शनिवार, २० ऑगस्ट, २०२२

सत्ता निर्मितीची साधने आणि मार्ग Tools and Means of Power

 सत्ता निर्मितीची साधने आणि मार्ग  :-

हेन्री मार्नन्थोच्या मते, 'सत्ता निर्माण करावी लागत नाही. ती आपोआप निर्माण होत असते.' राजकीय जीवनात सत्तेचे अस्तित्व कायम दिसत असते. राजकीय व्यवस्था सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही पद्धतीने सत्तेचा वापर करीत असते. दंडशक्तीचा वापर हा सत्तेचा नकारात्मक वापर मानला जातो तर अमिषे, प्रलोभने दाखवून व्यक्ति वर्तनात केला जाणारा बदल हा सकारात्मक सत्ता वापर असतो. सत्ता निर्माण होण्यासाठी काही साधनाची गरज असते. सत्ता निर्माण करण्यासाठी आणि टिकविण्यासाठी काही साधने उपयुक्त मानली जातात. ती साधने पुढीलप्रमाणे होत.

१) भौगोलिक परिस्थिती:- सत्तेचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी भौगोलिक परिस्थितीचा सत्तेचा साधन म्हणून विचार केलेला आढळतो. भौगौलिक परिस्थिती स्थान, हवामान, नैसर्गिक साधनसंपत्ती इत्यादीचा विचार केला जातो. इंग्लंडच्या मिळालेल्या वैशिष्टयपूर्ण भौगोलिक स्थानामुळे लोकशाहीस पूरक वातावरण विकसित झाले. विषवृत्तीय प्रदेशातील घनदाट जंगले, दमट हवामान आणि बारमाही पावसामुळे लहान लहान टोळयांची राज्य निर्माण झाली. राष्ट्राकडे असलेली खजिनसंपत्ती सत्ता निर्मितीचा आधार बनत असते. उदा. अरब राष्ट्रे पेट्रोलियम पदार्थाच्या जोरावर जगावर प्रभाव गाजवितात. अमेरिका आणि रशियाकडे असलेल्या प्रचंड भूप्रदेश, खजनसंपत्ती, भौगोलिक स्थान आणि योग्य हवामानामुळे हे देश महासत्ता बनले. भौगोलिक स्थान आणि लहान आकार अनेकदा राष्ट्रांना अडचणीचा ठरू शकतो. उदा. भारत आणि चीन मधील तिबेटचा प्रदेश विशिष्ट भौगोलिक स्थान आणि लहान आकारामुळे आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवू शकला नाही. सत्ता निर्मितीमध्ये भौगोलिक परिस्थितीचे महत्त्व निर्णायक मानले जाते.

२) औद्योगिक क्षमता :- औद्योगिकीकरण आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व यांचा निकटचा संबंध असतो. औद्योगिकदृष्ट्या संपन्न देश उत्पादन क्षमता आणि निर्यातीच्या माध्यमातून संपूर्ण जगाला प्रभावित करू शकतात. उदा. अमेरिका हा देश उत्पादन क्षमता आणि उच्च तंत्रज्ञानाच्या जोरावर महासत्ता बनलेला आहे. खनिजसंपत्तीची मुबलकता, उच्च तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ ज्या राष्ट्राकडे असते ते राष्ट्र बलशाही बनू शकते. औद्योगिकीकरणाच्या जोरावर लहान लहान राष्ट्रे देखील जगावर सत्ता गाजवू शकतात. उदा. जपान सारखा चिमुकला देश औद्योगिकीकरणाच्या जोरावर जगावर प्रभाव टाकतो. प्रत्येक राष्ट्र जगावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी औद्योगिकीकरणाचा मार्ग अनुसरतांना दिसते.

३) राष्ट्रीय चारित्र्य :- राष्ट्रीय चारित्र्य हे सत्ता निर्मितीचे साधन मानले जाते. राष्ट्राविषयी जनतेत असलेल्या भावनेतून राष्ट्र विकासाचा पाया रचला जात असतो. राष्ट्राविषयी आत्यंतिक प्रेम असणारे प्रति सर्मपण आणि भावना नागरिकामध्ये अस्तित्वात असेल तर राष्ट्रावर कितीही मोठे संकट आले तरी राष्ट्र डगमगत नाही कोणत्याही आवाहनाला सामोरे जाण्यास तयार राहते. उदा. हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर अमेरिकेने अणुबॉम्बचा वापर केल्यामुळे जपानचे अपरिमित नुकसान झाले तरी या देशाने न डगमगता आपली प्रगतीची घोडदौड कायम ठेवली. आधुनिक काळात अनेक राष्ट्र विचाखणालीच्या आधारावर चारित्र्य निर्मितीचा प्रयत्न करीत असतात. राष्ट्रीय चारित्र्याची राष्ट्राला स्वतंत्र ओळख मिळत असते तसेच राष्ट्रीय चारित्र्य राष्ट्राला शक्तीप्रदान बनविण्यात सहाय्यक ठरत असते.

४) लष्करी सामर्थ्य :- प्राचीन काळापासून लष्करी सामर्थ्य हा सत्ता प्रमुख आधार मानला जातो. प्राचीन काळी लष्करी ताकदीच्या जोरावर राजाचा प्रभाव अवलंबून असे. प्राचीन काळी दळणवळण साधनाचा अभाव आणि उच्च तंत्रज्ञानाच्या अभावामुळे मोठी मोठी साम्राज्ये दीर्घकाळ टिकविणे शक्य होत नव्हते परंतु आधुनिक काळात लष्करी तंत्रज्ञानात झालेल्या व्यापक बदलामुळे अमेरिका आणि रशियासारखे विस्तीर्ण देश टिकून आहेत. लष्करी तंत्रज्ञानात झालेल्या व्यापक बदलामुळे जगातील काही राष्ट्र सामर्थ्यशाली मानली जातात. इतर राष्ट्र त्यांना वचकून असतात, उदा. अमेरिका, चीन आणि रशियाकडे असलेले लष्करी सामर्थ्य, लष्करी आयुधांच्या जोरावर ही राष्ट्रे जगावर वर्चस्व गाजवितांना दिसतात.

५) आर्थिक शक्ती :- आर्थिक शक्ती हा सत्ता मजबूत करण्याचा महत्त्वपूर्ण आधार मानला जातो. आधुनिक काळात आर्थिकदृष्टया संपन्न असलेले देश इतर देशावर वर्चस्व गाजविताना दिसतात. उदा. युरोपियन राष्ट्र की शक्ती आणि भौगोलिक आकाराच्या दृष्टीने कमजोर असली तरी ती राष्ट्रे आर्थिक शक्तीच्या जोरावर प्रभाव निर्माण करताना आढळतात. राजकीय सत्तेत अर्थकारणाचे महत्त्व वादातीत मानले जाते. चीनसारखा देश आपल्या वाढत्या आर्थिक शक्तीच्या जोरावर अमेरिकेसारख्या देशालाही झुकवायला मागेपुढे पाहत नाही.

सत्ता निर्मितीची वरील साधने असली तरी याशिवाय नेतृत्व, तत्त्वज्ञान ही देखील सत्ता निर्मितीची साधने असतात. सत्ता ही सर्वसमावेशक असते. ती विविध घटक वा साधनातून अस्तित्वात येऊ शकते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

you tube video

 you tube video