गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

भारत जोडो यात्रेचा काँग्रेस पक्ष आणि भारतीय राजकारणावरील परिणाम

 

भारत जोडो यात्रेचा काँग्रेस पक्ष आणि  

भारतीय राजकारणावरील  परिणाम

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात पोहोचली. या यात्रेत राहुल गांधी सोबत शंभरहून अधिक 'भारत यात्री' कन्याकुमारी पर्यंत चालत जाणार आहेत. यात्रा ज्या ज्या भागात जात आहे तेथील स्थानिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते सहभागी होत आहेत. या यात्रेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रत्येक राज्यात एक-दोन ठिकाणी जाहीर सभांचे आयोजन केले जाणार आहे. जवळपास 70 दिवसाहून अधिक काळ झालेली आणि 1800 किलोमीटरचा अंतर पूर्ण करून यात्रा महाराष्ट्राच्या सीमेतून मध्य प्रदेश मध्ये प्रवेश करणार आहे. या यात्राच्या निमित्ताने भारताचे राजकारण ढवळून निघालेले आहे. या यात्रेचा भारतीय राजकारण आणि काँग्रेस पक्षाच्या भवितव्यावर अत्यंत व्यापक परिणाम आहेत.

2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या दारुण पराभव झाल्यामुळे पक्षाची संघटना मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालेली होती. अनेक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा झालेला पराभव आणि काँग्रेस मधल्या काही नेत्यांनी केलेल्या पक्षांतरामुळे पक्षातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास खचलेला होता. निवडणुकीचा अपवाद वगळता कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करणारा सकारात्मक कार्यक्रम अनेक वर्षापासून  पक्षाने राबवला नसल्याकारणाने पक्ष संघटनेत मरगळ आलेली होती. पक्षात चैतन्याच्या अभावामुळे काँग्रेसमुक्त भारताचे भारतीय जनता पक्षाचे स्वप्न लवकरच पूर्णत्वात येईल असे अनेकांना वाटू लागले होते. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाला जनतेवर फारसा प्रभाव पाडता येत नव्हता. अनेक वर्ष सत्तेच्या वर्तुळात वाढलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याची सवय नव्हती. संसदेत सत्ताधारी पक्षाला धारेवर धरण्या व्यतिरिक्त प्रभावी कामगिरी काँग्रेस पक्षाचे नेते गेल्या दहा वर्षात करू शकले नाहीत. राहुल गांधी यांनी पक्ष अध्यक्ष पदाच्या राजीनामा दिल्यानंतर पक्षातील गोंधळ अधिकच वाढला होतो. अशा नकारात्मक वातावरणात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली. यात्रेच्या सुरुवातीला अनेकांनी वेगवेगळ्या शंकाकुशंका व्यक्त केल्या. राहुल गांधीच्या बेफिकिरीपणाचे उदाहरणे मांडले जाऊ लागले. ते यात्रा सोडून मध्येच परदेशवारीला निघून जातील अशा कंड्या पिकवल्या जाऊ लागल्या. काँग्रेसची हितचिंतक आणि यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांना सावधगिरीचा सल्ला दिला जाऊ लागला. परंतु असे काही घडले नाही. यात्रा जसजशी पुढे जाऊ लागली तसा तसा जनतेचा उदंड प्रतिसाद मिळू लागला. या यात्रेमुळे काँग्रेस संघटनेला बऱ्याच दिवसानंतर एक सकारात्मक कार्यक्रम मिळाला. अनेक वर्षापासून रस्त्यावर न उतरलेले काँग्रेसचे कार्यकर्ते त्या निमित्त लोकांमध्ये मिसळू लागले. यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढू लागला. राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल नव्याने चर्चा सुरू झाल्या. यात्रेदरम्यान झालेल्या सभेमध्ये राहुल गांधी यांनी अत्यंत संयमीपणे देशातील मुख्य प्रश्नांकडे जनतेचे लक्ष वेधले. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतचे विधान वगळता सत्ताधारी पक्षावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीवर आक्रस्ताळेपणे टीका केली नाही. सत्ताधारी पक्षाकडून केले जाणारे सत्तेचे केंद्रीकरण, स्वायत्त संस्थांची गळचेपी, विभाजनकारी आणि भेदभाव पूर्ण राजकारण, धर्माच्या आधारावर वर केले जाणारे द्वेषपूर्ण राजकारण इत्यादी मुद्दे सातत्याने मांडून जनतेच्या मनातली अस्वस्थता प्रकट करण्याचा प्रयत्न केला. या यात्रेमुळे राहुल गांधींची प्रतिमा उजळू लागली. काँग्रेस पक्षाने यात्रेत सहभागी होण्यासाठी अनेकांना आमंत्रित केले. यात्रेच्या सुरुवातीच्या काळात सहभागाबद्दल शंका कुशंका व्यक्त करणाऱ्या जनसंघटना हळूहळू यात्रेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊ लागल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत जनआंदोलकाचा ताफा यात्रेत सहभागी होऊ लागल्यामुळे कार्यकर्त्यांचा हुरूप वाढू लागला. वकील प्रशांत भूषण, नौदल प्रमुख एडमिरल रामदास, सुशांत सिंह सारखे प्रतिष्ठित लोक देखील यात्रेत सहभागी झाल्यामुळे मुख्य धारेतील माध्यमांना कव्हरेज देणे भाग पडले. यात्रा जशी जशी पुढे जाऊ लागली तसे तसे गावागावातील जन संघटना स्थानिक मुद्दे घेऊन राहुल गांधीला भेटू लागली. राहुल गांधी यांनी स्थानिक जनतेची जोडून घेण्यासाठी यात्रेदरम्यान वेगवेगळे प्रयोग सुरू केले. मुलांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये मिसळू लागले. त्यांना मदत करू लागले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या भेटी घेतल्या. शेतमजूर,कामगार, विकासाच्या परीघाबाहेर असलेल्या आदिवासी, भटक्या समाजातील लोकांना भेटून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शिक्षण, आरोग्य आणि शेती सारख्या क्षेत्रात प्रयोग करणाऱ्या लोकांची आवर्जून भेट घेण्याचा प्रयत्न केला. या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी लोकांच्या वेदनेशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला. यात्रेला मिळत असलेल्या उदंड प्रतिसादामुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल अशी चर्चा सुरू झाली. या यात्रेच्या काळात सुरू असलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या निवडणूक निकालावर होणाऱ्या परिणामाचे देखील माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली. भारत जोडो यात्रेचा तात्कालीन राजकारणावर लगेच परिणाम होईल. हिमाचल आणि गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश प्राप्त होईल असे भाकीत करणे सध्याच्या घडीला योग्य वाटत नाही. काँग्रेसच्या दीर्घकालीन भविष्याच्या दृष्टीने भारत जोडो यात्रेचा आपल्याला विचार करावा लागेल. या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस पक्षात निर्माण झालेल्या चैतन्याचा उपयोग भविष्यात पक्ष वाढीसाठी होऊ शकतो. राहुल गांधीच्या नेतृत्वाविषयी जनतेच्या मनात असलेल्या पारंपारिक धारणेत देखील बदल होऊ शकतो. या यात्रेमुळे राहुल गांधी यांची प्रतिमा बदलण्यास हातभार लागत आहे. मुख्याधारेतील प्रसिद्धी माध्यमांनी त्यांची  'पप्पू' ह्या बनवलेल्या प्रतिमा छेद जाऊ लागला. काँग्रेस पक्ष संघटनेला नवी ऊर्जा प्राप्त होऊ लागली. जनतेच्या मनातील अस्वस्थतेला पक्षाच्या कार्यक्रमात स्थान दिल्यास तर जनता आपल्याला पाठिंबा देऊ शकते हे भारत जोडो यात्रेने दाखवून दिलेले आहे. राजकारणात भावनेला महत्त्वाचे स्थान असते. इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांनी भावनिकतेच्या आधारावर राजकारण करून दीर्घकाळ सत्तेची सूत्रे आपल्या हाती ठेवल्याची उदाहरणे आहेत नेमका हाच धागा पकडून त्यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जनतेशी नाळ जोडून त्यांच्या हृदयात जागा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. अर्थात या प्रयत्नाला कितपत येईल याबद्दल आत्ताच भाकीत करणे घाईचे ठरेल. मात्र राहुल गांधी यांनी सुरू केलेली ही नवी इनिंग निश्चितच काँग्रेस पक्षाला नवी दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरेल.



 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

you tube video

 you tube video