मंगळवार, २१ जानेवारी, २०२५

भाजपचे राजकारण एक पक्ष व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करते आहे का? भाजपच्या एक पक्षीय वर्चस्वाच्या राजकारणाचे पैलू?

 

भाजपचे राजकारण एक पक्ष व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करते आहे का? 

भाजपच्या एक पक्षीय वर्चस्वाच्या राजकारणाचे घटक?


 

एक पक्षीय वर्चस्व ही भारतीय राजकारणासाठी नवीन गोष्ट नाही. 1952 ते 1977 पर्यंत भारतीय राजकारणावर काँग्रेस पक्षाचे एकमुखी वर्चस्व होते. विरोधी पक्ष फक्त नावालाच अस्तित्वात होता. लोकसभेत अधिकृत विरोधी पक्ष नेता नेमण्यासाठी आवश्यक दहा टक्के जागा देखील इतर पक्षांना प्राप्त होत नव्हत्या. दक्षिणेकडील काही राज्यांचा अपवाद वगळता भारतातल्या बहुसंख्य राज्यांमध्ये देखील काँग्रेस पक्षाची सत्ता होती. एक पक्षीय वर्चस्वाला छेद देण्याचा प्रयत्न 1967 च्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देण्याचा प्रयत्न केला. परंतु या प्रयत्नाला मर्यादित प्रमाणात यश प्राप्त झाले. जवळपास आठ राज्यांमध्ये विरोधी पक्षांची संयुक्त सरकारे आली. मात्र अंतर्गत मतभेदांमुळे अल्पकाळात ही सरकारी कोसळल्यामुळे काँग्रेसला आपले वर्चस्व पुन्हा निर्माण करण्याची संधी प्राप्त झाली. 1989 ते 2013 या कालखंडात काँग्रेसच्या एक पक्षीय वर्चस्वाला अहोटी लागून आघाडी सरकारचे युग सुरू झाले. या युगात काँग्रेसची स्थापन झालेली सरकारे देखील अल्पमतातील होती. प्रादेशिक पक्षांच्या मदतीने काँग्रेस पक्षाला सत्ता प्राप्त झाली.

2014च्या लोकसभा निवडणुकीत आघाडी सरकारच्या राजकारणाला जबर हादरा बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने लोकसभेत बहुमत प्राप्त केले. पंतप्रधान राजीव गांधींच्या नंतर बहुमत प्राप्त करणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान बनले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला मिळालेल्या यशामुळे काँग्रेस आणि विरोधी पक्षांची प्रचंड वाताहत झाली. अधिकृत विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी आवश्यक संख्याबळ देखील काँग्रेस पक्षाला लोकसभेत मिळू शकले नाही. आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता भेदून एक पक्ष वर्चस्व व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्याचे श्रेय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला प्राप्त झाले. 2014 नंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने भारतातील अनेक राज्यांमध्ये प्रचंड यश संपादन केले. 2014 नंतर भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा आणि विधानसभेत निव्वळ जागा वाढल्या नाहीत तर मतदानाची टक्केवारी देखील 45 टक्क्यांच्या पुढे गेली. गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशहरियाणा, उत्तराखंड, या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला सलग निवडणुकांमध्ये यश प्राप्त झालेली दिसून येते. हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची अत्यंत वाईट अवस्था झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. भारतातील 28 पैकी जवळपास 22 राज्यांमध्ये भाजपचे सरकार आले त्यातील 14 राज्यांमध्ये पूर्ण बहुमतात तर 8 राज्यांमध्ये मित्र पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्र पातळीवर भाजपच्या एक पक्ष वर्चस्वाच्या राजकारणाला काही प्रमाणात लगाम बसला. लोकसभेत अपेक्षित असलेले बहुमत प्राप्त झाले नाही. 'अबकी बार 400 सो पार' अशी घोषणा देणाऱ्या भाजपला फक्त 240 जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या एक पक्ष वर्चस्वाला काही प्रमाणात हादरा बसला असला तरी त्यानंतर झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. त्यात महाराष्ट्रात मिळवलेला विजय तर अभूतपूर्व मानला जातो. पक्ष नेतृत्वाच्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा प्राप्त झाल्या. राज्य पातळीवरील निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपच्या एक पक्ष वर्चस्वाच्या राजकारणाची परत चर्चा सुरू झाली.

काँग्रेस पक्ष वर्चस्व राजकारणापासून झालेली सुरुवात नंतरच्या काळात बहुपक्षीय स्पर्धेत रूपांतरीत झाली आणि आत्ताच्या काळात ती परत भाजपच्या एकपक्षीय वर्चस्वापर्यंत येऊन ठेपलेली आहे. एक पक्षीय वर्चस्वाच्या राजकारणाचा पुन्हा उदय होण्यास पुढील घटक कारणीभूत आहेत.

भारतीय जनतेची मानसिकता-भारतीय राजकारणात घडलेल्या या स्थित्यंतरामागे भारतीय जनतेची मानसिकता कारणीभूत आहे. भारतीय जनता नेहमीच अद्भुत क्षमता आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेल्या नेत्यांच्या मागे उभे राहणे पसंत करते. काँग्रेसच्या एक पक्ष वर्चस्वाच्या काळात पंडित नेहरू इंदिरा गांधी, राजीव गांधीं सारखे प्रभावशाली नेतृत्व पक्षाजवळ होते तोपर्यंत पक्षाच्या प्रभावाला आव्हान देण्याची क्षमता इतर पक्षांकडे नव्हती. आज तीच स्थिती भारतीय जनता पक्षाचे आहे. या पक्षाकडे नरेंद्र मोदींसारखे प्रभावी नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाशी तुलना  होऊ शकेल अशी नेतृत्व विरोधी पक्षाकडे अस्तित्वात नाही. त्यामुळे नेतृत्व केंद्रित मतदान करणाऱ्या भारतीय नागरिकांनी भाजपच्या झोळीत आपल्या मताचे दान टाकलेले आहे. 

विचारसरणी- भाजपचे एक पक्ष वर्चस्व प्रस्थापित करण्यात विचारसरणीचा देखील खूप मोठा वाटा आहे. भाजपची वर्चस्व व्यवस्था हिंदुत्ववादाच्या चौकटीमध्ये घडवलेली आहे. भारतीय जनता पक्षाने पारंपारिक हिंदुत्वाच्या जागेवर नव हिंदुत्वाची मांडणी केली. भाजपचे नवहिंदुत्व हे बहुपदरी स्वरूपाचे आहे. पारंपारिक हिंदुत्वाच्या धार्मिक ध्रुवीकरणाला राष्ट्रवाद आणि विकासाची जोड देऊन व्यापक स्वरूपाच्या नव हिंदुत्वात रूपांतर केले. डिजिटल मीडियाचा  अत्यंत चाणाक्षपणे वापर करून समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोचवले. शेठजीं भटजीचा पक्ष ही प्रतिमा पुसून बहुसंख्य हिंदू हिताची भाषा करणारा पक्ष ही प्रतिमा विकसित केली. विचारसरणीच्या मदतीने आपला सामाजिक अवकाश विस्तारल्यामुळे एक पक्ष वर्चस्वाला जनतेचे पाठबळ मिळाले.

दुय्यम नेतृत्वाची साखळी-भारतीय जनता पक्षाच्या एक वर्चस्वाला मदत करणारा घटक म्हणजे दुय्यम नेतृत्वाची साखळी मानला जातो. भारतीय जनता पक्षाने देश पातळीवरील नेतृत्वासोबत राज्य पातळीवर अनेक दुय्यम दर्जांच्या नेत्यांची साखळी विकसित केलेली दिसते. भाजपकडे जवळपास सर्वच राज्यांमध्ये सक्षम नेतृत्व उपलब्ध आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ त्या मानाने विरोधी पक्षांकडे दुय्यम नेतृत्वाची वानवा आहे. राज्य पातळीवर सक्षम नेतृत्वाची उपलब्धता पक्षाला यश मिळवून देण्यात निर्णय ठरल्याचे अनेक राज्याच्या निवडणूक निकालावरून दिसून येते. उदाहरणार्थ महाराष्ट्रात महायुतीला बहुमत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील या भावनेने भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहाने निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला. 

मजबूत पक्ष संघटन-भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्यास मजबूत पक्ष संघटन हा देखील महत्त्वाचा घटक मानला जातो. भाजप हा सर्वाधिक पक्ष सदस्य असलेला जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाचे देशातल्या कानाकोपऱ्यात कार्यकर्ते आहेत. पक्ष तळागाळात पोचवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सहयोगी हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने निवडक पूर्ण वेळ काम करणाऱ्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांचा संच भाजपकडे उपलब्ध आहे. या संचाच्या मदतीने निवडणुका नसतानाही विधायक कामाच्या माध्यमातून भाजप सर्वसामान्य घटकांपर्यंत पोचण्यात यशस्वी झालेला दिसून येतो. उदा. गो सेवेचे कार्य पक्षाच्या अंतर्गत विविध लहान मोठे गटाचे प्रमुख, वार्ड व बूथ प्रमुख कार्यकर्ता अशी तळागाळात पक्षाची नवी संरचना निर्माण करून भाजपने आपले वर्चस्व व्यवस्था टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक संघटनात्मक यंत्रणा उभी केली.

सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग-भारतीय जनता पक्षाचे एक पक्ष वर्चस्व निर्माण होण्याचे पुढील कारण म्हणजे सामाजिक अभियांत्रिकीचा उपयोग करून राजकीय समावेशनाच्या राजकारणाला दिलेले प्राधान्य होय. भारतीय जनता पक्ष सुरुवातीच्या काळात विशिष्ट जनसमूहापुरता मर्यादित होता. आपल्या पक्षाचा अवकाश विस्तारण्यासाठी नव्वदीच्या दशकात कांशीराम, मुलायम सिंग, लालूप्रसाद यादव यांनी विकसित केलेला सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग भाजपने मोठ्या प्रमाणावर विस्तारला. ओबीसी, आदिवासी, अति मागास दलित समूह यांना जोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभियान राबविण्यात आले.उदा. महाराष्ट्रातील राजकारणातील माधव प्रयोग पक्षाच्या संरचनेत व्यापक बदल करण्यात येऊन राजकारणाच्या परिघाबाहेर असलेल्या वर्गांचे समावेशन करण्यात आले. पक्षाच्या वरिष्ठ संरचनेत वरिष्ठ वर्गाचे वर्चस्व कायम राखून खालच्या स्तरात मोठ्या प्रमाणावर वंचित समूहांना राजकीय अभियांत्रिकीचे माध्यमातून समावेशन देण्याच्या प्रक्रियेमुळे या वर्गाचा फार मोठा पाठिंबा भाजपला मिळाला. या पाठिंब्याच्या जोरावर पक्षाचे वर्चस्व विकसित करण्यात यश संपादन केले.

स्वातंत्र्योत्तर काळातील आरंभीच्या तीन दशकात काँग्रेसने एक पक्ष वर्चस्व व्यवस्थेने भारतीय राजकारणाचा अवकाश व्यापला होता. काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाला आहोटी लागल्यानंतर काही काळ आघाडीच्या राजकारणात प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व असलेल्या बहुपक्षीय व्यवस्थेला महत्त्व प्राप्त झाले. 2014 नंतर बहुपक्षीय वर्चस्वाचे मॉडेल मोडीत निघताना दिसते. भाजपच्या वर्चस्वाचे राजकारण विकसित झालेले दिसते. भारतीय राजकारणाचा फार मोठा अवकाश सध्या तरी भारतीय जनता पक्षाने व्यापलेला दिसतो. हा  अवकाश संकुचित करण्याचा वारंवार प्रयत्न काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून सातत्याने केला गेला. इंडिया आघाडीची स्थापना करून विरोधकांना एकत्र आणून भाजपच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलेला आहे. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता काँग्रेसच्या प्रयत्नांना फारसे यश मिळाल्याचे दिसत नाही. लोकसभा निवडणुकीच्या काळात थोड्याफार पीछेहाटीनंतर भाजपने राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. भाजपने एक पक्ष वर्चस्व दीर्घकाळ टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अपेक्षित धोरणांची आखणी करून वाटचाल सुरू ठेवलेली आहे.

 


 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

भाजपचे राजकारण एक पक्ष व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करते आहे का? भाजपच्या एक पक्षीय वर्चस्वाच्या राजकारणाचे पैलू?

  भाजपचे राजकारण एक पक्ष व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करते आहे का?  भाजपच्या एक पक्षीय वर्चस्वाच्या राजकारणाचे घटक ?   एक पक्षीय वर्चस्व...