शुक्रवार, १० जून, २०२२

राजकीय भरतीचा अर्थ, व्याख्या आणि प्रभाव टाकणारे विविध घटक Polical Recruitment meaning and influnced factor

 

राजकीय भरतीचा अर्थ, व्याख्या आणि प्रभाव टाकणारे विविध घटक-

    राजकीय व्यवस्थेच्या अंतर्भूत कार्यामध्ये राजकीय भरतीच्या कार्यास महत्त्वाचे स्थान आहे. व्यवस्थेचे संपोषण आणि सातत्य या कार्यावर अवलंबून असते. राजकीय व्यवस्था व्यवस्थितपणे कार्यरत राहण्यासाठी राजकीय भरतीचे कार्य नियमितपणे चालू राहणे आवश्यक असते. राजकीय सामाजीकरण आणि राजकीय भरती ह्या दोन्ही संकल्पना परस्परसंबंधित आहेत. राजकीय सामाजीकरणाच्या माध्यमातून व्यवस्थानुकूल मूल्ये आणि दृष्टिकोनाचे बीजोरापण केले जात असते तर राजकीय भरतीच्या कार्याच्या माध्यमातून सामाजीकरण प्रक्रियेतून बीजारोपण केलेल्या मूल्यांनी प्रभावित व्यक्ती व्यवस्थेसाठी कार्य करतात. त्यातून राजकीय व्यवस्थेत सातत्य टिकून राहते.

राजकीय भरतीचा अर्थ व व्याख्या:-

राजकीय व्यवस्थेत विविध पातळीवर विविध पदे अस्तित्वात असतात. ही पदे प्राप्त करण्यासाठी व्यक्ती व गट प्रयत्न करत असतात. या पदावर व्यक्ती निवड कोणत्या आधारावर करावी, कोणत्या पदाकडे कोणत्या जबाबदाऱ्या असतील, पदाचे उत्तरदायित्व काय असेल, त्यांच्यावर नियंत्रण कोणाचे असेल इत्यादी विषयी काही तत्त्वे आणि नियम प्रत्येक व्यवस्थेत बनविलेले असतात. राजकीय व्यवस्थेतील विविध पदावर विविध व्यक्तीची निवड करून कार्य करणाऱ्याची संधी देणे म्हणजे राजकीय भरती होय. राजकीय व्यवस्थेच्या विविध पदाच्या भूमिका निश्चित केलेल्या असतात आणि त्या सर्वांना ज्ञात असतात. म्हणून राजकीय भरती प्रक्रिया राजकीय व्यवस्थेच्या औपचारिक कार्यासाठी निगडित असते. राजकीय व्यवस्थेत पदांची संख्या लोकसंख्येच्या मानाने कमी असल्यामुळे पदप्राप्तीसाठी प्रचंड स्पर्धा असते. लोकशाही विकेंद्रीकरण आणि संघराज्य शासनपद्धती शासनामुळे पदाची संख्या वाढत असल्यामुळे राजकीय भरतीची व्याप्ती देखील वाढत असते. राजकीय भरतीवर प्रभाव टाकणारे घटक :-

राजकीय व्यवस्थेतील कार्यकारीमंडळ आणि कायदेमंडळाच्या सदस्यांच्या भरतीला राजकीय भरती मानले जाते. राजकीय भरती ही प्रशासकीय आणि न्यायालयीन भरतीपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण मानली जाते असते. राजकीय पदावरील भरती ही जनइच्छेतून होत असते. राजकीय पदावरील व्यक्तीचे इतर क्षेत्रातील व्यक्तीवर नियंत्रण असते. राजकीय पदांना असलेली प्रतिष्ठा, अधिकार आणि धोरण निर्मितीवरील प्रभावामुळे ही पदे प्राप्ती करण्यासाठी मोठया प्रमाणात स्पर्धा असते. या स्पर्धातून राजकीय क्षेत्रात सत्तासंघर्ष अस्तित्वात येत असतो. राजकीय भरतीवर प्रभाव टाकणारे विविध घटक अस्तित्वात असतात. ते घटक पुढीलप्रमाणे होत.

१) संविधानात्मक यंत्रणा :- राजकीय पदाच्या भरतीवर संविधानात्मक यंत्रणा प्रभाव पाडत असते. प्रत्येक देशाच्या संविधानात महत्त्वपूर्ण राजकीय पदाचा कार्यकाल, पात्रता, सोयीसुविधा, उत्तदायित्व, अधिकार व कार्य इत्यादीचा उल्लेख केलेला असतो. संविधानात केलेल्या तरतूदीच्या आधारावर राजकीय भरती प्रक्रिया आधारित असते. उदा. अमेरिकन राज्यघटनेत सत्ताविभाजन तत्त्वाचा अवलंब केलेला असल्यामुळे राष्ट्राध्यक्ष व काँग्रेसच्या निवडणुका स्वतंत्रपणे होत असतात.  या उलट भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे जनता संसद सदस्यांची निवड करते आणि ते सदस्य कार्यकारीमंडळाच्या संदस्याची निवड करत असतात. लोकशाहीप्रधान संविधानात्मक यंत्रणा असलेल्या देशात जनतेद्वारा राजकीय पदाधिकाऱ्याची निवड होत असते. त्यामुळे मोठया प्रमाणावर सत्तासंघर्ष पदप्राप्ती डत असतो. सर्वकष व्यवस्थेत राजकीय भरती प्रक्रियेवर एखादी व्यक्ती, गट किंवा पक्षांचे नियंत्रण असल्यामुळे उघड स्वरूपाचे सत्तासंघर्ष दिसून येत नाही. त्या देशात राजकीय भरती प्रक्रिया सत्ताधारी व्यक्ती वा पदाच्या इच्छेनुसार होत असते.

२) राजकीय पक्ष पद्धती :- राजकीय भरतीच्या कार्यावर राजकीय पक्षाचा खूप मोठा प्रभाव पडतो. लोकशाही व्यवस्थेत विधिमंडळ आणि कार्यकारीमंडळाची भरती निवडणुकीच्या माध्यमातून होत असते. म्हणून निवडणुकीत राजकीय पक्षांचा पाठिंबा वा उमेदवारी मिळणे गरजेचे असते. राजकीय पक्षांच्या पाठिंब्याशिवाय निवडणुकीत यश संपादन करणे कठीण होते. राजकीय पक्ष पद्धतीमुळे निवडणुकीची प्रक्रिया सुलभ होण्यास हातभार लागत असतो. पक्षपद्धतीच्या अस्तित्वामुळे कार्यक्षम व योग्य व्यक्तीची राजकीय भरती करणे सोपे जाते. भावी काळात सत्ता मिळविण्यासाठी राजकीय पक्ष योग्यता असलेल्या व्यक्तींना राजकीय भरतीत प्राधान्य देत असतात. राजकीय पक्ष विधिमंडळ आणि कार्यकारीमंडळाच्या भरती करताना पक्षातील स्थान, पक्षाविषयी निष्ठा, संघटन कौशल्य, व्यक्तीची योग्यता, तिला असलेला पाठिंबा, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा जनतेवर असलेला प्रभाव आणि ज्येष्ठता इत्यादी घटकांचा विचार राजकीय भरती करताना करतात.

 

३) राजकीय सहभाग :- राजकीय सहभागाचाही राजकीय भरती प्रक्रियेवर प्रभाव पडत असतो. प्राचीन काळी मतदानाचा हक देताना काही अटी टाकलेल्या होत्या. मतदानविषयक अटीच्या आधारावर काही समाजघटकांना राजकीय सहभागापासून वंचित केल्यामुळे राजकीय भरती प्रक्रियेतून हे घटक वगळले गेले. उदा. प्राचीन काळी स्त्रियांना मतदानाचा हक नसल्यामुळे निवडणुकीत उभे राहण्याचाही अधिकार नव्हता. आधुनिक काळात बहुसंख्य देशात प्रौढ मताधिकार तत्त्वामुळे सर्वांना मतदानाचा अधिकार मिळाल्यामुळे सर्वांना राजकीय सहभागाची संधी मिळालेली आहे. या सहभागाच्या लाभ घेऊन समाजातील सर्व घटकांना राजकीय पदाची प्राप्ती करू शकतात,

४) निवडणूक पद्धती:- लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा राजकीय भरतीचा प्रमुख मार्ग असतो. जगातील लोकशाही देशात विविध निवडणूक पद्धतीचा वापर केला जातो. त्यात साधे बहुमत, प्रमाणशीर प्रतिनिधित्व, दुहेरी मतदा इत्यादीचा समोवश होतो. लोकशाही व्यवस्थेत ठराविक काळात निवडणुका होत असतात. नियमित निवडणुकामुळे ठराविक काळात राजकीय भरतीचे कार्य पार पाडले जाते. उदा. अमेरिकच्या राष्ट्राध्याक्षांची निवडणूक दर चार वर्षांनी होते. निवडणुका हा राजकीय भरतीचा प्रमुख मार्ग असला तरी निवडणूक लढविण्यासाठी प्रत्येक देशात विविध अटी असतात. उदा. नागरिकत्व, वय, वास्तव्य या अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला निवडणुकीत सहभागी होऊन राजकीय पदाची प्राप्ती करता येऊ शकते.

५) मतदानाची पद्धती :- राजकीय भरती प्रक्रियेत मतदान करण्याच्या पद्धतीचा प्रभाव पडत असतो. मतदान गुप्त पद्धतीने की उघड पद्धतीने होते यावर ही राजकीय भरतीचे स्वरूप अवलंबून असते. मतदान उघड पद्धतीने होत असेल तर दडपशाही करणाऱ्या, श्रीमंत व्यक्तींना राजकीय भरती प्राधान्य मिळण्याची शक्यता असते. याउलट गुप्त पद्धतीने होत असेल तर मतदार इतर प्रभावापासून अलिप्त राहून स्वतंत्रपणे मतदान करू शकतो त्यामुळे गुणवत्तावान व्यक्तींना राजकीय भरतीत प्राधान्य मिळू शकते आणि भरती पद्धत गुणवत्ता विकसित होऊ शकते.

६) सामाजिक स्तरीकरण- समाजात असलेल्या विविध स्तरांचाही राजकीय भरती प्रक्रियेवर प्रभाव पडत असतो. भारतासारख्या जातीव्यवस्थेचे अस्तित्व असलेल्या देशात राजकीय पदांसाठी वरिष्ठ जातींना योग्य समजले जात असल्यामुळे वरिष्ठजातीतील व्यक्तींना राजकीय भरतीत स्थान दिले जात असे, स्वातंत्र्योत्तर काळात ्रौढमताधिकाराच्या तत्त्वांमुळे जातीच्या वरिष्ठ स्थानापेक्षा जातीतील सभासद संख्या महत्त्व प्राप्त झाले. जास्त सभासद संख्या असलेल्या जाती संख्येच्या जोरावर राजकीय भरतीत आघाडी संपादन करू शकतात. उदा. महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठा जातीने संख्येच्या जोरावर प्रभाव निर्माण केलेला दिसतो.

७) हितसंबंधी गट :- हितसंबंधी गटाचा देखील राजकीय भरती प्रक्रियेवर प्रभाव पडत असतो. सत्ताधारी समाजातील विविध गटांचा पाठिंबा मिळविण्यासाठी हितसंबंधी गटाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. त्या गटाकडून आपल्या सत्तेला अधिमान्यता मिळविण्यासाठी हितसंबंधी गटांना राजकीय भरती प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते. उदा. हितसंबंधी गटांच्या प्रतिनिधिची विधिमंडळात नियुक्ती करणे आधुनिक काळात हितसंबंधी गटांच्या वाढत्या प्रभावामुळे राजकीय भरती प्रक्रियेत त्यांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत चालेला दिसतो. हितसंबंधी गट राजकीय पक्षाचे आधार देखील असतात. उदा. इंग्लंडमध्ये मजूर पक्ष कामगार संघटनेवर आधारलेला आहे. या परिस्थितीत राजकीय प्रतिनिधित्व देतांना हितसंबंधी गटांना प्राधान्य मिळते. उदा. मजूर पक्ष राजकीय भरती करताना कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना प्राधान्य देत असते.

८) सार्वजनिक कार्याचा अनुभव :- सार्वजनिक कार्याचा प्रत्यक्ष अनुभव हा राजकीय भरतीवर प्रभाव पाडणारा घटक आहे. सार्वजनिक संघटनेतील कार्याचा अनुभव आणि स्वातंत्र्य आंदोलनातील सहभाग यांचा राजकीय भरतीवर प्रभाव पडत असतो. उदा. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी नेत्यांना मोठया प्रमाणावर उमेदवारी बहाल केली. सर्वोच्च पदावर राजकीय भरती करताना अनुभवाला प्राधान्य दिले जात असते. उदा. जनता पक्ष राजवटीत मोरारजी देसाई कडे असलेल्या विविध मंत्रीपदाच्या कार्याचा अनुभव असल्यामुळे पंतप्रधान पदी नेमणूक मिळालेली होती. प्रतिष्ठ आणि जबाबदान्या असलेल्या पदासाठी विशिष्ट वयाची अट टाकलेली असते. या अटीच्या माध्यमातून सार्वजनिक कार्याचा अनुभव असलेली व्यक्ती पदावर नेमला येईल हा उद्देश असतो. उदा. राष्ट्रपती पदाची निवडणुक लढविण्यासाठी ३५ व वयाची अट असते याचा अर्थ राजकीय भरतीत सार्वजनिक कामाच्या अनुभ देखील महत्त्वपूर्ण असतो.

अशा प्रकारे राजकीय भरती प्रक्रियेवर वरील घटकाचा प्रभाव पडत असतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box

ग्राहक संरक्षण कायदा 2019 उद्देश,वैशिष्ट्ये,महत्व आणि ग्राहक अधिकार

  ग्राहक संरक्षण कायदा 2019- 9 ऑगस्ट 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायदासंसदेने संमत केला. 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्याची जागा ह्या कायद्य...