रविवार, २३ मार्च, २०२५

ब्रिटिश राजवटीचा वारसा आणि राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे

 ब्रिटिश राजवटीचा वारसा  आणि राष्ट्रवादाच्या  उदयाची कारणे 

भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनावर ब्रिटिश राजवटीचा फार मोठा प्रभाव दिसून येतो. त्यांनी भारताचे आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी व्यापक प्रयत्न केले. ब्रिटिश राजवटीमुळे भारताचा पाश्चिमात्य जगाशी परिचय झाला. भारतीय लोकांना अनेक नवे विचार आणि कल्पनांचा परिचय झाला. ब्रिटिश येण्यापूर्वी भारतीय लोक अनेक लहान लहान राज्यांमध्ये विखुरले गेलेले होते.

सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा- ब्रिटीश पूर्व काळात भारतीय सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात रुढ्या, प्रथा, परंपरा यांचे प्राबल्य होते. ब्रिटिशांनी भारतात उदारमतवादी विचारप्रणाली रुजविण्याचा प्रयत्न सुरू केला. उदारमतवादी विचारप्रणालीने भारतीयांच्या जीवनावर व्यापक परिणाम केला. परंपरा धर्मज्ञाशब्दप्रामाण्य आणि ग्रंथ प्रामाण्यापेक्षा विवेकनिष्ठ पद्धतीने जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन उदारमतवादाने भारतीयांना दिला. उदारमतवादाच्या प्रभावामुळे भारतीय माणूस स्व-समाजाचे आकलन करून त्यात बदल करण्यासाठी धडपड करू लागला. या धडपडीतून अनेक समाजसुधारक आणि समाजसुधारणेला चालना देणाऱ्या संस्था निर्माण झाल्या. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे भारतीयांना ज्ञान विज्ञानाचा परिचय होऊ लागला. इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवजागृती होऊ लागली. समान प्रशासकीय यंत्रणा आणि दळणवळणाच्या साधनांमुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणावर वैचारिक आदान प्रदान होऊ लागले. या आदान प्रधानामुळे भारतीयांना आपले दोष दिसू लागले. हे दोष दूर करण्यासाठी नव सुशिक्षित लोक प्रयत्न करू लागले. या प्रयत्नांना इंग्रजांनी सहकार्य केल्यामुळे भारतीय समाजात मोठ्या प्रमाणावर सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणांना चालना मिळाली. इंग्रजी राजवटीमध्ये शिक्षणाचे महत्त्व लक्षात आल्यामुळे त्याचा व्यापक प्रसार करण्यासाठी भारतातील अनेक समाजसुधारकांनी अनेक शिक्षण संस्थांची स्थापना केली. इंग्रजी व भारतीय लोकांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्थेमधून सुशिक्षित असा एक नवा मध्यमवर्ग भारतात उदयाला आला. या मध्यम वर्गातील लोकांनी भारतात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारण्याचा धुरा आपल्या हातात घेतली. आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. इंग्रजी राजवटीने समाज सुधारणांना चालना देण्यासाठी अनेक कायदे संमत केले उदा. सतीबंदीचा कायदा. भारतात धार्मिक आणि सामाजिक पुनर्जागरणाच्या चळवळीत ब्रिटिश राजवट आणि समाजसुधारकांबरोबर ख्रिस्ती मिशनऱ्यांनी देखील सहभाग घेतलेला दिसून येतो.. समाजसेवा, आरोग्य, शिक्षण सारख्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामामुळे दलित आदिवासी आणि वंचित वर्गात सामाजिक परिवर्तन होण्यास चालना मिळाली.

राजकीय वारसा- ब्रिटिश राजवटीच्या काळात सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात सुरू झालेल्या परिवर्तनामुळे राष्ट्रीय अस्मितेचा उदय होऊ लागला. समान प्रशासकीय यंत्रणादळणवळण साधनांचा विकाससमान शिक्षणसमान कायदे व न्यायालयीन व्यवस्था इत्यादींमुळे भारतीय समाजात राजकीय जागृती होऊ लागली. भारतीयांच्या वाढत्या राजकीय असंतोषाला लगाम लावण्यासाठी ब्रिटिशांनी भारतीयांना प्रशासनात प्रतिनिधित्व देण्यासाठी विविध कायदे संमत केले. भारतीयांच्या वाढत्या राजकीय महत्त्वाकांक्षा ब्रिटिशांकडून पूर्ण होऊ न शकल्याने हळूहळू राष्ट्रवादी चळवळीचा विकास होऊ लागला. राष्ट्रीय चळवळीला विपरीत वळण मिळू नये म्हणून ही चळवळ संघटित आणि विधायक मार्गाने चालावी म्हणून राष्ट्रीय सभेच्या स्थापनेस ब्रिटिश राजवटीने हातभार लावला. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमुळे राष्ट्रवादी चळवळीला संघटित स्वरूप प्राप्त झाले. राष्ट्रीय सभेने विविध चळवळीच्या माध्यमातून राजकीय अधिकाराची मागणी सुरू केली. राष्ट्रीय चळवळीचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिशांनी भारतीयांना प्रशासनात सामावून घेण्यासाठी भारतीय प्रशासनाचे मर्यादित प्रमाणात लोकशाहीकरण सुरू केले. भारताची शासन यंत्रणा इंग्रजी राजवटीचा वारसा आहे. इंग्रजांनी भारतात संसदीय लोकशाही रुजवण्याचा प्रयत्न केल्यामुळेच स्वातंत्र्योत्तर काळात भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. भारतातील संघराज्य यंत्रणा देखील ब्रिटिश राजकीय वारसाचा परिणाम आहे. 1935 च्या कायद्यानुसार ब्रिटिशांनी भारतात संघराज्य निर्माण केलेले असले तरी 1961 च्या पहिल्या कौन्सिल कायद्यापासून संघराज्य शासन पद्धतीला अनुकूल भूमिका ब्रिटिशांनी घेतलेली दिसून येते. ब्रिटिशांनी सुरू केलेल्या संघराज्यात्मक शासन पद्धतीचाच विस्तार पुढे भारतीय घटनाकारांनी केलेला दिसून येतो. ब्रिटिश काळात विकसित झालेले जिल्हा प्रशासन आणि नागरी प्रशासनाचा स्वीकार आपण स्वातंत्र्योत्तर काळात केलेला दिसून येतो. आधुनिक सनदी सेवेचा वारसा देखील ब्रिटिश राजवटी कडून भारताला मिळालेला आहे.

चळवळीचा वारसा- ब्रिटिश राजवटीकडून शासन व प्रशासनाची चौकट भारतीयांना प्राप्त झालेली असले तरी त्यासोबत भारतीयांच्या उंचावलेल्या अपेक्षा आणि मागण्यांची पूर्ती करण्यासाठी आवश्यक संघटन विकसित करण्याचा वारसा देखील ब्रिटिश राजवटीने दिलेला आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत ब्रिटिशांनी सक्रिय सहभाग घेतला होता. ब्रिटिश राजवटीच्या काळात निर्माण झालेल्या अनेक राजकीय संस्था आणि संघटनांनी भारतीयांमध्ये राष्ट्रवाद आणि राजकीय जाणीव विकसित करण्यात मोलाची कामगिरी केलेली दिसून येते. भारतीयांनी सुरू केलेल्या राष्ट्रवादी आणि घटनात्मक लढ्यास सुसंस्कृत इंग्रजांचे सहकार्य आणि सहानभूती प्राप्त झाली होती. उदारमतवाद घटनात्मक मार्गाबद्दल श्रद्धा, स्वातंत्र्याची आस्था इत्यादींच्या निर्मितीला इंग्रजी राजवटीचा सहवास कारणीभूत मानला जातो. भारतात लोकशाही यशस्वी होण्यामागे ब्रिटिश राजवटीत भारतीयांना मिळालेला चळवळीचा वारसा कारणीभूत मानला जातो. ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतीयांनी केलेल्या विविध चळवळी आणि इंग्रजांशी केलेल्या अनेक करार आणि तडजोडीतून भारतीय जनमानसात लोकशाही मूल्य व्यवस्था रुजण्यास हातभार लागलेला दिसून येतो.

राष्ट्रवादाच्या  उदयाची कारणे- 

आधुनिक राष्ट्रवादाचा उदय अठराव्या शतकात झालेला असला तरी भारतात देखील हजारो वर्षापासून धार्मिक व सांस्कृतिक ऐक्याच्या आधारावर समाजात एकत्वाची भावना विकसित झालेली होती. भारत धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून एक राष्ट्र होते. 1857 च्या उठावानंतर भारतात आधुनिक राष्ट्रवादाच्या उदयाला अनुकूल वातावरण निर्माण होत गेले. ब्रिटिश राजवटीने केलेल्या सुधारणांमुळे भारतात एक आधुनिक समाज घडण्याची प्रक्रिया सुरू झाली. समाजातल्या रुढ्या, परंपरा इत्यादींचे प्रमाण कमी होऊन समाजामध्ये एकात्मता निर्माण होऊ लागली. ब्रिटिश राजवटीकडून केल्या जाणाऱ्या शोषण आणि अन्यायाचे स्वरूप उघड होऊ लागले. 1885 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेने सुरू केलेल्या विविध राष्ट्रवादी चळवळीमुळे राष्ट्रवादाच्या उदयाला हातभार लागला. राष्ट्रवादाच्या उदयाला पुढील घटक कारणीभूत मानले जातात.

1. ब्रिटिशांचे साम्राज्य- भारतात आधुनिक राष्ट्रवादाच्या उदयाला ब्रिटिश साम्राज्य कारणीभूत मानले जाते. ब्रिटिशांनी भारतातील अनेक राज्य जिंकून राजकीय वर्चस्व निर्माण केले. राज्यकारभारात एकसूत्रीपणा आणण्यासाठी संपूर्ण देशात एकछत्री राज्यकारभार सुरू केला. ब्रिटिशांनी केलेल्या एकत्रीकरणामुळे प्रांताप्रांतातील भेदभावाची भावना नष्ट होऊन भारतीय लोक परस्परांशी जोडले गेले. त्यामुळे भारतीयांमध्ये आपण सर्व एक आहोत, आपली संस्कृती, इतिहास, राजकीय व आर्थिक समस्या समान आहेत. इंग्रजांनी शस्त्राच्या जोरावर राज्य प्रस्थापित केले आहे ही भावना विकसित झाल्यामुळे भारतात राष्ट्रवादाचे बीजारोपण होऊ लागले.

2. पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव- ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतीयांना पाश्चिमात्य विचारांचा परिचय झाला. सामाजिक, धार्मिक आणि विविध क्षेत्रातील पाश्चिमात्य विचारांनी भारतीय सुशिक्षित पिढी प्रभावित होऊ लागली. पाश्चिमात्य देशांप्रमाणे समाज व्यवस्था, शासन व्यवस्था निर्माण केल्याशिवाय आपल्या देशाची प्रगती होणार नाही ही जाणीव त्यांच्यात विकसित झाली. या जाणिवेतून भारतीय समाजामध्ये पाश्चिमात्य विचारांचा प्रसार करून राष्ट्रवाद निर्मितीचा प्रयत्न भारतीय अभिजनांनी सुरू केला.

3. पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रभाव- भारतात ब्रिटिश काळात पाश्चिमात्य शिक्षणाची सुरुवात झाली. ब्रिटिशांनी भारतीयांना शिक्षण देण्यासाठी अनेक शिक्षण संस्था स्थापन केल्या. पाश्चिमात्य शिक्षणामुळे इंग्रजी भाषा, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादींचा भारतीयांना परिचय होऊ लागला. पाश्चिमात्य शिक्षणामुळे भारतीयांना नवी दृष्टी मिळू लागली. इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून बाहेर पडलेल्या नवशिक्षित वर्गाने अनेक नवनवीन कल्पना भारतीय समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. विविध देशातील राष्ट्रवाद आणि चळवळीचा अभ्यास करून भारतीयांमध्ये सामाजिक आणि राजकीय जागृती घडून आणण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नातूनच भारतात राष्ट्रवादाचा उदय झालेला दिसून येतो.

4. सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी- 19 व्या शतकामध्ये धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी अनेक संस्था आणि संघटना भारतात उदयाला आल्या उदा. प्रार्थना समाज या संस्था सुरू करणारे राजाराम मोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती इत्यादी धार्मिक सुधारकांनी धार्मिक क्षेत्रातील अनिष्ट रूढींवर हल्ला करून समाजात एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाजातल्या अनिष्ट रुढींवर देखील कठोर प्रहार केले. सामाजिक आणि धार्मिक पुनरूज्जीवनाच्या प्रक्रियेमुळे भारतीय मधील न्यूनगंडाची भावना कमी होऊन स्वधर्म व स्व-संस्कृतीबद्दल आदर निर्माण झाला. त्यातूनच भारतात सांस्कृतिक राष्ट्रवादाचा उदय झाला.

5. दळणवळण साधनांचा विकास- ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात दळणवळणाच्या साधनात क्रांतिकारी बदल झाला. रेल्वे, रस्ते, पोस्ट व तार, जहाज वाहतूक इत्यादी सुविधांमुळे भारतातले सर्व भूप्रदेश एकमेकांशी जोडले गेले. त्यामुळे भारतीयांमधील प्रादेशिक दुरावा नष्ट होऊन भावनिक एकात्मता विकसित होण्यास हातभार लागला. दळणवळणाच्या साधनांमुळे वैचारिक प्रबोधनास गती लाभली. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील अनेक नेत्यांनी दळणवळण साधनांचा योग्य उपयोग करून भारतातील कानाकोपऱ्यातील लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना रुजवण्यास सुरुवात केली.

6. वृत्तपत्रांचे कार्य- पाश्चिमात्य देशातील अनुभवांच्या आधारावर भारतातील समाज सुधारक आणि राजकीय नेत्यांनी समाज जागृती घडून आणण्यासाठी अनेक इंग्रजी आणि स्थानिक भाषेत वृत्तपत्रे सुरू केली उदा. लोकमान्य टिळक केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांनी भारतीय समाजात जनजागृती आणि राजकीय असंतोष निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. भारतीय राष्ट्रीय चळवळीला गतिमानता प्रदान करून भारताला स्वतंत्र करण्यासाठी चळवळ करण्याची मानसिकता तयार करण्याचे कार्य वर्तमानपत्रांनी केले. वर्तमानपत्रांनी निर्माण केलेल्या जागृतीमुळेच भारतात सर्वदूर राष्ट्रवादाचा प्रसार हातभार लागलेला दिसतो.

7. राष्ट्रवादी चळवळ- भारताच्या राष्ट्रवादाला निश्चित आकार आणि दिशा देण्याचे कार्य स्वातंत्र्य आंदोलन काळातील राष्ट्रवादी चळवळीने केलेले दिसते. ब्रिटिश राजवटी कडून केल्या जाणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि आर्थिक शोषणाच्या विरोधात लढा उभारण्यासाठी पाश्चिमात्य शिक्षण पद्धती आणि पाश्चिमात्य राष्ट्रवादी चळवळींच्या विचारांनी प्रभावित झालेल्या टिळक, गांधी, नेहरू, पटेल इत्यादी सारख्या अनेक नेत्यांनी ब्रिटिश राजवट नष्ट करण्यासाठी अनेक आंदोलने सुरू केली उदा. महात्मा गांधीजींचे असहकार चळवळ या आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती होऊन भारतीय समाज एकत्र येऊ लागला देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करू लागला. या संघर्ष करण्याच्या भावनेतूनच भारतात राष्ट्रवादाचा उदय झालेला दिसून येतो.

अशा प्रकारे भारतात राष्ट्रवादाच्या उदयाला वरील विविध घटक कारणीभूत मानले जातात.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ रचना, कार्य, अधिकार आणि स्थान

  पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ रचना, कार्य, अधिकार आणि स्थान भारताने संसदिय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे राष्ट्रपती हा नामध...