शुक्रवार, १४ मार्च, २०२५

राज्यघटना स्वरूप आणि प्रकार/घटनावाद आणि घटनावादाची वैशिष्टये

 

राज्यघटना स्वरूप आणि प्रकार ,घटनावाद आणि घटनावादाची वैशिष्टये

राज्यसंस्था सुव्यवस्थित पद्धतीने चालवण्यासाठी जे नियम तयार केले गेले. त्या नियमांच्या समुच्चयाला राज्यघटना असे म्हणतात. राज्यघटनेच्या माध्यमातून राज्य, शासन आणि जनता यांच्यातील परस्पर संबंधाची निश्चिती केली जाते. तसेच शासनाच्या संघटनेचे स्वरूप देखील निश्चित केले जाते.

राज्यघटनेचा अर्थ किंवा व्याख्या- राज्यसंस्थेविषयीच्या मूलभूत नियमांचा समावेश घटनेत असतो. शासन कोणत्याही प्रकारचे असले तरी त्याचा राज्यकारभार नियमानुसार चालवण्यासाठी लिखित किंवा अलिखित घटना आवश्यक मानली जाते. राज्यघटना म्हणजे नेमके काय हे समजून घेण्यासाठी घटनेची व्याख्या लक्षात घेणे गरजेचे आहे.

1. प्रा. डायसी- यांच्या मते, राज्याच्या सर्वोच्च सत्तेची विभागणी आणि अंमलबजावणी ज्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियमानुसार होत असते त्यांना राज्यघटना असे म्हणतात.

2. प्रा.गिलख्रिस्ट- यांच्या मते, राज्यघटना म्हणजे मूलभूत कायदे किंवा नियमांचा संग्रह होय. हे नियम लिखित-अलिखित असतात. त्यातून राज्याची यंत्रणा निश्चित केली जाते. सरकारच्या विविध अंगात सत्तेची वाटणी केलेली असते व ही सत्ता कशी वापरावी यासंदर्भातील सर्वसाधारण तत्वे घटनेत ग्रंथित केलेली असतात.

वर दिलेल्या व्याख्या मधून राज्यघटनेच्या स्वरूपात खालील मुद्द्यांचा समावेश होत असतो.

1. राज्यघटना हा राज्यातील मूलभूत नियमांचा समुच्चय असतो.

2. राज्याची शासन पद्धती राज्यघटनेद्वारा निश्चित केलेली असते.

3. राज्यघटनेतून शासन यंत्रणेचे स्वरूप स्पष्ट होते.

4. राज्यघटनेतून शासनाचे स्वरूप आणि उद्देश लक्षात येतात.

5. शासनाच्या विविध विभागात सत्तेची असलेली विभागणी आणि परस्पर संबंध राज्यघटनेने निश्चित केलेली असते.

6. नागरिकांचे अधिकार कर्तव्ये तसेच त्यांचे शासनाशी असलेले संबंध राज्यघटने द्वारा निश्चित केले जातात.

टीप-राज्यघटनेचे प्रकार- राज्यघटनेचे विविध प्रकारात वर्गीकरण केले जाते. राज्यघटनेचे साधारणता मुख्य तीन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

1. विकसित राज्यघटना आणि निर्मित राज्यघटना- (Evolved and Enacted constitution) ज्या राज्यघटनेची निर्मिती एका विशिष्ट वेळी घटना समितीकडून केलेली नसते. ऐतिहासिक रूढ्या, प्रथा, परंपरा आणि ऐतिहासिक घटनांतून उत्क्रांत किंवा विकसित झालेली असते. त्या राज्यघटनेला विकसित राज्यघटना असे म्हणतात. विकसित राज्यघटना ही साधारणतः अलिखित स्वरूपाची असते. इंग्लंडची राज्यघटना विकसित राज्यघटनेचे उदाहरण आहे.

या उलट निर्मित राज्यघटना एका निश्चित वेळी घटना समितीकडून निर्माण केली जात असते. निर्मित राज्यघटना ही लिखित स्वरूपात असते. या घटनेत परिवर्तन करण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करावा लागतो.

2. लिखित आणि अलिखित राज्यघटना- (Written and unwritten Constitution) जगातील बहुसंख्य देशांच्या राज्यघटना लिखित आहेत. लिखित राज्यघटना निर्माण करण्यासाठी विशिष्ट वेळी घटना समिती किंवा घटना परिषद गठीत केली जाते. त्या मार्फत घटना तयार केली जाते. लिखित घटनेत परिवर्तन करण्यासाठी विशिष्ट प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो.

अलिखित राज्यघटना विशिष्ट वेळी निर्माण केलेली नसते. तिची निर्मिती उत्क्रांती तत्त्वानुसार होत असते. रूढ्या, प्रथा, परंपरा आणि सामाजिक रीतीरीवाजातून ती विकसित होत असते. इंग्लंडची राज्यघटना ही अलिखित राज्यघटनेचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते.

3. परिवर्तनीय आणि परिदृढ राज्य घटना- (Flexible and Rigid Constitution) ज्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याची पद्धत अत्यंत सोपी असते त्यास परिवर्तनीय राज्यघटना असे म्हणतात. कायदे मंडळाच्या सामान्य कायद्याद्वारे घटना दुरुस्ती केली जाते. इंग्लंडची राज्यघटना परिवर्तनीय राज्यघटनेचे उदाहरण आहे. सहज बदल होत असल्याने राजकीय जीवनात अस्थिरता निर्माण होते.

परिदृढ राज्यघटना म्हणजे ज्या राज्यघटनेत परिवर्तन किंवा दुरुस्ती करण्याची पद्धत अत्यंत किचकट किंवा कठीण असते. अमेरिकेची राज्यघटना हे परिदृढ राज्यघटनेचे उत्तम उदाहरण आहे. अमेरिकेच्या घटनेत बदल करण्यासाठी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत आणि तीन चतुर्थांस राज्यांची मान्यता आवश्यक असते.

अशा प्रकारे तीन मुख्य प्रकारात राज्यघटनेचे वर्गीकरण केलेले आहे. प्रत्येक प्रकारात गुणदोष आहेत. प्रत्येक देशाने आपल्या परिस्थितीनुसार राज्यघटनेचा स्वीकार केलेला आहे.

घटनावाद आणि घटनावादाची वैशिष्टये-

घटनावाद किंवा संविधानवाद ही संकल्पना आधुनिक काळात जन्माला आलेली असली तरी तिचे प्राचीन काळापासून अप्रत्यक्ष स्वरूपात अस्तित्व असल्याचे आढळून येते. घटना आणि घटनावाद हे शब्द व्यवहारात समानार्थी वापरले जात असले तरी त्यांच्यात भेद आहेत. घटनेमुळे शासनाचे स्वरूप, अधिकार, तसेच शासन आणि नागरिक यांच्या परस्पर संबंधाचा बोध होतो तर घटनावादाच्या माध्यमातून शासन व्यवस्था जनतेची आस्था, मूल्ये, आदर्श यांचा समावेश असलेल्या संविधानाच्या नियमानुसार कार्य करते की नाही हे पाहिले जाते. कारण निरंकुश शासन व्यवस्थेत देखील हुकूमशाहा घटना निर्माण करून राज्य चालू शकते परंतु त्या संविधानात जनतेचे आदर्श, राजकीय मूल्ये आणि इच्छा-आकांक्षांचा समावेश नसतो म्हणून या व्यवस्थेत घटना असली तरी ही व्यवस्था संविधान विरोधी असते. घटनेपेक्षा घटनावादाचा अर्थ जास्त व्यापक असतो. संविधानवाद असलेल्या व्यवस्थेत जनतेचे मूलभूत आदर्श प्रत्यक्ष व्यवहारात उपलब्ध असतात. त्यामुळे संविधानवाद हे केवळ प्रक्रियेचे नाव नसून राज्य अंतर्गत, शासन यांच्यावरील नियंत्रण तसेच अमूर्त व व्यापक स्वरूपाची मूल्ये, ऐतिहासिक परंपरा व भावी महत्वकांक्षाशी संबंधित असते. घटनावाद ही घटनेसारखी स्थिर स्वरूपाची संकल्पना नसून विकासात्मक प्रक्रिया आहे. मानवी समाज व्यवस्थेत काळाच्या ओघांमध्ये निर्माण झालेले आदर्श व मूल्ये यांचा वारसा सांगणारी प्रक्रिया असते. भारतीय संविधान 1946 ते 1950 या काळात तयार झालेले असले तरी भारतीय घटनावादाची बीजे त्या पूर्वीच्या काळापासून अस्तित्वात होती. भारतीय घटनाकारांनी घटना निर्माण करून संविधानवादाची अभिव्यक्ती केली याचा अर्थ घटनावादाला घटनेद्वारे व्यावहारिक रूप देणे शक्य होते.

टीप-घटना व घटनावाद फरक- घटना आणि घटनावाद या दोन्ही संकल्पना एकमेकांशी निगडित असल्या तरी त्यात पुढील प्रकारचा फरक आढळून येतो.

1. स्वरूप- घटनावादात प्रामुख्याने समाजाचे राजकीय उद्देश आदर्श, मूल्य यांचा समावेश होतो. या विशिष्ट उद्देशापर्यंत पोहोचण्याचे घटना एक साधन असते.

2. निर्मिती- घटनावाद ही एक सातत्याने विकसित होणारी प्रक्रिया असते. प्रत्येक देशात मूल्ये आदर्श यांचा अनेक शतकापासून विकास होत आलेला असतो. परंतु संविधान एका विशिष्ट काळी निर्माण केलेले असते.

3. प्रतीक- घटनावाद ही एका विशिष्ट विचारसरणीचे प्रतिनिधित्व करत असते. देशातील जनतेचे आदर्श. मूल्ये, आकांक्षांची मिळून एक विचारसरणी तयार होत असते तर घटना हे संघटनेचे प्रतीक असते. या प्रतीकातून सरकार, समाज, व्यक्ती यांचे संघटन आणि परस्पर संबंधाचा बोध होतो.

4. क्षेत्र- अनेक राज्यांचा संविधानवाद एकसारखा असू शकतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तीनही मूल्यांचा स्वीकार सर्वच राष्ट्रांनी केलेला आहे. राष्ट्रांचा घटनावाद एकसारखा असला तरी प्रत्येक राष्ट्राचे संविधान भिन्न भिन्न असू शकते.

अशा प्रकारे घटना आणि घटनावाद यात फरक सांगता येतो.

घटनावादाची वैशिष्ट्ये- घटनावाद संकल्पनेची पुढील वैशिष्ट्ये सांगता येतात.

1.    घटनावाद ही संकल्पना मूल्यांची संबंधित असते. प्रत्येक राष्ट्रातील नागरिकांमध्ये असलेल्या मूल्ये, राजकीय आदर्श याच्यातून घटनावादाचा बोध होतो.

2.    घटनावाद ही संस्कृतीशी संबंधित संकल्पना आहे. देशात अस्तित्वात असलेल्या आदर्श, मूल्या मधून संस्कृती निर्माण होते. त्यामुळे घटनावाद ही संकल्पना जनतेच्या संस्कृतीशी संबंधित असते. आधुनिक काळात राजकीय समाजाचे स्वरूप व्यापक बनलेले आहे. त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक विभिन्नता अस्तित्वात असते अशा राष्ट्रांमध्ये घटनावाद विभिन्न संस्कृतीमध्ये समन्वय निर्माण करण्याचे काम करतो.

3.    घटनावाद ही गतिशील संकल्पना आहे. प्रत्येक समाज व्यवस्थेत काळानुरूप मूल्ये आणि आदर्श बदलत असतात. त्यामुळे घटनावाद ही संकल्पना प्रगतीस पूरक मानली जाते. संस्कृतीच्या विकासासोबत घटनावादाचा देखील विकास होत असतो.

 


 


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ रचना, कार्य, अधिकार आणि स्थान

  पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळ रचना, कार्य, अधिकार आणि स्थान भारताने संसदिय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे राष्ट्रपती हा नामध...