मंगळवार, २१ जानेवारी, २०२५

भाजपचे राजकारण एक पक्ष व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करते आहे का? भाजपच्या एक पक्षीय वर्चस्वाच्या राजकारणाचे पैलू?

 

भाजपचे राजकारण एक पक्ष व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करते आहे का? 

भाजपच्या एक पक्षीय वर्चस्वाच्या राजकारणाचे घटक?


 

एक पक्षीय वर्चस्व ही भारतीय राजकारणासाठी नवीन गोष्ट नाही. 1952 ते 1977 पर्यंत भारतीय राजकारणावर काँग्रेस पक्षाचे एकमुखी वर्चस्व होते. विरोधी पक्ष फक्त नावालाच अस्तित्वात होता. लोकसभेत अधिकृत विरोधी पक्ष नेता नेमण्यासाठी आवश्यक दहा टक्के जागा देखील इतर पक्षांना प्राप्त होत नव्हत्या. दक्षिणेकडील काही राज्यांचा अपवाद वगळता भारतातल्या बहुसंख्य राज्यांमध्ये देखील काँग्रेस पक्षाची सत्ता होती. एक पक्षीय वर्चस्वाला छेद देण्याचा प्रयत्न 1967 च्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देण्याचा प्रयत्न केला. परंतु या प्रयत्नाला मर्यादित प्रमाणात यश प्राप्त झाले. जवळपास आठ राज्यांमध्ये विरोधी पक्षांची संयुक्त सरकारे आली. मात्र अंतर्गत मतभेदांमुळे अल्पकाळात ही सरकारी कोसळल्यामुळे काँग्रेसला आपले वर्चस्व पुन्हा निर्माण करण्याची संधी प्राप्त झाली. 1989 ते 2013 या कालखंडात काँग्रेसच्या एक पक्षीय वर्चस्वाला अहोटी लागून आघाडी सरकारचे युग सुरू झाले. या युगात काँग्रेसची स्थापन झालेली सरकारे देखील अल्पमतातील होती. प्रादेशिक पक्षांच्या मदतीने काँग्रेस पक्षाला सत्ता प्राप्त झाली.

2014च्या लोकसभा निवडणुकीत आघाडी सरकारच्या राजकारणाला जबर हादरा बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने लोकसभेत बहुमत प्राप्त केले. पंतप्रधान राजीव गांधींच्या नंतर बहुमत प्राप्त करणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान बनले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला मिळालेल्या यशामुळे काँग्रेस आणि विरोधी पक्षांची प्रचंड वाताहत झाली. अधिकृत विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी आवश्यक संख्याबळ देखील काँग्रेस पक्षाला लोकसभेत मिळू शकले नाही. आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता भेदून एक पक्ष वर्चस्व व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्याचे श्रेय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला प्राप्त झाले. 2014 नंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने भारतातील अनेक राज्यांमध्ये प्रचंड यश संपादन केले. 2014 नंतर भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा आणि विधानसभेत निव्वळ जागा वाढल्या नाहीत तर मतदानाची टक्केवारी देखील 45 टक्क्यांच्या पुढे गेली. गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशहरियाणा, उत्तराखंड, या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला सलग निवडणुकांमध्ये यश प्राप्त झालेली दिसून येते. हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची अत्यंत वाईट अवस्था झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. भारतातील 28 पैकी जवळपास 22 राज्यांमध्ये भाजपचे सरकार आले त्यातील 14 राज्यांमध्ये पूर्ण बहुमतात तर 8 राज्यांमध्ये मित्र पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्र पातळीवर भाजपच्या एक पक्ष वर्चस्वाच्या राजकारणाला काही प्रमाणात लगाम बसला. लोकसभेत अपेक्षित असलेले बहुमत प्राप्त झाले नाही. 'अबकी बार 400 सो पार' अशी घोषणा देणाऱ्या भाजपला फक्त 240 जागा मिळाल्या. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या एक पक्ष वर्चस्वाला काही प्रमाणात हादरा बसला असला तरी त्यानंतर झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. त्यात महाराष्ट्रात मिळवलेला विजय तर अभूतपूर्व मानला जातो. पक्ष नेतृत्वाच्या अपेक्षेपेक्षा जास्त जागा प्राप्त झाल्या. राज्य पातळीवरील निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपच्या एक पक्ष वर्चस्वाच्या राजकारणाची परत चर्चा सुरू झाली.

काँग्रेस पक्ष वर्चस्व राजकारणापासून झालेली सुरुवात नंतरच्या काळात बहुपक्षीय स्पर्धेत रूपांतरीत झाली आणि आत्ताच्या काळात ती परत भाजपच्या एकपक्षीय वर्चस्वापर्यंत येऊन ठेपलेली आहे. एक पक्षीय वर्चस्वाच्या राजकारणाचा पुन्हा उदय होण्यास पुढील घटक कारणीभूत आहेत.

भारतीय जनतेची मानसिकता-भारतीय राजकारणात घडलेल्या या स्थित्यंतरामागे भारतीय जनतेची मानसिकता कारणीभूत आहे. भारतीय जनता नेहमीच अद्भुत क्षमता आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेल्या नेत्यांच्या मागे उभे राहणे पसंत करते. काँग्रेसच्या एक पक्ष वर्चस्वाच्या काळात पंडित नेहरू इंदिरा गांधी, राजीव गांधीं सारखे प्रभावशाली नेतृत्व पक्षाजवळ होते तोपर्यंत पक्षाच्या प्रभावाला आव्हान देण्याची क्षमता इतर पक्षांकडे नव्हती. आज तीच स्थिती भारतीय जनता पक्षाचे आहे. या पक्षाकडे नरेंद्र मोदींसारखे प्रभावी नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाशी तुलना  होऊ शकेल अशी नेतृत्व विरोधी पक्षाकडे अस्तित्वात नाही. त्यामुळे नेतृत्व केंद्रित मतदान करणाऱ्या भारतीय नागरिकांनी भाजपच्या झोळीत आपल्या मताचे दान टाकलेले आहे. 

विचारसरणी- भाजपचे एक पक्ष वर्चस्व प्रस्थापित करण्यात विचारसरणीचा देखील खूप मोठा वाटा आहे. भाजपची वर्चस्व व्यवस्था हिंदुत्ववादाच्या चौकटीमध्ये घडवलेली आहे. भारतीय जनता पक्षाने पारंपारिक हिंदुत्वाच्या जागेवर नव हिंदुत्वाची मांडणी केली. भाजपचे नवहिंदुत्व हे बहुपदरी स्वरूपाचे आहे. पारंपारिक हिंदुत्वाच्या धार्मिक ध्रुवीकरणाला राष्ट्रवाद आणि विकासाची जोड देऊन व्यापक स्वरूपाच्या नव हिंदुत्वात रूपांतर केले. डिजिटल मीडियाचा  अत्यंत चाणाक्षपणे वापर करून समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोचवले. शेठजीं भटजीचा पक्ष ही प्रतिमा पुसून बहुसंख्य हिंदू हिताची भाषा करणारा पक्ष ही प्रतिमा विकसित केली. विचारसरणीच्या मदतीने आपला सामाजिक अवकाश विस्तारल्यामुळे एक पक्ष वर्चस्वाला जनतेचे पाठबळ मिळाले.

दुय्यम नेतृत्वाची साखळी-भारतीय जनता पक्षाच्या एक वर्चस्वाला मदत करणारा घटक म्हणजे दुय्यम नेतृत्वाची साखळी मानला जातो. भारतीय जनता पक्षाने देश पातळीवरील नेतृत्वासोबत राज्य पातळीवर अनेक दुय्यम दर्जांच्या नेत्यांची साखळी विकसित केलेली दिसते. भाजपकडे जवळपास सर्वच राज्यांमध्ये सक्षम नेतृत्व उपलब्ध आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ त्या मानाने विरोधी पक्षांकडे दुय्यम नेतृत्वाची वानवा आहे. राज्य पातळीवर सक्षम नेतृत्वाची उपलब्धता पक्षाला यश मिळवून देण्यात निर्णय ठरल्याचे अनेक राज्याच्या निवडणूक निकालावरून दिसून येते. उदाहरणार्थ महाराष्ट्रात महायुतीला बहुमत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील या भावनेने भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहाने निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला. 

मजबूत पक्ष संघटन-भाजपचे वर्चस्व प्रस्थापित करण्यास मजबूत पक्ष संघटन हा देखील महत्त्वाचा घटक मानला जातो. भाजप हा सर्वाधिक पक्ष सदस्य असलेला जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाचे देशातल्या कानाकोपऱ्यात कार्यकर्ते आहेत. पक्ष तळागाळात पोचवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सहयोगी हिंदुत्ववादी संघटनांच्या मदतीने निवडक पूर्ण वेळ काम करणाऱ्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांचा संच भाजपकडे उपलब्ध आहे. या संचाच्या मदतीने निवडणुका नसतानाही विधायक कामाच्या माध्यमातून भाजप सर्वसामान्य घटकांपर्यंत पोचण्यात यशस्वी झालेला दिसून येतो. उदा. गो सेवेचे कार्य पक्षाच्या अंतर्गत विविध लहान मोठे गटाचे प्रमुख, वार्ड व बूथ प्रमुख कार्यकर्ता अशी तळागाळात पक्षाची नवी संरचना निर्माण करून भाजपने आपले वर्चस्व व्यवस्था टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक संघटनात्मक यंत्रणा उभी केली.

सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग-भारतीय जनता पक्षाचे एक पक्ष वर्चस्व निर्माण होण्याचे पुढील कारण म्हणजे सामाजिक अभियांत्रिकीचा उपयोग करून राजकीय समावेशनाच्या राजकारणाला दिलेले प्राधान्य होय. भारतीय जनता पक्ष सुरुवातीच्या काळात विशिष्ट जनसमूहापुरता मर्यादित होता. आपल्या पक्षाचा अवकाश विस्तारण्यासाठी नव्वदीच्या दशकात कांशीराम, मुलायम सिंग, लालूप्रसाद यादव यांनी विकसित केलेला सामाजिक अभियांत्रिकीचा प्रयोग भाजपने मोठ्या प्रमाणावर विस्तारला. ओबीसी, आदिवासी, अति मागास दलित समूह यांना जोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभियान राबविण्यात आले.उदा. महाराष्ट्रातील राजकारणातील माधव प्रयोग पक्षाच्या संरचनेत व्यापक बदल करण्यात येऊन राजकारणाच्या परिघाबाहेर असलेल्या वर्गांचे समावेशन करण्यात आले. पक्षाच्या वरिष्ठ संरचनेत वरिष्ठ वर्गाचे वर्चस्व कायम राखून खालच्या स्तरात मोठ्या प्रमाणावर वंचित समूहांना राजकीय अभियांत्रिकीचे माध्यमातून समावेशन देण्याच्या प्रक्रियेमुळे या वर्गाचा फार मोठा पाठिंबा भाजपला मिळाला. या पाठिंब्याच्या जोरावर पक्षाचे वर्चस्व विकसित करण्यात यश संपादन केले.

स्वातंत्र्योत्तर काळातील आरंभीच्या तीन दशकात काँग्रेसने एक पक्ष वर्चस्व व्यवस्थेने भारतीय राजकारणाचा अवकाश व्यापला होता. काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाला आहोटी लागल्यानंतर काही काळ आघाडीच्या राजकारणात प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व असलेल्या बहुपक्षीय व्यवस्थेला महत्त्व प्राप्त झाले. 2014 नंतर बहुपक्षीय वर्चस्वाचे मॉडेल मोडीत निघताना दिसते. भाजपच्या वर्चस्वाचे राजकारण विकसित झालेले दिसते. भारतीय राजकारणाचा फार मोठा अवकाश सध्या तरी भारतीय जनता पक्षाने व्यापलेला दिसतो. हा  अवकाश संकुचित करण्याचा वारंवार प्रयत्न काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून सातत्याने केला गेला. इंडिया आघाडीची स्थापना करून विरोधकांना एकत्र आणून भाजपच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलेला आहे. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता काँग्रेसच्या प्रयत्नांना फारसे यश मिळाल्याचे दिसत नाही. लोकसभा निवडणुकीच्या काळात थोड्याफार पीछेहाटीनंतर भाजपने राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. भाजपने एक पक्ष वर्चस्व दीर्घकाळ टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अपेक्षित धोरणांची आखणी करून वाटचाल सुरू ठेवलेली आहे.

 


 

 

 

शनिवार, १८ जानेवारी, २०२५

AI आणि चॅट जीटीपीच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) युगात शिक्षकाची भूमिका

 

AI आणि चॅट जीटीपीच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) युगात शिक्षकाची भूमिका


माहिती तंत्रज्ञानाने शिक्षणाच्या क्षेत्रात अत्यंत वेगाने क्रांतिकारक बदल करण्यास सुरुवात केलेली आहे. माहिती तंत्रज्ञान क्रांतीच्या दुसऱ्या टप्प्यात एआय आणि चॅट जीटीपी सारख्या प्रभावी तंत्रज्ञानाने शिक्षकांसमोर एक नवे आव्हान निर्माण केलेले आहे. इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या जोरावर रोबोटिक शिक्षक विकसित केलेला आहे. तिरुअनंतपुरमच्या केटीसी हायर सेकंडरी शाळेत 'आयरिस' नावाची पहिली एआय शिक्षिका विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे कार्य करत आहे. भविष्यात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अशा अनेक शिक्षकांची निर्मिती करून मानवी शिक्षकापुढे नवे आव्हान उभे केलेले आहे. तंत्रज्ञानाच्या आधारावर तयार केलेला रोबोटिक शिक्षक हजारो वर्षापासून मानवी समाजात सुरू असलेल्या गुरु-शिष्य परंपरा नष्ट करेल का? अशी भीती व्यक्त केली जात आहे. कारण या रोबोटिक शिक्षकाची ज्ञानदान करण्याची प्रचंड असलेली क्षमता मानली जाते. ऑफलाइन आणि ऑनलाईन साधनांचा वापर करून हे रोबोटिक शिक्षक भविष्यात मानवी शिक्षकाची जागा घेतील अशी चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू झालेली आहे.

भारतासारख्या देशात इंटरनेट आणि संगणकाचा वापर सुरू होण्यास फारशी वर्ष झालेली नाहीत. 1995 मध्ये भारतात इंटरनेट सेवेचा प्रारंभ झाला. आज भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 100 करोड पर्यंत पोहोचलेली आहे. या शंभर करोड लोकांपैकी 65 करोड लोकांकडे अँड्रॉइड स्मार्टफोन उपलब्ध आहेत. चॅट जीटीपीचा वापर करणाऱ्यांची संख्या भारतामध्ये झपाट्याने वाढते आहे. चॅट जीटीपी शिक्षण क्षेत्रातील सर्वच प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम मानला जात आहे. ही सेवा निशुल्क असल्यामुळे भारतातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर वापरताना दिसत आहेत. त्यामुळे ज्ञानार्जनाच्या क्षेत्रात शिक्षकाऐवजी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते आहे. त्यामुळे शिक्षकाची भूमिका अत्यंत मर्यादित होत चाललेली आहे‌. एआयचे वाढते महत्व लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भात शिफारस केलेली आहे. आयसीएसई आणि सीबीएसई या माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांनी अभ्यासक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित विषयांचा समावेश केलेला आहे याचा अर्थ सरकारी पातळीवर देखील शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या तांत्रिक बदलांना प्रोत्साहन दिले जात आहे.

ज्ञानार्जनाच्या क्षेत्रात शिक्षकांची मक्तेदारी नष्ट करून एक पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पर्यायी व्यवस्थेत हळूहळू मानवी शिक्षकाची जागा यांत्रिक शिक्षक घेईल. अशा परिस्थितीत शिक्षण व्यवस्थेत शिक्षकाची भूमिका काय असावी याचा नव्याने विचार करण्याची गरज भासू लागली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मुले अत्यंत कमी वयात तंत्रस्नेही बनत आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत वेगाने वाढत चाललेला आहे. अशा परिस्थितीत शिक्षकाने स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचे खुल्या मनाने स्वागत केले पाहिजे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी स्वतःला सक्षम केले पाहिजे.  चॅट जीटीपी सारख्या तंत्रज्ञानाने माहितीचा महापूर आणलेला असला तरी त्यातून योग्य माहितीचे ज्ञान आणि उपयोजनात कसे रूपांतर करावे याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यात शिक्षकांनी प्रभावी भूमिका बजावली पाहिजे. तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या माहितीच्या महाजालातून योग्य ती माहिती निवडण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन केले पाहिजे.

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया वर्गापुर्ती बंदिस्त राहिलेली नाही. वर्ग बाहेरचे अध्ययन आधुनिक काळात महत्वपूर्ण मानले जाऊ लागलेले आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांनी नवीन नवीन शैक्षणिक साधनांचा वापर करण्यास सुरुवात केली पाहिजे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कार्यानुभव कसा देता येईल याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेत लवचिकता आणली पाहिजे. या प्रक्रियेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निव्वळ शिकवण्यापेक्षा चर्चा, विचारविनिमय, प्रश्न विचारायला प्रोत्साहन,  प्रयोगांना प्राधान्य आणि कृतियुक्त शिक्षण  इत्यादी मार्गांचा उपयोग करून अध्ययन प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग घडून आणला पाहिजे. शिक्षकाप्रती विद्यार्थ्यांमध्ये जितकी जास्त आत्मीयतेची भावना विकसित होईल तेवढ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षण प्रक्रियेशी जोडलेला राहील. शिक्षकाची जागा तंत्रज्ञान कधीच घेऊ शकणार नाही हा भाव समाजामध्ये विकसित करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. एआय किंवा चॅट जीटीपी सारखे तंत्रज्ञान शिक्षकाच्या नोकरीवर गदा आणणारे नसून त्यांना अध्ययन-अध्यापनात मदत करणारे आहे या भूमिकेतून शिक्षकांनी स्वतः या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आणण्यासाठी पुढे आले पाहिजे. शिक्षणासारख्या क्षेत्रात सर्जनशीलता आणि मानवी संबंधांना सर्वाधिक महत्त्व आहे. अशा क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा मर्यादित वापर करणे योग्य ठरेल हे समाजाला पटवून देण्याची जबाबदारी शिक्षकांनी हाती घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांचे अंतर्मन लक्षात घेऊन त्यांना योग्य दिशा देण्यास मानवी शिक्षकाशिवाय पर्याय नाही हे जोपर्यंत समाजाच्या लक्षात आणून दिले जात नाही तोपर्यंत शिक्षकाला नवा पर्याय उभे करण्याचे प्रयत्न सुरू राहतील. तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकाची भूमिका संपलेली नसून त्यात बदल झालेला आहे. एआयच्या मदतीने शिक्षकाला अध्यापनाची प्रक्रिया अधिक रंजक बनवता येईल. अशैक्षणिक आणि प्रशासकीय कामे एआयच्या मदतीने लवकर पूर्ण करून अध्यापन प्रक्रियेवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. प्रत्येक विद्यार्थी हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. प्रत्येक विद्यार्थ्यांची सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी भिन्न भिन्न असते. या भिन्न भिन्न पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांचे सामर्थ्य, कमतरता आणि अध्ययनाची गती यांचा विचार करून एआयच्या मदतीने गरजेनुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देता येईल. एआयच्या मदतीने मूल्यमापन प्रक्रियेत योग्य ते बदल करता येतील. मूल्यमापनाचे विश्लेषण आणि वर्गीकरण करण्यासाठी हे तंत्रज्ञान शिक्षकाला सहाय्यभूत ठरेल.

प्रत्येक व्यवस्थेत काळानुरूप बदलणे गरजेचे असते हा नियम शिक्षण व्यवस्था आणि त्यात काम करणाऱ्या शिक्षकांना देखील लागू असतो. शिक्षण क्षेत्रात जगभर तंत्रज्ञानाच्या मदतीने नवनवे प्रयोग होत आहेत. या प्रयोगांच्या माध्यमातून नवनवीन कल्पना शिक्षण क्षेत्रात आणल्या जात आहेत. त्या कल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एआयची मदत शिक्षकांना होऊ शकते. आकर्षक आणि परस्पर संवादी अध्ययन सामग्री तयार करण्यासाठी शिक्षक एआयची मदत घेऊ शकतात. हजेरी, ग्रेडिंग इत्यादी नियमित प्रशासकीय कार्य एआयच्या मदतीने स्वयंचलित पद्धतीने करता येऊ शकतात. ऑटोमेशन, वैयक्तिकरण याशिवाय एआयचा उपयोग करून नाविन्यपूर्ण शैक्षणिक सामग्रीची निर्मिती करून शिक्षक विद्यार्थ्यांमधली सर्जनशीलता विकसित करू शकतात. विद्यार्थ्यांचे सर्वसमावेशक मूल्यमापन  करण्यासाठी हे तंत्रज्ञान अनेक अंगानी शिक्षकांना मदत करू शकते. ‌ एआयची शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचेही शैक्षणिक अनुभव समृद्ध करण्यासाठी  फार मोठी मदत होऊ शकते.

चॅट जीटीपी आणि एआयसारखे प्रगत तंत्रज्ञान भारताच्या शिक्षण व्यवस्थेत व्यापक परिवर्तन आणू शकतात. ऑल इंडिया एज्युकेटर फोरमचे संस्थापक मॅथ्यू के थॉमस सांगतात की, "चॅट जीटीपी आणि एआय तंत्रज्ञानामध्ये भारतातील शिक्षण पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी आवश्यक क्षमता आहे. या तंत्रज्ञानामुळे शिक्षण व्यवस्थेतील प्रशासकीय कार्य स्वयंचलित करता येतील. त्यामुळे शिक्षकांवरील प्रशासकीय कामाचा ताण कमी होऊन ते विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासावर लक्ष केंद्रित करू शकतील". शिक्षक एआयप्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचा डाटा मोठ्या प्रमाणावर इनपुट करू शकतात. या डाटाचे योग्य पद्धतीने विश्लेषण करून विद्यार्थ्यांमध्ये असलेले कौशल्य आणि कमकुवतपणा याचा शोध घेऊन योग्य उपाययोजना करू शकतात. नवीन नवीन संकल्पना समजून घेण्यासाठी आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी हे तंत्रज्ञान शिक्षकांना मदत करू शकते. विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह थिंकिंग मध्ये गुंतवून ठेवण्यास मदत करू शकते. विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या विषयांमध्ये संशोधन करण्यास, स्रोतांचे मूल्यमापन करण्यास  आणि निष्कर्षाचे आयोजन करण्यास मदत करून संशोधन कौशल्य बळकट करू शकतात. नवी दिल्लीतील एका नामांकित शाळेतील शिक्षिका मीना बग्गा यांच्या मते, "चॅट जीटीपीमुळे शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल झालेला आहे.  विद्यार्थ्यांसाठी अधिक परस्परसंवादी, वैयक्तिककृत आणि आकर्षक अध्ययन आणि अध्यापन प्रणालींचा शिक्षकांकडून वापर केला जाऊ लागला आहे." या तंत्रज्ञानामुळे नियमित कार्य स्वयंचलित करण्यापासून ते रियल टाईम फीडबॅकसह अनुकूल मूल्यांकन पद्धतीचा वापर केला जाऊ लागला आहे. तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या डेटाचलित अंत अंतर्दृष्टी विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यास आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यास मदत करत आहे. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिक्षण उपलब्ध करून देत आहे. भारताच्या शिक्षण व्यवस्थेत विचारपूर्वक आणि शिक्षकांच्या सक्रिय सहभागाने एआयसारख्या टूल्सचा वापर केल्यास दर्जेदार शिक्षण अधिक सुलभ आणि वैयक्तिकृत करण्याची शक्ती पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात वाढेल. त्यामुळे एआय तंत्रज्ञानाला विरोध करण्यापेक्षा त्याची ताकद लक्षात घेऊन त्याचा अध्ययन आणि अध्यापनात योग्य  वापर कसा करता येईल यावर शिक्षकांनी लक्ष केंद्रित केले तर त्यांच्या मनातील भीती दूर होईल.

 


 

 

 

डिजिटल साक्षरता अर्थ, वैशिष्ट्ये, समाविष्ट घटक, महत्त्व, प्राप्ती आणि अडथळे

 

डिजिटल साक्षरता अर्थ, वैशिष्ट्ये, समाविष्ट घटक, महत्त्व, प्राप्ती आणि अडथळे

डिजिटल साक्षरता अर्थ-

·       डिजिटल साक्षरता माहिती तंत्रज्ञानाचा एक भाग आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या वापरासोबत ही संकल्पना विकसित झालेली आहे. ही संकल्पना संगणक वापरण्यापूर्ती मर्यादित नाही तर या तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून मूल्यांकन करण्याचा देखील समावेश आहे. 

·       डिजिटल साक्षरता म्हणजे डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म वापरून माहिती शोधण्याची व संवाद करण्याची व्यक्तीची क्षमता 

·       डिजिटल तंत्रज्ञान समजून घेऊन आणि त्याचा वापर करून अर्थपूर्ण कृती क्षमता होय. 

·       डिजिटल साक्षरता म्हणजे डिजिटल उपकरणे इंटरनेट यांचा योग्य व प्रभावी उपयोग करण्याची क्षमता आणि प्रभावीपणे ऑनलाइन व्यापार आणि संवाद करण्याचे कौशल्य आणि ज्ञान होय. 

डिजिटल साक्षरता तीन स्तंभ- 

1. डिजिटल माहिती शोधणे व वापरणे 

2. डिजिटल सामग्री तयार करणे 

3. डिजिटल सामग्री सामायिक करण्यासाठी आणि प्रभावी संवाद साधण्याची क्षमता विकसित करणे 

डिजिटल साक्षरतेत समाविष्ट घटक-

1. इंटरनेट आणि संगणकाचा उपयोग-ई-मेल सोशल मीडियाचा वापर, इंटरनेट ब्राउझिंग

2. माहितीचा शोध व मूल्यांकन-योग्य स्रोतांकडून माहिती मिळवणे माहितीचे मूळ स्रोत आणि सत्यतेचा शोध घेणे. 

3. डिजिटल उपकरणाचा उपयोग-स्मार्टफोन टॅबलेट वापरणे 

4. डिजिटल सामग्री तयार करणे-ब्लॉक पोस्ट व्हिडिओ 

5. सायबर सुरक्षेचे ज्ञान-ऑनलाइन फसवणुकीपासून सावधान डीप फेक तंत्रज्ञान डिजिटल रेस्ट, डेटा सुरक्षा पासवर्ड मॅनेजमेंट

डिजिटल साक्षरता महत्व- 

1. शिक्षण व संशोधनासाठी उपयुक्त 

2. रोजगार आणि व्यवसायासाठी डिजिटल कौशल्य आवश्यक 

3. डिजिटल युगात प्रभावी प्रवेशासाठी आवश्यक 

4. जलद संवाद आणि समाजाशी जोडण्यासाठी आवश्यक उदाहरणार्थ सोशल मीडियाच्या वापर करून संवाद साधता येतो

डिजिटल साक्षरता प्राप्ती-

1. ऑनलाइन पाठ्यक्रम-विभिन्न मुक्त प्लॅटफॉर्म यूट्यूब, तसेच बेड कोर्सेस 

2. नियमित सराव-नियमित स्वरूपात डिजिटल उपकरणांचा वापर 

3. इतरांची मदत-शिक्षक मित्र सहकारी इत्यादींच्या मदतीने डिजिटल साक्षरता प्राप्ति 

4. अभ्यास व वाचन-नवीन तंत्रज्ञानासंदर्भात बातम्या ब्लॉग आणि साहित्याचे वाचन 

डिजिटल साक्षरतेच्या मार्गात अडथळे-

1. तांत्रिक असमानता-विकसित देशात जास्त प्रसार 

2. पायाभूत सुविधांचा अभाव-माहिती तंत्रज्ञान संसाधने उपलब्धता कमी 

3. स्वामित्व-डिजिटल साक्षरतेशी आवश्यक हार्डवेअर सॉफ्टवेअर यांची पेटंट विकसित देशांकडे वापरण्यासाठी फी द्यावी लागते. 



 

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

भारतीय संसद संपूर्ण माहिती/Indian Parliament full information/Indian Polity Parliament

 

भारतीय संसद संपूर्ण माहिती/Indian Parliament full information/Indian Polity Parliament

संसद ही भारतातील केंद्रीय स्तरावरील सर्वोच्च कायदा निर्मिती संस्था आहे. भारतीय कायदेमंडळाला संसद या नावाने संबोधले जाते. भारतीय राज्यघटनेच्या पाचव्या भागात 79 ते 122 मध्ये संसदेची रचना कालावधी कार्यपद्धती अधिकार आणि विशेष अधिकार इत्यादींचा समावेश आहे.

        संसद घटक-

        भारतीय संविधानानुसार कलम 79 नुसार राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा या तिन्ही घटकांची मिळून संसद बनलेली आहे.  

        राष्ट्रपती हा संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसला तरी त्याच्या संमतीशिवाय विधेयकाचे कायद्यात रूपांतर होत नाही. तसेच संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा रद्द करण्याचा, अधिवेशन चालू नसताना वटहुकूम काढण्याचा, सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या किंवा प्रत्येक वर्षाच्या पहिल्या अधिवेशनात संसदेला संबंधित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असल्यामुळे त्यांना संसदेचा अविभाज्य भाग मानले जाते.

        भारताचे संसद ही द्विगृही आहे. लोकसभा हे संसदेचे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे.

        लोकसभा रचना-

        घटनेच्या कलम 81 नुसार लोकसभेत 550 इतके सदस्य असतील. 530 सदस्य राज्यातील प्रादेशिक मतदारसंघातून प्रत्यक्ष व गुप्त मतदानाद्वारे निवडले जातील तर 20 सदस्य केंद्रशासित प्रदेशातील मतदार संघातून प्रत्यक्ष व गुप्त मतदानाद्वारे निवडले जातील.

         संसदेत अनुसूचित जाती-जमातीं साठी काही जागा राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 84 आणि अनुसूचित जमातींसाठी 47 अशा एकूण 131% जागा म्हणजे 24.03 %जागा राखीव आहेत.

        सध्या संसदेची सदस्य संख्या 545 इतकी आहे.

        106 व्या घटनादुरुस्तीनुसार लोकसभेत 2029 पासून महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

        कालावधी- सदस्य 5 वर्ष, घटनेच्या कलम 84 नुसार लोकसभेसाठी 25 वर्ष वय असणे आवश्यक आहे.

        राज्यसभा रचना

        कलम 80 राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सदन आहे.

        राज्यसभेची सदस्य संख्या 250 आहे. त्यातील 238 सदस्य राज्यांच्या विधानसभांकडून आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींकडून निवडले जातात.

        उरलेले 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते. कला, साहित्य विज्ञान आणि समाजसेवा क्षेत्रातील बारा व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती करत असतो.

        कालावधी- सदस्य 6 वर्ष, स्थायी सभागृह

        घटनेच्या कलम 84 नुसार राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी 30 वर्ष वय असणे आवश्यक आहे.

        कलम 89 उपराष्ट्रपती हा राज्यसभा पदसिद्ध अध्यक्ष असतो.

        संसद अधिवेशन व इतर बाबी-

        कलम 85 नुसार संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो. राष्ट्रपती संसदीय कामकाज मंत्र्याच्या सल्ल्याने अधिवेशन बोलवत असतो. घटनेनुसार दोन अधिवेशनामध्ये 180 दिवसापेक्षा जास्त अंतर असू नये. भारतात संसदेची पावसाळी हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अशी तीन अधिवेशन बोलवले जातात.

        गणसंख्या- 1/10 किंवा 10 सदस्य उपस्थिती आवश्यक

        संसदेचे कामकाज चालवण्यासाठी दोन्ही सभागृहांना स्वतःचे नियम बनवण्याचा अधिकार कलम ११८ नुसार आपल्या संविधानाने दिला.

         लोकसभेत किमान १०% जागा मिळवणाऱ्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षनेते पद देण्याची कायदेशीर तरतूद १९७७ पासून आपल्याकडे केली गेली आहे.

         संसदीय आयुधे- तारांकित, अतारांकित प्रश्न, अर्ध्या तासाची चर्चा, स्थगन प्रस्ताव, अल्पमुदतीची चर्चा, लक्षवेधी सूचना, अडीच तासांची चर्चा, अविश्वास ठराव, हरकतीचे मुद्दे, शून्य प्रहर इत्यादी

        संसद सदस्य अपात्रता-

        कलम 102 (1) अन्वये लाभाचे पद धारण करणाऱ्या, न्यायालयाने मानसिक दृष्ट्या विकल किंवा दिवाळखोर घोषित केलेल्या, तसेच भारतीय नागरिक नसलेल्या सदस्याला अपात्र केले जाऊ शकते.

        लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार निवडणूक गुन्हा वा भ्रष्ट व्यवहारात दोषी, दोन वर्षापेक्षा अधिक तुरुंगवासाची शिक्षा, तसेच पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोषी ठरलेल्या व्यक्तीचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.

        60 दिवसापेक्षा विनापरवानगीने गैरहजर राहिल्यास सदस्यत्व रद्द होऊ शकते.


 

 



Right to be Forgotten विसरण्याचा अधिकार महत्त्व

 Right to be Forgotten विसरण्याचा अधिकार महत्त्व विसरण्याचा अधिकार म्हणजे काय?-      राईट टू बी फरगॉटन म्हणजे विसरण्याच्या अधिकाराची सध्या स...