शनिवार, १८ जानेवारी, २०२५

AI आणि चॅट जीटीपीच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) युगात शिक्षकाची भूमिका

 

AI आणि चॅट जीटीपीच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) युगात शिक्षकाची भूमिका


माहिती तंत्रज्ञानाने शिक्षणाच्या क्षेत्रात अत्यंत वेगाने क्रांतिकारक बदल करण्यास सुरुवात केलेली आहे. माहिती तंत्रज्ञान क्रांतीच्या दुसऱ्या टप्प्यात एआय आणि चॅट जीटीपी सारख्या प्रभावी तंत्रज्ञानाने शिक्षकांसमोर एक नवे आव्हान निर्माण केलेले आहे. इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या जोरावर रोबोटिक शिक्षक विकसित केलेला आहे. तिरुअनंतपुरमच्या केटीसी हायर सेकंडरी शाळेत 'आयरिस' नावाची पहिली एआय शिक्षिका विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे कार्य करत आहे. भविष्यात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अशा अनेक शिक्षकांची निर्मिती करून मानवी शिक्षकापुढे नवे आव्हान उभे केलेले आहे. तंत्रज्ञानाच्या आधारावर तयार केलेला रोबोटिक शिक्षक हजारो वर्षापासून मानवी समाजात सुरू असलेल्या गुरु-शिष्य परंपरा नष्ट करेल का? अशी भीती व्यक्त केली जात आहे. कारण या रोबोटिक शिक्षकाची ज्ञानदान करण्याची प्रचंड असलेली क्षमता मानली जाते. ऑफलाइन आणि ऑनलाईन साधनांचा वापर करून हे रोबोटिक शिक्षक भविष्यात मानवी शिक्षकाची जागा घेतील अशी चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू झालेली आहे.

भारतासारख्या देशात इंटरनेट आणि संगणकाचा वापर सुरू होण्यास फारशी वर्ष झालेली नाहीत. 1995 मध्ये भारतात इंटरनेट सेवेचा प्रारंभ झाला. आज भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 100 करोड पर्यंत पोहोचलेली आहे. या शंभर करोड लोकांपैकी 65 करोड लोकांकडे अँड्रॉइड स्मार्टफोन उपलब्ध आहेत. चॅट जीटीपीचा वापर करणाऱ्यांची संख्या भारतामध्ये झपाट्याने वाढते आहे. चॅट जीटीपी शिक्षण क्षेत्रातील सर्वच प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम मानला जात आहे. ही सेवा निशुल्क असल्यामुळे भारतातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर वापरताना दिसत आहेत. त्यामुळे ज्ञानार्जनाच्या क्षेत्रात शिक्षकाऐवजी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते आहे. त्यामुळे शिक्षकाची भूमिका अत्यंत मर्यादित होत चाललेली आहे‌. एआयचे वाढते महत्व लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भात शिफारस केलेली आहे. आयसीएसई आणि सीबीएसई या माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांनी अभ्यासक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित विषयांचा समावेश केलेला आहे याचा अर्थ सरकारी पातळीवर देखील शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या तांत्रिक बदलांना प्रोत्साहन दिले जात आहे.

ज्ञानार्जनाच्या क्षेत्रात शिक्षकांची मक्तेदारी नष्ट करून एक पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पर्यायी व्यवस्थेत हळूहळू मानवी शिक्षकाची जागा यांत्रिक शिक्षक घेईल. अशा परिस्थितीत शिक्षण व्यवस्थेत शिक्षकाची भूमिका काय असावी याचा नव्याने विचार करण्याची गरज भासू लागली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मुले अत्यंत कमी वयात तंत्रस्नेही बनत आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत वेगाने वाढत चाललेला आहे. अशा परिस्थितीत शिक्षकाने स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचे खुल्या मनाने स्वागत केले पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी स्वतःला सक्षम केले पाहिजे.  चॅट जीटीपी सारख्या तंत्रज्ञानाने माहितीचा महापूर आणलेला असला तरी त्यातून योग्य माहितीचे ज्ञान आणि उपयोजनात कसे रूपांतर करावे याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यात शिक्षकांनी प्रभावी भूमिका बजावली पाहिजे. तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या माहितीच्या महाजालातून योग्य ती माहिती निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन केले पाहिजे.

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया वर्गापुर्ती बंदिस्त राहिलेली नाही. वर्ग बाहेरचे अध्ययन आधुनिक काळात महत्वपूर्ण मानले जाऊ लागलेले आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांनी नवीन नवीन शैक्षणिक साधनांचा वापर करण्यास सुरुवात केली पाहिजे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कार्यानुभव कसा देता येईल याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेत लवचिकता आणली पाहिजे. या प्रक्रियेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निव्वळ शिकवण्यापेक्षा चर्चा, विचारविनिमय, प्रश्न विचारायला प्रोत्साहन,  प्रयोगांना प्राधान्य आणि कृतियुक्त शिक्षण  इत्यादी मार्गांचा उपयोग करून अध्ययन प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग घडून आणला पाहिजे. शिक्षकाप्रती विद्यार्थ्यांमध्ये जितकी जास्त आत्मीयतेची भावना विकसित होईल तेवढ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षण प्रक्रियेशी जोडलेला राहील. शिक्षकाची जागा तंत्रज्ञान कधीच घेऊ शकणार नाही हा भाव समाजामध्ये विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. एआय किंवा चॅट जीटीपी सारखे तंत्रज्ञान शिक्षकाच्या नोकरीवर गदा आणणारे नसून त्यांना अध्ययन-अध्यापनात मदत करणारे आहे या भूमिकेतून शिक्षकांनी स्वतः या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आणण्यासाठी पुढे आले पाहिजे. शिक्षणासारख्या क्षेत्रात सर्जनशीलता आणि मानवी संबंधांना सर्वाधिक महत्त्व आहे. अशा क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर करणे योग्य ठरेल हे समाजाला पटवून देण्याची जबाबदारी शिक्षकांनी हाती घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांचे अंतर्मन लक्षात घेऊन त्यांना योग्य दिशा देण्यास मानवी शिक्षकाशिवाय पर्याय नाही हे जोपर्यंत समाजाच्या लक्षात आणून दिले जात नाही तोपर्यंत शिक्षकाला नवा पर्याय उभे करण्याचे प्रयत्न सुरू राहतील. तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकाची भूमिका संपलेली नसून त्यात बदल झालेला आहे. एआयच्या मदतीने शिक्षकाला अध्यापनाची प्रक्रिया अधिक रंजक बनवता येईल. अशैक्षणिक आणि प्रशासकीय कामे एआयच्या मदतीने लवकर पूर्ण करून अध्यापन प्रक्रियेवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. प्रत्येक विद्यार्थी हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. प्रत्येक विद्यार्थ्यांची सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी भिन्न भिन्न असते. या भिन्न भिन्न पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांचे सामर्थ्य, कमतरता आणि अध्ययनाची गती यांचा विचार करून एआयच्या मदतीने गरजेनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देता येईल. एआयच्या मदतीने मूल्यमापन प्रक्रियेत योग्य ते बदल करता येतील. मूल्यमापनाचे विश्लेषण आणि वर्गीकरण करण्यासाठी हे तंत्रज्ञान शिक्षकाला सहाय्यभूत ठरेल.

प्रत्येक व्यवस्थेत काळानुरूप बदलणे गरजेचे असते हा नियम शिक्षण व्यवस्था आणि त्यात काम करणाऱ्या शिक्षकांना देखील लागू असतो. शिक्षण क्षेत्रात जगभर तंत्रज्ञानाच्या मदतीने नवनवे प्रयोग होत आहेत. या प्रयोगांच्या माध्यमातून नवनवीन कल्पना शिक्षण क्षेत्रात आणल्या जात आहेत. त्या कल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एआयची मदत शिक्षकांना होऊ शकते. आकर्षक आणि परस्पर संवादी अध्ययन सामग्री तयार करण्यासाठी शिक्षक एआयची मदत घेऊ शकतात. हजेरी, ग्रेडिंग इत्यादी नियमित प्रशासकीय कार्य एआयच्या मदतीने स्वयंचलित पद्धतीने करता येऊ शकतात. ऑटोमेशन, वैयक्तिकरण याशिवाय एआयचा उपयोग करून नाविन्यपूर्ण शैक्षणिक सामग्रीची निर्मिती करून शिक्षक विद्यार्थ्यांमधली सर्जनशीलता विकसित करू शकतात. विद्यार्थ्यांचे सर्वसमावेशक मूल्यमापन  करण्यासाठी हे तंत्रज्ञान अनेक अंगानी शिक्षकांना मदत करू शकते. ‌ एआयची शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचेही शैक्षणिक अनुभव समृद्ध करण्यासाठी  फार मोठी मदत होऊ शकते.

चॅट जीटीपी आणि एआयसारखे प्रगत तंत्रज्ञान भारताच्या शिक्षण व्यवस्थेत व्यापक परिवर्तन आणू शकतात. ऑल इंडिया एज्युकेटर फोरमचे संस्थापक मॅथ्यू के थॉमस सांगतात की, "चॅट जीटीपी आणि एआय तंत्रज्ञानामध्ये भारतातील शिक्षण पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी आवश्यक क्षमता आहे. या तंत्रज्ञानामुळे शिक्षण व्यवस्थेतील प्रशासकीय कार्य स्वयंचलित करता येतील. त्यामुळे शिक्षकांवरील प्रशासकीय कामाचा ताण कमी होऊन ते विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासावर लक्ष केंद्रित करू शकतील". शिक्षक एआयप्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचा डाटा मोठ्या प्रमाणावर इनपुट करू शकतात. या डाटाचे योग्य पद्धतीने विश्लेषण करून विद्यार्थ्यांमध्ये असलेले कौशल्य आणि कमकुवतपणा याचा शोध घेऊन योग्य उपाययोजना करू शकतात. नवीन नवीन संकल्पना समजून घेण्यासाठी आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी हे तंत्रज्ञान शिक्षकांना मदत करू शकते. विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह थिंकिंग मध्ये गुंतवून ठेवण्यास मदत करू शकते. विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या विषयांमध्ये संशोधन करण्यास, स्रोतांचे मूल्यमापन करण्यास  आणि निष्कर्षाचे आयोजन करण्यास मदत करून संशोधन कौशल्य बळकट करू शकतात. नवी दिल्लीतील एका नामांकित शाळेतील शिक्षिका मीना बग्गा यांच्या मते, "चॅट जीटीपीमुळे शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल झालेला आहे.  विद्यार्थ्यांसाठी अधिक परस्परसंवादी, वैयक्तिककृत आणि आकर्षक अध्ययन आणि अध्यापन प्रणालींचा शिक्षकांकडून वापर केला जाऊ लागला आहे." या तंत्रज्ञानामुळे नियमित कार्य स्वयंचलित करण्यापासून ते रियल टाईम फीडबॅकसह अनुकूल मूल्यांकन पद्धतीचा वापर केला जाऊ लागला आहे. तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या डेटाचलित अंत अंतर्दृष्टी विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यास आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यास मदत करत आहे. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षण उपलब्ध करून देत आहे. भारताच्या शिक्षण व्यवस्थेत विचारपूर्वक आणि शिक्षकांच्या सक्रिय सहभागाने एआयसारख्या टूल्सचा वापर केल्यास दर्जेदार शिक्षण अधिक सुलभ आणि वैयक्तिकृत करण्याची शक्ती पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात वाढेल. त्यामुळे एआय तंत्रज्ञानाला विरोध करण्यापेक्षा त्याची ताकद लक्षात घेऊन त्याचा अध्ययन आणि अध्यापनात योग्य  वापर कसा करता येईल यावर शिक्षकांनी लक्ष केंद्रित केले तर त्यांच्या मनातील भीती दूर होईल.

 


 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

भाजपचे राजकारण एक पक्ष व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करते आहे का? भाजपच्या एक पक्षीय वर्चस्वाच्या राजकारणाचे पैलू?

  भाजपचे राजकारण एक पक्ष व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करते आहे का?  भाजपच्या एक पक्षीय वर्चस्वाच्या राजकारणाचे घटक ?   एक पक्षीय वर्चस्व...