तथ्य संकलन अर्थ, स्वरूप आणि प्रकार- प्राथमिक आणि दुय्यम तथ्य
Data Collection- Primary
and Secondary
तथ्य संकलन म्हणजे काय?-
सत्य म्हणून स्वीकार करता येऊ आणि सर्वाना अनुभव घेता येऊ शकणाऱ्या घटनांना तथ्य असे म्हणतात. संशोधन कार्यासाठी किंवा वैज्ञानिक
ज्ञान गोळा करण्यासाठी विविध शास्त्रीय
पद्धतींद्वारे संकलित केलेल्या माहिती किंवा
आकडेवारीला तथ्य किंवा संशोधन सामग्री
असे म्हणतात.
फेअर चाईल्ड यांच्या मते- तथ्य म्हणजे एक अनुभव सिद्ध सत्यापनीय अवलोकन होय.
तथ्य संकल्पनाच्या पद्धती व प्रकार-
प्राथमिक संशोधन साम्रगी वा तथ्य- प्राथमिक संशोधन सामग्री गोळा करण्यासाठी संशोधक
जनतेशी संपर्क ठेवून तथ्य गोळा करतो. संशोधन समस्येच्या अनुषंगाने संशोधकाला हवी
असलेली माहिती स्वतः मिळविणे म्हणजे संशोधकाने प्रथम प्रयत्नात वा अध्ययनातून
प्राप्त केलेल्या तथ्यांना प्राथमिक संशोधन सामग्री असे म्हणतात. प्राथमिक संशोधन
सामग्री मिळविण्याच्या दृष्टीने संशोधकाने सर्वप्रथम प्रयत्न केलेले असतात. संशोधक
आपल्या संशोधन क्षेत्रात जाऊन संशोधनाशी संबंधित लोकांचे निरीक्षण करून, मुलाखती घेऊन, प्रश्नावली वा अनुसूची भरून संशोधन
सामग्री जमा करीत असतो. संशोधन समस्येशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधून
वा संपर्क प्रस्थापित करून किंवा निरिक्षणाद्वारे समूहांच्या वर्तन
क्रिया-प्रतिक्रियाचे आकलन करून संशोधन सामग्री गोळा केली जाते. प्राथमिक संशोधन
सामग्री निरीक्षण, मुलाखत, आणि अनुसूची तंत्राचा वापर करून जमा केली जाते.
निरिक्षण- संशोधनाची सुरुवात निरीक्षणानेच होते निरीक्षण हा संशोधनाचा पाया
मानला जातो. प्राथमिक संशोधन जमा करण्याचा निरिक्षण हा एक मार्ग आहे. निरीक्षणाचा
उद्देश घटना जशी पडते आहे तशी पाहणे व ऐकणे आणि उद्देश लक्षात घेऊन नोंदी घेणे असते. हेतुपूर्वक पद्धतीने
पाहण्याला निरीक्षण असे म्हणतात. संशोधन समस्येशी संबंधित सर्व घटनांचे स्वतः अवलोकन करणे
निरीक्षण अभिप्रेत असते. उदा. आदिवासीचा अभ्यास करताना आदिवासीच्या जीवनाचे निरीक्षण करणे वा
त्यांच्या सहवासात राहून त्यांचा अभ्यास करणे. प्राथमिक संशोधन सामग्री जमा करण्यासाठी निरीक्षण ही सर्वात
योग्य पद्धत मानली जाते. एखादया व्यक्तीच्या वर्तणुकीच्या किंवा
व्यक्तिमत्त्वाच्या
विशेष लक्षणांचा अभ्यास करावयाचा असेल
तर ही पद्धत योग्य मानली जाते. प्रश्नावली आणि मुलाखतीचा अभ्यासकरून प्रतिसादक
प्रतिसाद देत नसेल तर या तंत्राचा वापर करणे योग्य असते.
प्रश्नावली व अनुसूची- अध्ययन क्षेत्र विस्तृत स्वरूपाचे असल्यास संशोधन क्षेत्राचे
निरीक्षण करणे वा मुलाखत देणे आणि भेट देणे शक्य नसल्यामुळे प्राथमिक संशोधन
सामग्री जमा करण्यासाठी प्रश्नावलीचा वापर केला जातो. प्रश्नावलीच्या माध्यमातून
संशोधन विषयासंबंधी आवश्यक संशोधन सामग्री जमा करता येते. प्रश्नावली ही लिखित
प्रश्नांची यादी असते ज्यात उत्तरदात्यांनी उत्तरे नोंदवायची असतात. उत्तरदाता
प्रश्न वाचतो. त्यांचा अपेक्षित अर्थ लक्षात घेऊन उत्तरे लिहितो. प्रश्नावली आणि
अनुसुची जवळपास सारखे तंत्र असते परंतु प्रश्नावलीत उत्तरदाता स्वतः उत्तरे नोदवित
असतो तर अनुसूचीत संशोधक उत्तरदात्याने दिलेल्या उत्तराच्या आधारवर नोंदी घेत
असतो. प्रश्नावली पोस्टाने पाठविली जाते तर अनुसूची संशोधक स्वतः उत्तरदात्याकडे
घेऊन जातो. उत्तरदात्याला प्रश्न विचारून स्वतः त्यांची उत्तरे अनुसूचीत भरतो.
अध्ययन क्षेत्र फार विस्तृत नसेल तर अनुसूचीचा उपयोग करता येतो.
३. मुलाखत- मुलाखत हा प्राथमिक साधन सामग्री संकलनाचा मौखिक
प्रकार आहे. व्यक्तिच्या भावना, हेतुनिष्ठता, प्रेरणा इत्यादी संबंधीचे ज्ञान मुलाखत तंत्राने मिळविता येते.
प्रत्यक्ष निरीक्षणातून न मिळालेली माहिती मुलाखत तंत्रातून मिळविता येते.
निरीक्षणाद्वारे व्यक्तीच्या फक्त बाह्यअंगाचा अभ्यास करता येतो. मुलाखतीद्वारे
व्यक्तीच्या अंतरंगाचा शोध घेता येतो. मुलाखत हा अनोपचारिक, मौखिक व परिणामकारक स्वरूपाचा संवाद
असतो तो विशिष्ट नियोजित हेतुने घडवून आणलेला असतो. संशोधन सामग्री संकलित
करण्याची मुलाखत ही सर्वसामान्य पद्धती आहे. मनात विशिष्ट हेतू ठेवून मुलाखत घेतली
जाते. मुलाखत ही व्यक्ती-व्यक्तीतील आंतरक्रिया असते, जी समोरासमोर किंवा दोन या दोनापेक्षा
जास्त व्यक्तीमध्ये चालू असते.
४. विशिष्टाभ्यास वा सर्वेक्षण पद्धती- सामाजिकशास्त्रात
प्राथमिक संशोधन सामग्री जमा करण्यासाठी विशिष्टाभ्यास पद्धतीचा वापर केला जातो.
एखादया विशिष्ट घटकांचा सूक्ष्म व सखोल अभ्यास करण्यासाठी या पद्धतीचा वापर करतात.
अभ्यासासाठी निवडलेल्या विशिष्ट घटकात समग्र पाहण्याची रीत म्हणजे विशिष्ट अभ्यास
पद्धती होय. या पद्धतीच्या माध्यमातून देखील संशोधन सामग्री जमा करता येते.
दुय्यम संशोधन सामग्री वा तथ्य- संशोधनासाठी प्राथमिक संशोधन
सामग्रीसोबत दुय्यम संशोधन सामग्रीची देखील आवश्यक असतो. दुय्यम संशोधन साहित्य
आधीच उपलब्ध असते. ते इतरांनी जमा केलेले असते. आपल्याला हवी असलेली संशोधन
सामग्री आधीच कोणी तरी संकलित केलेली असते त्या माहितीचा सार आपण काढतो आणि आपल्या
संशोधनात वापरतो. आपल्या संशोधनाला योग्य आधार उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक
संशोधन सामग्रीसोबत दुय्यम संशोधन सामग्रीचा वापर करावा लागतो. इतरांनी जमा
केलेल्या माहितीचा आपल्या संशोधनात उपयोग करणे हा दुय्यम संशोधन सामग्री जमा
करण्याचा मुख्य उद्देश असतो. प्राथमिक संशोधन सामग्रीची व्यक्तिनिष्ठता आणि
वस्तुनिष्ठता पडताळून पाहण्यासाठी संशोधकाला दुय्यम माहितीवर विसंबून राहावे
लागते. दुय्यम संशोधन सामग्री संशोधकाने स्वत; संकलित केलेली नसते. अन्य संशोधकाने
संकलित केलेल्या संशोधन सामग्रीचा वापर संशोधक करतो तेव्हा त्याला दुय्यम संशोधन सामग्री असे म्हणतात. दुय्यम
संशोधन सामग्रीत वैयक्तिक कागदपत्रे, आत्मचरित्रे, पुस्तके, रोजनिशी, पत्रे, शासकीय
कागदपत्रे, सार्वजनिक प्रलेख, वर्तमानपत्रे, संशोधन मासिके, शासकीय व निमशासकीय प्रकाशन, पूर्व संशोधन, आंतरराष्ट्रीय संस्थाचे अहवाल इत्यादीचा
समावेश होता. दुय्यम संशोधन सामग्री संशोधनासाठी उपयुक्त असली तरी तिची वैधता स्त्रोनुसार
वेगवेगळी असते. या माहितीत पूर्वग्रहाचे अस्तित्व मोठया प्रमाणावर असते. आपल्या
हवी ती माहिती वा साचा उपलब्ध होईलच याची खात्री नसते. दुय्यम संशोधन सामग्रीबाबत
अडचणी असल्या तरी संशोधकांना संशोधनाचे विश्लेषण आणि पडताळणी करण्यासाठी दुय्यम
संशोधन सामग्रीवर विसंबून राहावे लागते. दुय्यम सामग्री प्राथमिक सामग्री इतकीच
महत्त्वपूर्ण असते.