधी आणि दर्जाबाबत

बंधुता व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता व अंखडता राखण्याची शाश्वती देऊन, २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी घटना मान्य व स्वीकृत करत आहोत.

सरनाम्याचे विश्लेषण, तत्वज्ञान वा मूल्ये किंवा आधारभूत तत्वे-

१. घटनेचे उगमस्थान भारताय जनता- उद्देशपत्रिकेत आम्ही भारतीय जनता घटना तयार करून मान्य करीत आहोत असा उल्लेख आहे याचा अर्थ घटना भारतीय जनतेने तयार करून स्वईच्छेने स्वीकारलेली आहे, असा अर्थ निघतो वास्तविक घटनासमिती प्रत्यक्ष जनतेद्वारा निवडली नव्हती. सदस्य अप्रत्यक्ष मार्गाने निवडले होते. परंतु घटना समितीच्या निवडणुक घेतल्या असत्या तर वेळ व पैशांची हानी झाली असती तसेच भारतातील कोणत्याही राजकिय पक्षाने वा जनतेने घटना अमान्य करावी ही मागणी केलेली नाही याचा अर्थ सर्व भारतीयांना घटना मान्य आहे.

२. सार्वभौम- १५ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. १५ ऑगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० पर्यंत भारताचे स्वरूप वसाहतीच्या राज्याचे होते. कारण तोपर्यंत इंग्लंडची राणी भारताची कायदेशीर प्रमुख होती. २६ जानेवारी १९५० रोजी घटना लागू झाल्यानंतर भारत सार्वभौम देश बनला. भारतावर कोणत्याही देशाचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नियत्रण नाही. अंर्तगत बर्हिगत दृष्टया भारत पूर्ण स्वतंत्र आहे. भारत राष्ट्रकुल संघटनेचा सदस्य असला तरी ते सदस्यत्व सार्वभौमच्या आड नाही. मित्रत्वाचे संबंध टिकवून ठेवण्यासाठी भारत राष्ट्रकुल संघटनेचा सदस्य झाला आहे.

३. प्रजासत्ताक- प्रजासत्ताक म्हणजे शासन व्यवस्थेत जनतेचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग होय. भारताचा राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीमार्फत चालतो. प्रतिनिधी ठराविक काळासाठी निवडून दिलेले असतात. जनता आपल्या इच्छा प्रतिनिधीमार्फत व्यक्त करतात. प्रौढमताधिकाराच्या तत्वानुसार प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला असतो.

४. गणराज्य- गणराज्य म्हणजे राजा नसलेले राज्य होय किंवा ज्या देशाचा सर्वोच्च प्रमुख जनतेने प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या विशिष्टकाळासाठी निवडून दिलेला असतो. त्या देशाला गणराज्य असे म्हणतात. उदा- भारताचा सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती जनतेकडून अप्रत्यक्षरित्या पाच वर्षासाठी निवडून दिलेला असतो.म्हणून भारत गणराज्य आहे. या उलट इंग्लंड मध्ये गणराज्य नाही. कारण इंग्लंडचा राजा वंशपरापरागत पद्धतीने सत्तेवर येतो.

५. स्वातंत्र्य - भारतातील नागरिकांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म व उपासना इ.बाबतचा स्वातंत्राचा उल्लेख सरनाम्यात केलेला आहे. स्वातंत्र व्यक्तीविकासासाठी आवश्यक असल्याने या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी योग्य परिस्थिती भारत सरकारने निर्माण करावी ही घटनाकारांची अपेक्षा होती.

. समता- समता म्हणजे सारखेपणा नव्हे तर मानवनिर्मित विषमता नष्ट करून सर्वांना विकासाची समान संधी आणि दर्जा उपलब्ध करून देणे होय. धर्म, जात, वंश, लिंग व वर्ण इ. आधारावर कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान संधीदर्जा उपलब्ध करून देणे हा घटनाकारांचा मुख्य उद्देश होता.

७. न्याय- घटनेच्या सरनाम्यात सामाजिक, आर्थिक व राजकिय क्षेत्रात न्याय उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य  राहिल. न्याय हा राजकिय व्यवस्थेचा आत्मा असतो. समाजात न्याय प्रस्थापित केल्याशिवाय व्यक्तीची उन्नती होणार नाही. घटनेने सामाजिक न्याय प्रस्तापित करण्यावर भर दिला आहे. अस्पृश्यता निवारण, मागास जातीना सवलती इ. गोष्टी सामाजिक व आर्थिक न्यायासाठी आहेत. राजकिय न्यायासाठी सर्वांना प्रौढमताधिकाराचा अधिकार दिलेला आहे.

८. बंधुता - भारतात पूर्वीपासून जातीवाद, प्रांतवाद इ.समस्या आहेत.या समस्यामुळे राष्ट्रांच्या ऐक्य निर्मितीला बाधा  येतो. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मता कायम ठेवण्यासाठी वरील भेदाभेद नष्ट करून बंधुभाव निर्माण करणे आवश्यक आहे. म्हणून घटनाकारानी स्त्री व पुरूषांना समान अधिकार देऊन समतेच्या आधारावर बंधुत्वाची उभारणी करण्याचा प्रयत्न केला.

९. समाजवाद- या शब्दाचा समावेश ४२ व्या घटनादुरूस्तीने सरनाम्यात केला. समाजवादाला खाजगी मालमत्ता आणि  भांडवलशाही मान्य नाही. देशातील श्रमिकाचे शोषण थांबविण्यासाठी श्रीमंत व गरिबातील दरी कमी करण्यासाठी भारताने समाजवादाचा स्वीकार केलेला आहे. समाजवाद म्हणजे उत्पादन साधनावर आणि वितरण व्यवस्थेवर समाज वा राज्याची मालकी  वा नियंत्रण होय.

१०. धर्मनिरपेक्षता- सरनाम्यात हा शब्द ४२ व्या घटनादुरूस्तीने समाविष्ट करण्यात आला. धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्याचा अधिकृत असा कोणताही धर्म राहणार नाही. कोणत्याही विशिष्ट धर्माला राज्य पाठिंबा देणार नाही. सर्व धर्माना समान मानले जाईल. धर्म ही वैयक्तिक बाब असून प्रत्येकाला आपल्या इच्छेप्रमाणे कोणत्याही धर्माची पूजा, अर्चा करता येईल. धर्म बदलता येईल. याचा अर्थ कोणत्याही धर्माला भारताने राजाश्रय दिलेला नाही.

११. राष्ट्रीय एकात्मता व अखंडता- या शब्दाचा समावेश ४२ व्या घटनादुरूस्तीने केलेला आहे. लोकशाहीत प्रत्येकाला प्रतिष्ठा दिली जाते. त्यामुळे व्यक्तीत स्वाभिमानाची भावना तयार होते ही भावना राष्ट्रीय एकात्मतेसाठी उपयुक्त मानली जाते. व्यक्तीचे देशावर प्रेम असल्यास व्यक्ती कोणताही त्याग करायला तयार असते. देशाच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय एकात्मतेचा सरनाम्यात करण्यात आला. त्यासाठी कोणत्याही घटकराज्याला संघराज्यातून बाहेर पडता येत नाही. त्यामुळे केंद्राला जास्त अधिकार दिले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ रचना, कार्य, अधिकार आणि स्थान

  पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ रचना, कार्य, अधिकार आणि स्थान भारताने संसदिय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे राष्ट्रपती हा नामध...