शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अल्पसंख्यांक RRS and Minority

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून संघ आणि अल्पसंख्यांकांच्या संबंधाबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र  संघाने या प्रश्नाचे सरळ उत्तर न देता गूढ पद्धतीने उत्तर दिल्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी  संशयात्मक वातावरण निर्माण झालेले दिसून येते. संघाचे संस्थापक डॉ. केशव हेगडेवार यांनी 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यावेळेस त्यांना तुम्ही आणि तुमची संघटना मुस्लिम विरोधी आणि ख्रिश्चन विरोधी आहे का? हा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, 'आम्ही कोणाच्या विरोधी नाही. आम्ही हिंदू-अभिमुख आहोत. आम्ही हिंदूंचा विचार करतो. हिंदू समाज आणि हिंदुस्थान हे समीकरण आहे. डॉ. हेगडेवारांनी चाणाक्षपणे हा प्रश्न उडवून लावला. संघाची स्थापना शत्रुअस्तित्ववादावर झालेली नसून देश हितासाठी झाली आहे हा दावा केला. संघाने नेहमीच राष्ट्र आणि हिंदू धर्म एकसमान आहेत या भूमिकेतून मांडणी करण्याचा प्रयत्न केला. अर्थात डॉ. हेगडेवारांनी केलेल्या मांडणीतून स्पष्टपणे इतर धर्मियांविषयी द्वेष किंवा अनादर दिसून येत नसला तरी संघाचे दुसरे संघ सरसंचालक गोळवलकर गुरुजी यांच्या 'बंच ऑफ थॉट्स' या पुस्तकात त्यांनी मुस्लिम, ख्रिस्ती आणि कम्युनिस्ट विचार मांडणाऱ्या समुदायाला 'अंतर्गत शत्रू' म्हणून वर्गीकृत केलेले आहे. गोवळकर गुरुजींचे हेच पुस्तक संघाच्या दृष्टीने आदर्शवत मानले जात होते. संघाची विचारधारा जाणून घेण्याचा प्रमुख स्रोत म्हणून या पुस्तकाकडे पहिले जात होते. परंतु संघाचे सध्याचे संघ सरसंचालक मोहन भागवत यांनी गोवळकर गुरुजींच्या भाषणाचे संकलन असलेले 'बंच ऑफ थॉट्स' हे दीर्घकाळ आदर्शवत असलेल्या पुस्तकासंदर्भात खुलासा केलेला आहे. त्यांच्या मते, 'बंच ऑफ थॉट्स मधील विचार शाश्वत स्वरूपाचा नाही. या भाषण संग्रहातील विचार तात्कालीक परिस्थितीवर आधारलेले होते. म्हणून संघाने या पुस्तकातील काळाशी सुसंगत नसलेला काही भाग टाकून दिलेला आहे. सध्याच्या परिस्थितीशी सुसंगत असलेल्या भागांना संघ वैद्य मानतो.' ही भूमिका मांडलेली आहे.

नागपूर येथील सभेत मोहन भागवत म्हणाले की, 'हिंदू-मुस्लीमांचा डीएनए एकच आहे; दोघांचे पूर्वज एक आहेत. इंग्रजांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये गैरसमज निर्माण केला. उपासना पद्धती बदलल्याने सांस्कृतिक धारा आणि राष्ट्रीय जीवनाचा प्रवाह बदलत नाही. संघाचा विचार व्यापक हिंदुत्वशी नाते सांगणारा असून उपासना पद्धतीशी जोडणारा नाही तर तो सदासर्वदा सांस्कृतिकता आणि राष्ट्रीयतेशी जोडलेला आहे म्हणून येथील जे जे सांस्कृतिक प्रवाह आणि राष्ट्रीय प्रवाहात येतात ते सर्व हिंदुत्वाचे घटक आहेत ही समन्वयकारी भूमिका मांडली. भारत विश्व विजेते असल्याची गरज नाही. प्रत्येकाला जोडणे हा त्याचा उद्देश आहे भारत कुणाला जिंकण्यासाठी नसून सर्वांना एकत्र आणण्यासाठी अस्तित्वात आहे.' अशी विधाने करून संघ बदलतो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे.त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मुस्लिम मोहल्यांमध्ये संघाच्या शाखा उघडण्याचा मानस व्यक्त केला. दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मज्जिदचे इमाम आणि ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे सर्वेसर्वा उमेर अहमद इलियासी यांच्यासोबत एकांतात चर्चा केली. मुस्लिम बुद्धिवंतांसोबत संवाद साधला त्यात मुसलमानांशिवाय हिंदुस्तान पूर्ण होऊ शकत नाही ही भूमिका मांडली. मशीद आणि मदरशांना भेटी दिल्या. ज्ञानव्यापी मशीद संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नासंदर्भात हिंदूंनी प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज नाही. संघ यापुढे धार्मिक आंदोलनाचा हिस्सा बनणार नाही. गोहत्या, काफिर, जिहाद बाबत मुस्लिमांनी स्पष्ट भूमिका घ्यावी ही मते व्यक्त केलेली आहेत. मोहन भागवतांनी उचललेल्या पावलांमुळे संघ खरोखर बदलला आहे का? या बद्दल चर्चा सुरु झालेली आहे.

 संघाच्या भूमिकेसंदर्भात विचारवंतांमध्ये दोन गट निर्माण झालेले दिसून येतात.समाजशास्त्रज्ञ बद्रीनारायण यांच्या मते, "संघ सकारात्मक दिशेने जात आहे. त्यामुळे संघाबद्दलच्या पारंपारिक धारणेत बदल करणे गरजेचे आहे. संघाने काळानुरूप बदल करून घेतलेला आहे. संघाचे स्वयंसेवक तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवत आहेत. सोशल मीडियावर मोठी उपस्थिती दर्शवून संदेश प्रसारित करत आहेत. सामाजिक कार्यात सक्रिय होत आहेत. भाजप सत्तेवर आल्यानंतर संघाची स्वीकारार्हता वाढलेली आहे. संघाचा प्रभाव दिसतो त्यापेक्षा खूप मोठा आहे. त्यांचा अजेंडा पुढे नेण्यात अनेक संघटना गुंतलेले आहेत. हे मत व्यक्त करून संघाच्या बदलत्या भूमिकेचे समर्थन केलेले आहे. परंतु त्यांची ही भूमिका अनेकांना मान्य नाही. निलांजन मुखोपाध्याय यांना संघाची ही कृती प्रतीकात्मक स्वरूपाची वाटते. कारण भाजप सत्तेवर आल्यानंतर मुस्लिम विरोधी भावना तीव्र झालेल्या आहेत. गोहत्या बंदीचे कायदे, धर्मांतरासंदर्भातील कायदे बदल, लव जिहादची चर्चा, समान नागरी कायदा आणण्याची भाषा, लोकसंख्या नियंत्रणाबाबत कायदा करण्याची भाषा इत्यादी भाजपच्या धोरणामुळे हा विरोध अधिक तीव्र स्वरूप धारण करतो आहे. म्हणून या विरोधाचे रूपांतर संघर्षात होऊ नये या भूमिकेतून संघाने समन्वयवादी भूमिका मांडण्यास सुरुवात केली. संघाचे नेते मुस्लिमांची जवळीक साधत असले तरी संघाशी संलग्न संघटनेचे लोक मुस्लिम व्यवसायिकांवर बहिष्कारच्या मोहिमा चालवत आहेत. या विरोधात संघाचे  नेते  बोलत नाही .

धर्मनिरपेक्षेतेचे समर्थक अभ्यासकांना असं वाटते की, 'संघ सुरुवातीपासूनच नेहमीच विरोधाभासाचे धोरण अवलंबून जनतेचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आलेला आहे.' त्यांच्या मते संघ नेमका कसा कार्य करतो हे जाणून घेण्यासाठी माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचे निरीक्षण लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यांच्या मते, 'संघ परिवार आणि हिंदुत्व समजून घ्यायचे असेल तर नेतेमंडळी काय बोलतात या ऐवजी सर्वसामान्य प्रचारक काय करतात याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. संघावर विरोधक घेत असलेल्या आक्षेपाला उत्तर देण्याचे काम संघाची नेतेमंडळी करत असते या उलट सर्वसामान्य प्रचारकाला उत्तर देण्याची गरज भासत नाही. त्याच्या अंगी जे बाणावलेले असते आणि त्याच्या मनात जे असते त्याप्रमाणे तो कृती करतात. या निरीक्षणावरून असे सांगता येते की संघ बदललेला आहे असा देखावा संघाचे प्रमुख नेते सातत्याने करत असले तरी   संघाच्या सर्वसामान्य प्रचारकाला काही फरक पडत नाही. तो संघाच्या मूळ चौकटीनुसार कार्य करत राहतो.

अल्पसंख्यांक समाजाला जवळ घेण्याचा प्रयत्न मोहन भागवत यांनी सर्वप्रथम केलेला नाही याआधी बाळासाहेब देवरस, रजू भैय्या यांच्या काळात देखील झालेला दिसून येतो. संघ नेहमीच धर्मनिरपेक्षता ऐवजी पंथनिरपेक्षतेला प्राधान्य देत आलेला आहे त्यामागे त्यांची एक निश्चित प्रकारची भूमिका आहे. संघाची भूमिका टी. एच मार्शल यांच्या उदारमतवादी एकल नागरिकत्व संकल्पनेशी नाते सांगणारी आहे. संघ आपल्या बदललेल्या भूमिकेच्या माध्यमातून समान राष्ट्रीय नागरिक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण नागरिकत्वाच्या परिघाबाहेर असलेल्या अल्पसंख्यांक समूहांना समान राष्ट्रीय संस्कृतीचा भाग बनवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यातून त्या समुदायातल्या नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे बीजारोपण करता येईल. मार्शल आपल्या नागरिकतेच्या सिद्धांताच्या माध्यमातून सर्व समूहांना राष्ट्रीय संस्कृतीत सामील करण्याचा प्रयत्न करतो. अल्पसंख्यांक समुदायाच्या  संस्कृतीच्या स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता देत नाही. अल्पसंख्याकांना सोबत सार्वजनिक जीवनात न्यायपूर्ण आणि समानतेचा व्यवहाराला  मान्यता देत नाही. बहुसंख्यांक समाजाच्या संस्कृतीलाच राष्ट्रीय संस्कृती मानतो आणि त्या संस्कृतीत इतरांनी आपले अस्तित्व विलीन करावे हे अपेक्षित करतो याच मार्शलच्या भूमिकेची री सध्या संघ ओढताना दिसतो आहे. बहुसंख्यांकांची संस्कृती आणि अल्पसंख्यांकांच्या संस्कृतीत फारसा फरक नाही हे दर्शवण्याचा संघ प्रयत्न करुन अप्रत्यक्षपणे बहुसंख्यांकांच्या म्हणजे हिंदूंच्या संस्कृतीचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा डावपेचाचा भाग म्हणून संघाची नेतेमंडळी विधाने करत असतात. वरील कृती आणि विधानांमुळे संघ उदारमतवादी बनला आहे. संघाने धर्मनिरपेक्षतेला मान्यता दिली असा होत नाही. संघ आपली स्वीकारहार्यता जास्तीत जास्त वाढवण्यासाठी अशी धोरणे नेहमीच अंमलात आणत आलेला आहे त्याने भारावून जाण्याची फारशी आवश्यकता नाही. 

दैनिक भास्करचे संपादक प्रकाश दुबे म्हणाले की, 'संघा भोवती ज्या प्रकारे विचारांची भिंत उभी राहिली आहे; ती तोडणे फार कठीण वाटते.' भाजपचा 80 विरुद्ध 20 हा निवडणूक जिंकण्याचा फार्मूला कायमस्वरूपी यशस्वी होईल याबद्दल संघाला शंका आहे. संघाकडून आणि भाजपकडून केले जाणारे धार्मिक ध्रुवीकरण, राष्ट्रवादाला दिले जाणारी धर्माची जोड, बहुजनांचा केला जाणारा बुद्धिभेद फार काळ टिकणार नाही याची जाणीव संघाच्या धुरीणांना आहे याच जाणिवेतून संघाचा परिघ विस्तारण्यासाठी उदारमतवादी भूमिकेतून त्यांनी अल्पसंख्याकांना गौजरण्याचे प्रयत्न सुरू केले. परंतु हे प्रयत्न फार वरवरचे आहेत. भाजपने मुस्लिमांना फारसे राजकीय प्रतिनिधित्व दिल्याचे आढळून येत नाही. मंत्रिमंडळात आणि संसदेत अल्पसंख्यांक समाजातल्या व्यक्तींना प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात संघ चकार शब्द काढत नाही. मुस्लिमांचा मागासलेपण दूर करण्यासाठी सच्चर आयोगाने केलेला शिफारशी अंमलात आणण्याबद्दल काहीही बोलत नाही. मागासलेपण दूर करण्यासाठी मुस्लिमांनी केलेल्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवत नाही फक्त भावनिक पातळीवर हिंदू मुस्लिमांचा डीएनए एक आहे. देशासाठी दोन्ही समाजाची गरज आहे अशी आव्हाने करून आपण बदलत असल्याचा देखावा उभा करत आहे. प्रत्यक्षात संघाने आपल्या मूलभूत विचार चौकटीत बदल केल्याची एकही उदाहरण दिसून येत नाही ही फक्त वरवरची मलमपट्टी आहे या मलमपट्टीने दोन्ही समाजातील दरी कमी होण्याची सुताराम शक्यता नाही. तात्कालीन राजकारणाची गरज म्हणून ही भूमिका घेतलेली आहे. या भूमिकेचा पाया पोकळ युक्तिवादावर उभा असल्याने दीर्घकालीन यशाच्या दृष्टीने ती कुचकामी ठरण्याची शक्यता आहे.



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

you tube video

 you tube video