बुधवार, ६ जुलै, २०२२

राजकीय श्रेष्ठीजन निर्मितीचे आधार The basis of the formation of Political Elites

 

राजकीय श्रेष्ठीजन निर्मितीचे आधार -

श्रेष्ठीजन निर्मितीचे अनेक आधार आहेत

अ) परंपरागत घटक : जुन्या काळात परंपरागत घटकांचा प्रभाव जास्त होता.परंपरागत घटकात पुढील घटकांचा समावेश होतो.

१) लष्करी शक्ती :- प्राचीन काळी मनुष्य टोळी करून राहत असे. परकीय आक्रमण, हिस्र पशू पासून टोळीचे संरक्षण करणे ही महत्त्वपूर्ण गरज मानली जात होती. त्यामुळे समाजात शूरत्व वा लष्करी कौशल्य असलेल्या व्यक्तीकडे सत्ता सोपविण्याची परंपरा होती. प्राचीन काळी लष्करी डावपेच, लष्करी कौशल्य हे राजकीय अभिजन निवडीचा प्रमुख आधार होता. आजही संरक्षणाच्या दृष्टीने किचकट किंवा शत्रुराष्ट्रांनी वेढलेल्या राष्ट्रात लष्कराला महत्त्वाचे स्थान असते. राज्य करण्यास लष्कराला योग्य मानले जाते. देशात राजकीय अस्थैर्य निर्माण झाल्यास किंवा नागरी सत्ता चालविण्यास अकार्यक्षम ठरल्यास लष्करी गट सत्ता हस्तगत करत असते. अशा हस्तक्षेपास जनता विरोध करत नाही तर अत्यावश्यक गरज म्हणून अधिमान्यता प्रदान करत असते. उदा. पाकिस्तान अनेकदा नागरी सत्तेच्या अकार्यक्षमतेतून लष्कराने सत्ता हस्तगत केल्याची उदाहरणे आहेत. नवाज शरीफ यांची नागरी राजवट उलथवून करून परवेझ मुशरफ सत्तेवर आले होते.

२) धर्म :- प्राचीन काळी धर्म हा घटक राजकीय अभिजन निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असे. धर्माच्या आधारावर विशिष्ट लोकांना सत्ता दिली जात असे. धर्मगुरू देखील धर्माच्या आधारावर राजकीय अभिजन बनत असत. उदा. तुर्कस्थानचा खलिफा धर्म घटकांच्या आधारावर विशिष्ट धर्माचे लोक राज्यकारभार करण्यास लायक समजले जात असत इतर धर्मियांना दुय्यम किंवा कनिष्ठ स्थान दिले जात होते. उदा. औरंगजेबच्या काळात हिंदू लोकांना जिझिया कर दयावा लागत होता. आधुनिक काळात धर्मावर आधारित राजवट असलेल्या देशात विशिष्ट धर्मियांकडे सत्तासूत्रे दिली जातात इतर धर्मियांना दुय्यम नागरिकत्व दिले जाते. धर्माधिष्ठीत देशात धर्माच्या आधारावर श्रेष्ठीजन निर्माण होतात. उदा. अरब देशात विशिष्ट धर्मियांना निवडणुकीत भाग घेण्याचा अधिकार आहे.

३) वंश व जात :- वंश हा घटक राजकीय श्रेष्ठीजन निर्मितीतील महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. निग्रो विरूद्ध गोरे, काळे विरूद्ध गोरे वंश विशिष्ट जगावर राज्य करण्यासाठी निर्माण झालेला या धोरणेचा प्रचार व प्रसार करून अनेक अभिजन सत्तेवर आलेले दिसतात. उदा. हिटलरने आर्य वंशाच्या श्रेष्ठत्वाच्या आधारावर जर्मनीत हस्तगत केली. वंश घटकाच्या आधारावर श्रेष्ठीजन झाल्याची अनेक उदाहरणे सांगता येतात. परंतु आधुनिक राजकीय श्रेष्ठजन निर्मितीत वंश घटकाचा प्रभाव कमी झालेला दिसतो. भारतासारख्या श्रेष्ठीजन निर्मितीत हा जात घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. आधुनिक काळात खानदान जातकुळीच्या घटकाचा स्थानिक पातळीवर जास्त प्रमाणात पडतो. श्रेष्ठीजन निर्मितीत आनुवांशिक घटक, नातेसंबंध यांचा जातीपेक्षा प्रभाव पडतो. महाराष्ट्रात जास्त असल्याकारणाने महाराष्ट्रात सर्वाधिक सत्ता मराठा जातीतील लोकाना मिळतात. भारतातील बहुसंख्य राज्यामध्ये जास्त लोकसंख्या असलेल्या जातीकडे राज्याची सत्ता भारतात विशिष्ट मतदारसंघ विशिष्ट जातीसाठी राखीव आहेत. आरक्षित संघात त्या प्रवर्गातील उमेदवाराला निवडणूक लढविता येते त्यामुळे या मतदान विजयी होणारा उमेदवार विशिष्ट प्रवर्गातील असतो याचा भारतात श्रेष्ठजन निर्मितीत जात घटक निर्णायक स्वरूपाची भूमिका बजावतो.

४) जन्म:- प्राचीन काळी अनुवांशिक घटकाच्या आधारवर राज्यकर्ते सत्तेवर विशिष्ट घराण्यात जन्म झालेल्या व्यक्तीकडे सत्ता जात असत. इंग्लंड, जपान प्रगत देशांमध्ये राजेशाही दिसून येते राजाच्या पदत्याग किंवा मृत्यूनंतर राजाचा ज्येष्ठ मुलगा मुलगा नसल्यास मुलीकडे सत्तासूत्रे दिली जातात. अनुवांशिक पद्धतीने सत्तेवर आलेल्या व्यक्ती आपल्या सत्तेला नैतिक आधार उपलब्ध करून देण्यासाठी दैवी इच्छा, परंपरा, श्रेष्ठत्व इत्यादी घटकाचा आधार असतात

५) लिंग:- लिंग ही राजकीय श्रेष्ठीजन निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. स्त्री-पुरूष लिंगभेद संघर्षाचे मानले अशा धकाधकीच्या क्षेत्रात भाग हा विचार सर्व समाजात प्रभावी स्त्रियापेक्षा पुरूषामध्ये श्रेष्ठीजनाचे प्रमाण अधिक असते. आधुनिक काळात प्रौढमताधिकार तत्त्वानुसारस्त्रियांना पुरुषाप्रमाणे मतदान व निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार मिळालेला असला तरी सर्व देशातील राजकारणात स्त्रियांचे प्रमाण पुरुषापेक्षा कमी दिसून येते.

६) वय:- वय हा घटक देखील श्रेष्ठीजन निर्मितीत महत्त्वाचा आहे. वाढत्या वयाबरोबर अनुभव, ज्ञान आणि राजकीय परिपक्कता वाढत जाते. ज्येष्ठ व्यक्तीकडे सत्ता सोपविल्यास त्यांचे आज्ञापालन कनिष्ठांकडून होण्याच्या शक्यतेतून प्राचीन काळापासून वय हा घटक राजकीय श्रेष्ठजन निर्मितीमध्ये प्राचीन काळापासून महत्त्वाचा मानला जातो. वयाचे महत्त्व लक्षात घेऊन आधुनिक काळातही काही पदासाठी बयाची अट ठेवलेली असते. उदा. राष्ट्रपती पदावर निवडून लढविण्यासाठी ३५ वर्ष वयाची अट आहे. भारतीय राजकारणात अर्जित घटकाऐवजी पारंपरिक घटकाचा जास्त प्रभाव पडत असतो. उदा. भारतातील अनेक राजकीय पक्षात घराणेशाहीची प्रवृत्ती दिसून येते.

ब) अर्जित घटक : आधुनिक काळात राजकीय श्रेष्ठजन निर्मितीत अर्जित घटकांचा मोठा वाटा राहिलेला आहे. व्यक्तीकडे असलेल्या वैयक्तिगत गुणवत्तेतून अर्जित घटकांचे अस्तित्व दिसून येते.

१) व्यक्तिगत गुण:- व्यक्तीचे सामाजीकरण होतांना तिच्या गुणांचा विकास होत असतो. अर्जित गुण शिक्षणाच्या माध्यामातून मिळतात. या गुणाच्या जोरावर ते श्रेष्ठीजन बनू शकतात. प्राचीन काळात देखील अर्जित घटकांच्या आधारावर श्रेष्ठजन निवडले जात असते. प्राचीन काळी संरक्षणाच्या प्रश्नाला राजकीय क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असल्यामुळे धाडसी, शस्त्र चालविण्याचे कौशल्य, युद्ध तंत्राचा अभ्यास इत्यादी घटकाच्या आधारावर श्रेष्ठीजन निर्माण होत असत. विशिष्ट घराण्यात जन्म, व्यक्तीचे उत्पन्न, तिने केलेली समाजसेवा आणि नेतृत्व निवडीत तिच्या राजकीय कामगिरीचा विचार केला जातो. उदा. पंडित नेहरू मोतीलाल नेहरू सुपूत्र असले तरी इंग्लंड मधील शिक्षण, बुद्धिमत्ता आणि गांधीशी जवळीक व संघटन कौशल्य इ. गुणाच्या जोरावर भारताचे प्रथम पंतप्रधान म्हणून निवड झाली.

२) ज्ञान :- आधुनिक काळात ज्ञान हा घटक ही महत्त्वाचा मानला जातो. प्रशासनात तांत्रिक बाबींचे महत्त्व वाढल्यामुळे प्रशासनातील गुंतागुंतीची उकल करण्यासाठी विशेष ज्ञान असलेल्या व्यक्तीकडे राजकीय सत्ता सोपविली गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. उदा. डॉ. मनमोहनसिंगाना कोणतेही राजकीयपार्श्वभूमी नसतांना अर्थशास्त्रातील ज्ञानाच्या जोरावर ते भारताचे पंतप्रधान बनले. माणसाबद्दल समाजात असलेल्या आदराच्या भावनेतून सत्ता सोपविल्याची अनेक उदाहरणे आहेत. ज्ञान या घटकांच्या वाढत्या महत्त्वातून राज्यकर्त्यांवर्गाच्या प्रशिक्षणाला देखील महत्त्व प्राप्त झालेले आहे. ज्ञानवंत राजकीय अभिजन असल्याचे धोरण व निर्णयाच्या सर्व पैलूचा अभ्यास करू शकतो. निर्णय प्रक्रिया सर्वसमावेशक आणि चिकित्सक पद्धतीने राबविण्यासाठी ज्ञानी व्यक्तीची गरज असते म्हणून आधुनिक काळात विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींना संसदेचे द्वितीय सभागृहात आणि मंत्रिमंडळात स्थान दिले जाते याचा अर्थ राजकीय अभिजन निर्मिती ज्ञान हा घटक देखील महत्त्वपूर्ण ठरला आहे.

३) संपत्ती :- आधुनिक काळात संपत्ती हा अर्जित घटक श्रेष्ठीजन निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. निवडणुका लढविणे हे अत्यंत खर्चिक काम असल्यामुळे निवडणुकीत तिकिट वाटप करतांना निवडणुकीचा खर्च करू शकण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीला तिकिट वाटप केले जाते किंवा निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांना देणग्या देणाऱ्या भांडवलदार व कारखानदार वर्गाला खूश करण्यासाठी राज्यसभेवर निवडून आणले जाते. सत्ता मिळविण्यासाठी नव्हे तर मिळवलेली सत्ता टिकविण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागत असतो. प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी वापरली जाणारी साधने पैसाच्या जोरावर ताब्यात घेऊन लोकमताला हवे तसे वळण लावता येते म्हणून आधुनिक काळात संपत्ती हा घटक राजकीय अभिजन निर्मितीवर प्रभाव टाकत असतो.

क) नेमणुकीची प्रक्रिया :- आधुनिक काळात व पूर्वीच्या काळी देखील सत्तेला अधिमान्यता मिळविण्यासाठी आणि प्रशासन चालविण्यासाठी अनेक व्यक्तीची नेमणूक केली जात असे. उदा. सत्ताधारी पक्ष सत्तेवर बसल्यानंतर आपल्या पक्षाला निवडणूक काळात मदत करणाऱ्यांना राज्यपाल, राजदूत वा विविध आयोगाचे आणि महामंडळाचे अध्यक्ष व सदस्य म्हणून करत असतात. राजकीयदृष्टया कुशल व्यक्ती । युक्ताप्रयुक्ता करून श्रेष्ठीजनाची मर्जी संपादन करून नेमणूक पदरात पाडून घेतात. काही देशात घटनेनुसार काही पदे नेमणुकीच्या आधारावर भरली जातात. उदा. भारतात राष्ट्रपतीला राज्यसभेत १२ सदस्यांची नेमण्याचा अधिकार आहेत. आधुनिक काळात प्रशासनातील गुंतागुंत आणि तांत्रिकता वाढल्यामुळे अनेक प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी तज्ञाची गरज असते. शासनाकडून विविध प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी विविध समित्या नेमल्या जातात. या समित्यावर विशेष तांत्रिक ज्ञान असलेल्या लोकांची नेमणूक केली जाते. राज्यकर्त्यांवर्गांकडून बुद्धिवान वर्गान खुश करण्यासाठी समितीचे अध्यक्षपद व सदस्यपद बहाल करत असतात. अशा प्रकारच्या नेमणुकीच्या माध्यमातून श्रेष्ठीजन निर्माण होतात.

) निवडणुक प्रक्रिया- लोकशाही निवडणुक हे माध्यम श्रेष्ठजन निर्मितीमध्ये अत्यंत प्रभावी माध्यम आहे. निवडणुकीत आपले सर्व कौशल्य लावून श्रेष्मीजन वर्ग जास्तीत जास्त आपल्याला पाठिंबा देणारे घटक निवडून आणण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी धर्म, जात, राजकीय डावपेच, युक्ताप्रयुक्ता, युतीप्रयुती करून निवडणुकीत यश मिळविण्याचा प्रयत्न करतात. श्रेष्ठीजनांना निवडणुकीत यश न मिळाल्यास त्यांची अधिमान्यता नष्ट होत असते. तसेच निवडणुकीच्या माध्यमातून सत्तांतर होत असल्यामुळे ही प्रक्रिया श्रेष्ठीजनामध्ये बदल घडवून आणण्यात ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. आधुनिक काळात इतर सर्व घटकापेक्षा या घटकाला अधिकृत मान्यता दिल्यामुळे निवडणुकीद्वारे श्रेष्ठीजन मोठया प्रमाणावर निवडले जातात.

इ) सत्तेची सोपान परंपरा:- श्रेष्ठजन निर्मितीत हा घटक फार महत्त्वाचा आहे. एखाद्यास पाठिंबा देणारी संरचना कितपत बळकट आहे हे अत्यंत महत्त्वाचे असते. श्रेष्ठीजन निर्मितीत वरिष्ठ वा उच्च पदस्थ श्रेष्ठीजनाशी काय लांगेबाधे आहेत हे देखील महत्त्वाचे आहेत. हे लागेबांधे नाहीसे झाले की सत्तेचा आधार नष्ट होता. उच्चपदस्थांचा आधार हा समर्थकाच्या आधारापेक्षा अधिक मोलाचा व निर्णायक "ठरतो. उदा. भारतात मुख्यमंत्राच्या निवडीत राष्ट्रीय पातळीवरील श्रेष्ठीजनाचा प्रभाव पडतो. परंतु वरिष्ठाशी संबंध महत्त्वाचे असले तरी असे संबंध नेतृत्व निर्माण करू शकत नाही. कारण ज्या पातळीवर कार्य करावयाचे आहे. त्या पातळीवरील राजकारणात त्या नेतृत्वाला कितपत पाठिंबा आहे तोही विचारात घेतला जातो. उदा. काँग्रेस पक्षात मुख्यमंत्राची निवड करण्याआधी विधिमंडळ सदस्याची मते जाणून घेतली जातात. बऱ्याचदा वरून लादलेल्या नेत्याच्या विरोधात असंतोष निर्माण होऊ शकतो म्हणून या औपचारिकतेचाही वापर केला जातो.

अशा पद्धतीने आधुनिक काळात राजकीय अभिजन निर्मितीचे आधार बदलेले दिसून येतात. पारंपरिक राजकीय अभिजन आणि आधुनिक राजकीय अभिजन यात फरक पडलेला दिसून येतो. राजकीय समाजाचे स्वरूप विविधांगी बनल्यामुळे राजकीय व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारा राजकीय अभिजन वर्ग देखील बदलेला दिसून येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

you tube video

 you tube video